धागा धागा सुखाचा
घरात पाच भावंडं असल्यानं आईचं आमच्या दिवसातल्या उचापतींवर फारसं लक्ष नसायचं. मोठा भाऊ दादागिरी करायचा तेवढंच. मला आठवतं, मी दुसरी-तिसरीत असताना आम्ही बाहुलाबाहुलीचं लग्न वगैरे खेळ खेळायचो. माझ्याकडे नेहमीच बाहुली आणि बहिणीकडे - रुपा तिचं नाव - तिच्याकडे बाहुला! तेव्हापासून बाहुलीसाठी अनेक गोष्टी जमवण्याचा नाद मला लागला होता. त्या वेळी सिफॉनच्या खूप सुंदर रंगांच्या रुंद, दोन्ही बाजूंनी पिको केलेल्या रिबन्स मिळत असत. कदाचित आजही मिळत असाव्यात. बाहुलीची साडी म्हणून त्या मी जपून ठेवत असे. कागदावर नाना प्रकार करून त्या बाहुलीसाठी ब्लाऊज शिवणं कार्यक्रम करत असे.
कागदावर जमायला लागल्यावर कपड्यावर प्रयोग सुरू झाले. तसंच घरात देवाच्या वातीसाठी खूपसारा कापूस (गाठीचा) असायचा. मग धावदोरा शिकून कपड्याच्या तीन बाजूंनी धावदोरा घालून त्या खोळीत तो कापूस भरायचा आणि मग चौथी बाजूही बंद करून टाकायची. यात गाद्या फुगलेल्या दिसायला लागल्यावर मधून मधून सरळ रांगेत धावदोरा घातला की त्या छान चपट्या होतायेत आणि खर्या गाद्यांसारख्या छान दिसताहेत हे लक्षात आलं. उशा करताना हे करायची गरज भासत नसे. त्या वेळी आमचे कपडे शिवताना, मापं घेण्यासाठी टेलर वगैरे घरीच येत. माझी या सगळ्या लोकांशी दोस्ती होत असे. मग सुट्टीच्या दिवशी मला तुमचं दुकान बघायचं म्हणून त्या ‘खाडे’ नावाच्या टेलरच्या टपरीवजा दुकानात गेल्याचंही मला आठवतं. त्या एवढ्याशा दुकानात चार शिलाई मशीन्स बघून माझे तर डोळेच लकाकले. त्या शिलाई मशीनच्या बाजूला एक पिशवी बांधलेली होती. त्यात अनावश्यक कपड्यांचे तुकडे/चिंध्या भरलेल्या होत्या. त्यातून अनेक चिंध्या मला त्यानं दिल्या. मी एकदम खजिना मिळाल्यासारखी खुश झाले होते. त्यानंतर मला वेळ मिळेल तसा खाडेकाकाच्या दुकानात जायचं वेडच लागलं. त्यानंही कधीच मला हिडीसफिडीस केलं नाही. मी तिथेच बसून धावदोरा घालत अनेक प्रयोग करून बघू लागले.
एके दिवशी मी हट्टच धरला, की मला मशीन शिकायची. तेव्हा तू अजून खूप लहान आहेस आणि सुई हातात घुसली तर साहेब ओरडतील असं तो म्हणायला लागला. तसंच मशीनवर पाय मारायला स्टूलवर बसल्यावर माझे पायही खालपर्यंत पुरत नव्हते. पण मी थोडीच हार मानणार होते. मी उभी राहून मशीन चालवेन, पण मला शिकायचीच असं म्हटल्यावर त्याचाही नाईलाज झाला. त्यानं मला पायडल कसं मारायचं, त्याच वेळी वरती कपडा एका रेषेत कसा सरकवायचा हे समजावून सांगितलं. एका कागदावर पट्टीनं रेषा मारून त्यानं त्या रेषेवरूनच मी टीप मारावी असं सुचवलं. गंमत म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मला ते चक्क जमलं. कदाचित इतक्या दिवसांच्या निरीक्षणाचा तो लाभ झाला असावा. मला इतका आनंद झाला की सगळं जग माझ्या मुठ्ठीमे असं वाटायला लागलं.
