यादोंकी बारात निकली है आज दिल के द्वारे....
लहानपणी औरंगाबादच्या रॉक्सी चित्रपटगृहात ‘यादों की बारात’ हा चित्रपट बघितला होता. खूप खूप आवडला होता. विशेषत: हे गाणं...ज्या वेळी अनेक वर्षांनी बिछडलेले तीन भाऊ म्हणजे विजय अरोरा, तारिक आणि धर्मेंद्र एकत्र येतात आणि त्या वेळी या गाण्यामुळेच ते एकत्र येतात आणि तो प्रसंग डोळ्यात अश्रू आणतो....आज असंच कोणीतरी हे गाणं आपल्या आवाजात गावून मला पाठवलं आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या.
कोणे एके काळीचा ‘तो’ आठवला. तो आमच्यापेक्षा वेगळा होता. जास्त कल्पक होता. कष्टाळू होता. उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही आमच्या घराच्या अंगणात घरातल्या सगळ्या लाकडी खुर्च्या त्याच्या सांगण्यावरून बाहेर आणत असू. मग एक रेल्वे तो तयार करत असे. सिंगल खुर्ची म्हणजे तृतीय श्रेणीचा डबा, दोन खुर्च्या एकमेकांना जोडून ठेवल्या की ती द्वितीय श्रेणीचा डबा आणि त्या दोन खुर्च्यांवर एक चादर टाकून कव्हर केलं की तो झाला प्रथम श्रेणीचा डबा.... अशा रेल्वेचं तिकीट काढून आम्ही त्यात बसत असू. नितू-पितू, सुहास, संदीप, नीता, महेश, ज्योती, बेबी, सुनिल आणि मी! आईने रात्रीच्या पोळ्या करून ठेवलेला पोळीचा डबा आम्ही शिताफीनं गायब करत असू. मग तो त्यात बारीक कांदा, टोमॅटो कापून टाकत असे. शिवाय शेंगदाणे, तिखट, मिठ, दही टाकून वर तेलाची फोडणी देखील. गाडी जेव्हा एखाद्या स्टेशनवर थांबत असे, तेव्हा आम्हाला वर्तमानपत्राच्या कापलेल्या तुकड्यांवर तो स्वादिष्ट गोपाळकाला त्याच्यातर्फे खायला मिळत असे.
आम्ही सुट्टीच्या दिवशी खूपच उशिरा उठत असू. एकदा मी उठले, तेव्हा माझ्याकडे बघून माझी बहीण रूपा जोरजोरात हसायला लागली आणि मी तिच्याकडे बघून. त्या दिवशी जो समोर येईल त्याच्याकडे बघून आम्ही खदाखदा हसत होतो आणि मग ज्या वेळी आरसा समोर आला, तेव्हा लक्षात आलं की आम्हा सगळ्यांच्याच ओठांवर कोळसा किंवा काजळ याने याच महोदयांनी जाडजूड मिशा काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे आम्ही सगळेच विनोदवीर दिसत होतो.
मग पुढे दादांनी (वडिलांनी) शिक्षणासाठी आम्हाला औरंगाबादला ठेवलं. त्या वेळी त्याच्यामुळे चांगली गाणी कशी ऐकावीत याची सवय लागली. पैसे जमवून हा पठ्ठ्या नरिमन नावाच्या शहागंज मधल्या दुकानातून इपी, एसपी आणि एलपी अशा रेकॉर्डस विकत आणत असे. आमच्याकडे गीत रामायण, शोले, आणि असंख्य हिंदी मराठी गाण्यांच्या रेकॉर्ड्स होत्या. मध्येच त्या रेकॉर्ड प्लेअरची पिन खराब व्हायची किंवा एकाच जागी फिरत राहायची, त्या वेळी ती पिन विकत आणून पुन्हा बसवायचं कसबही याला अवगत होतं. आणि हो, जुन्या माठामध्ये स्पीकर बसवायचा मग गाण्यांचा आवाज स्टिरीओ सारखा झकास यायचा.
