सांदण - गेल्या दहा हजार वर्षांत.....

सांदण - गेल्या दहा हजार वर्षांत.....

तारीख

नुकतीच ‘सांदण‘ला भेट दिली. सध्या घरात प्लंबिंग आणि इलेक्ट्रिसिटी दोन्हींची खूप कामं निघाली. दिवसभर कामानं वैतागून गेलो असतानाच पुणे इट आउट्सची एक पोस्ट नजरेत पडली आणि अपूर्व आणि मी कोथरूडच्या दिशेने निघालो. जातानाच फोन केला, तर तिकडून एक अगत्यशील आवाज आला, या या तुमचा टेबल बुक करतो....आम्ही पोहोचलो, तर तिकडे जत्रेसारखी गर्दी  उसळलेली...ना जाहिरात, ना मार्केटिंग....केवळ पुणे इट आउट्सची व्‍हायरल झालेली पोस्ट आणि एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितल्यामुळे जणू काही अख्खं पुणं तिथे लोटलं असावं.
गर्दीतून वाट काढत वर पहिल्या मजल्यावर पोहोचलो, तर तिथेही सगळेच टेबल हाउसफुल्ल...मात्र आमचा टेबल आम्हाला मिळाला आणि आम्ही ऑर्डर दिली. गर्दीमुळे ऑर्डर येण्यास बराच वेळ लागला. पण आम्ही शांतपणे तिथे टेबलवर असलेली आणि उभ्याने प्रतीक्षेत असलेली गर्दी न्याहाळत बसलो. एक-एक तास प्रतीक्षा करून काहीजण वैतागले होते, तर काही संयमाने बसले होते. इतक्या प्रचंड गर्दीची अपेक्षा नसल्याने वेटर, मॅनेजर आणि खुद्द मालक गोंधळून गेले होते. त्या सगळ्यांची तारांबळ उडाली होती. पण एवढं सगळं होऊनही वेटरपासून मॅनेजर पर्यंत सगळेच नम्रपणे बोलत होते, अतिथींचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होते. ज्यांची ऑर्डर आली, ते अक्षरश: समोरच्या पदार्थांवर तुटून पडले होते.
यथावकाश आमची ऑडर्रही आली आणि आम्ही आधी सुपप्रमाणे कळण प्यालो...अहाहा, जगातली सगळी सुपं फिकी पडावीत अशी चव आणि किती पौष्टिक असावं याचा दाखला चवच देत होती...मन सुखावलं, समाधानानं भरून पावलं, एवढ्यात फणसाची भाजी आणि तांदळाच्या दोन मऊसूत भाकरी आल्या. सोबत नारळाची चटणी आणि उकडलेली कडधान्य सॅलड स्वरूपात होती. नॉनव्‍हेजच्या तोंडात मारावी अशी फणसाच्या भाजीची चव होती...आम्ही ती संपवताच लगेचच आमची पुढची ऑर्डर म्हणजे शहाळ्याची भाजी आणि तीन घावण येऊन ‘आमची चव बघा’ असं म्हणायला लागले. एक घास तोंडात टाकला आणि मन तृप्त झालं...अशी भाजी मी गेल्या सात जन्मात खाल्ली नव्‍हती....खरं तर हा पदार्थच मी पहिल्यांदा खात होते.... त्यानंतर इतिहासप्रसिध्द ‘सांदण’ नामक स्वीटडिश आली...काळ्या डिशमध्ये पांढरंशुभ्र दूध आणि त्यात चौकोनी आकाराचं आंब्याचं सांदण...बघतच राहावं असा पदार्थ...आम्ही चव घेतली आणि स्वर्गीय सुखाचा आनंदही मिळवला....मग मात्र तुडुंब पोट भरूनही हावरट मन ‘आणखी आणखी’ असं म्हणायला लागलं, मग आम्ही नारळाच्या दुधातल्या शेवया मनसोक्त खाल्ल्या आणि गप्प न बसता लगेचच तांदळाची खिरही पार्सल करून घेतली. घरी परतल्यावर सांदणची आठवण आली तर काय करणार हो?
परतताना मुद्‍दाम वेटरपासून चिटणीस या व्‍यवस्थापकापर्यंत सगळ्यांना मनापासून पंसदीची पावती दिली. इतकंच नाही तर सांदणचे मालक गोखले-मराठे या गोड मंडळींशी आम्ही बोललो, ते आम्हाला सॉरी म्हणून दिलगीरी व्‍यक्‍त करत होते, आणि त्याच वेळी माझ्यात प्रवेश केलेल्या अत्रेंच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते, ‘अहो, सॉरी कशाला म्हणताय, गेल्या १० हजार वर्षांत आम्ही असे पदार्थ खाल्ले नव्‍हते....’
त्यानंतर अत्रेंना बरोबर घेऊनच आम्ही घरचा रस्ता पकडला. 
जरूर भेट द्या सांदणला...मात्र गर्दी असल्यास वैतागू नका, संयम बाळगा आणि प्रतीक्षा करा. तुमच्या प्रतीक्षेची फळं चांगलीच मिळणार याची गोखले-मराठे यांच्या वतीने खात्री देते.
दीपा देशमुख, पुणे

सांदण  - दिगंबर हॉल, कोथरूड पुणे 

Add new comment

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.