नवरात्रीच्या दिवसांआधी देवघराला रंग द्यायचा असायचा. तेव्हा माझा पुढाकार असायचा, आणि मला साथ द्यायला हा माझ्याबरोबर सावलीसारखा असायचा. कधी गडद पिवळा आणि तांबडा, तर कधी हिरवा आणि पिवळा अशी अनेक कॉम्बिनेशन्स करत आम्ही देवघर रंगवत असू.
नवा व्यापार हा खेळ तर आम्ही याच्या मदतीने घरीच बनवत असू. तो आमचा नेता असे. त्याला पोस्टाची तिकीटं, काड्याच्या पेट्या जमवायचा नाद होता. इतकंच नाही तर जेव्हा तो पत्र लिहीत असे, तेव्हा ती पत्रं चित्रमय असत. म्हणजे दीपा ऐवजी दीपाचा फोटो आणि त्याखाली नमस्कार केलेले हात असायचे. मग मी ट्रेननी येईन असं सांगायचं असेल तर रेल्वेचं चित्र एकतर हाताने काढलेलं किंवा कुठून तरी कापून चिटकवलेलं असायचं. ती पत्रं म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा ठेवा असायचा.
त्याला सायकलिंग खूप आवडायचं. त्या वेळी यूथ हॉस्टेलसारखंच यूथ सेंटर असायचं. यूथ सेंटरतर्फे त्यानं दूरदूरवर सायकलनं प्रवास केला होता. आम्हाला घेऊन तो दर रविवारी दौलताबादच्या किल्ल्यावर जायचा. तिथे काढलेले ते कृष्णधवल फोटो आजही आठवतात. फोटोग्राफीची किती नेमकी जाण होती त्याला. एखाद्या सणाला तो मला माझेच त्याने काढलेले फोटो भेट म्हणून द्यायचा.
कॉलेजच्या स्नेहसंमेलनात त्याला मुकेशची गाणी गायला आवडायचं. त्यातही चाँद आहे भरेगा आणि चाँदसी महेबुबा हो मेरी आणि यहुदी चित्रपटामधलं ये मेरा दिवानापन है, या मोहोब्बत का सुरुर...ही त्याची आवडती गाणी...त्या वेळी कम्प्युटर काय असतो हे ठाऊक नव्हतं, त्या वेळी त्यानं विद्यापीठातून कम्प्युटर विषय घेऊन एमफील केलं होतं....
त्याच्या जवळ खूप आश्वासक वाटायचं, सुरक्षित वाटायचं, कुठलंही दडपण तो जवळ असताना यायचं नाही. तो माझा जीवलग मित्रच वाटायचा. कारण त्यानं कधी दादागिरी गाजवली नाही, ना कुठला धाक दाखवला..... पण काहीतरी झालं आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ....अगदी सातासमुद्राएवढं अंतर निर्माण झालं आणि मी माझ्या स्वभावानुसार सगळ्या आठवणी याच समुद्रात खोलवर बुडवून टाकल्या.
अचानक इतक्या वर्षांनी तो पुन्हा समोर आला. त्या आठवणींचा पेटारा त्यानं उघडला आणि ते स्वप्नासारखं जग पुन्हा डोळ्यांसमोर उभं करून हसत उभा राहिला...आज तर त्यानं कमालच केली. आपल्या स्वत:च्याच आवाजात ‘यादो की बारात’ हे ऐतिहासिक गाणं गावून पाठवलं.
एकीकडे मला तो अश्रूभरल्या नजरेनं बघणारा धमेंद्रही आठवत होता आणि एकीकडे इंग्रजी चित्रपटातला हिरो वाटावा असा लहानपणापासून सोबत करणारा ‘हा’ देखील आठवत होता. मग मीही जसा आवाज लागेल तसं गायला सुरुवात केली, माझ्या त्याच हळव्या, मनस्वी, कष्टाळू, हुशार भावासाठी!
‘यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे
सपनोंकी शहनाई बिते दिनोंको पुकारे दिल के द्वारे
छेडो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे.....
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नंदू.
दीपा
20 April 2021
Add new comment