खाडेच्या सल्ल्यानं आईनं घरी उषा कंपनीची शिलाई मशीन विकत घेतली. माझे फ्रॉक्स आई घरातच शिवायला लागली. बॉबी चित्रपटातल्या डिम्पलसारखा ठिपक्याठिपक्यांचा अम्ब्रेला कट फ्रॉक आणि उडत्या बाह्या वगैरे....पण मग माझे खूप नखरे सुरू झाले. या फ्रॉकची बॉडी खालीच आलीये, शोल्डर उतरलाय, मला लांब बाह्या आवडत नाहीत, मला फुग्याच्या बाह्या हव्यात अशा प्रकारे तक्रारी आणि डिमांड वाढल्या. आई वैतागून गेली. कारण माझी लहान बहीण रूपा जे शिवलं ते आनंदात घालून फिरायची, माझ्याच तक्रारी ऐकून एके दिवशी आई चिडून म्हणाली, एवढं असेल तर शिव स्वतःच स्वतःचे कपडे! या तिच्या चिडण्यानं मला राग येण्याऐवजी किंवा वाईट वाटण्याऐवजी आनंदच झाला. मी माझ्या जुन्या न आवडलेल्या फ्रॉकला उसवून त्यावर प्रयोग करायला लागले. त्यातूनच एका मिनिटांत कपड्यावरची शिलाई कशी उसवायची याच्या ट्रिक्स लक्षात आल्या. लांब चार नम्बरची टीप कपड्यावर घातली आणि एका टोकाला गाठ मारून दुसर्या टोकावरचा दोरा अलगद ओढला की चुन्या एकसारख्या आणि किती छानशा तयार होतात ही गोष्ट लक्षात आली. अशा प्रयोगांमधून मी माझ्या वयाच्या दृष्टीनं शिवणकामात खूपच तरबेज झाले होते.
एके दिवशी माझी मैत्रीण नीता (म्हणजे ते सगळं कुटुंबच) औरंगाबादला सुट्टीत आमच्याकडे आली असताना आम्ही दोघी गप्पा मारत असताना मी तिला तिच्या बाहुलीसाठी एक सुंदर असा लालचुटूक रंगाचा परकर भेट दिला. त्यावर ती म्हणाली, दीपा, हा परकर माझ्या बाहुलीसाठी मोठा होतोय ग. त्यावर मी चटकन उत्तर दिलं, तुझी बाहुली थोडी मोठी झाली की येईल तो आपोआप. थोडी वाट पाहा. तिला आणि मला त्यात काहीही खटकलं नाही हे विशेष. मी साधारणपणे आठवीत असताना माझे कपडे स्वतःच शिवायला लागले. नववीत गेल्यानंतर तर आईचे ब्लाऊजही शिवायला लागले. माझ्या अनेक मैत्रिणी माझ्याकडे त्यांचे फ्रॉक्स आणि ड्रेस शिवायला देण्याचं धाडस करायला लागल्या. माझ्याच काय, पण त्यांच्या कपड्यांवरही मी प्रयोग करायला लागले.
या सगळ्या काळात मी एक दिवस मशीन जड चालायला लागली असं आईनं म्हणताच धाडस करून स्व्रू ड्रायव्हर घेऊन मशीन उघडली. त्यात अडकलेले दोरे आणि कचरा साफ केला, मशीनचं ऑईल सगळ्या पार्ट्सवर सोडलं आणि पुन्हा सगळं जसंच्या तसं लावलं. यातच कधी मशीनची वादी ढिली व्हायची. (चामड्याची असल्यानं) तेव्हा मशीनच्या स्पीडमध्ये फरक पडायचा. ती अडकवलेल्या तारेतून काढणं आणि तिचा तुकडा कापून पुन्हा टाईटपणे ती तार लावणं यातही मी वाकबगार झाले. या यंत्रातल्या बारीकसारीक खोडीही मला छान कळू लागल्या. माझी ही आवड बघून एके दिवशी आईनं मला औरंगाबादला भाग्यनगरमध्ये असलेल्या पानसे आजींकडे शिवणकाम शिकायला नववीच्या सुट्टीत पाठवलं.
पानसे आजी ही खूपच गोड बाई होती. गोरीपान, घारे डोळे, नऊवारी साडी आणि चेहर्यावर बुद्धिमत्तेचं तेज....चिकित्सक...माझ्याकडे बघून इतकी लहान मुलगी काय शिकणार असं त्यांना वाटलं असावं. पण पहिल्याच दिवशी मी जे काय शिवून दाखवलं त्यामुळे त्या एकदम खुश झाल्या. मग साधारण एक महिनाभर मी एक दिवसाआड त्यांच्याकडे सायंकाळी पाच ते सहा या वेळात जायला लागले. या काळात त्यांनी मला गणिती पद्धतीनं शिवणकाम शिकवलं. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. माझ्या नजरेला जे खटकेल ते अंदाजे नीट करणं इतकंच मला येत होतं. किंवा जुने कपडे उसवून त्यापेक्षा थोडी जास्त जागा सोडून ते कापणं आणि शिवणं इतकंच ठाऊक होतं. पण पानसे आज्जीनं मला कपडा सरळ कसा घडी करून कापताना घ्यायचा. आडव्यात कपडा नीट शिवला जात नाही आणि अंगावर नीट बसतही नाही हे सांगितलं. शोल्डरच्या निम्मे करून त्यात अर्धा इंच मिसळायचा, छातीचा चौथा भाग अधिक चार इंच, छातीचा पाचवा भाग आणि अर्धा इंच, अशा अनेक गोष्टी सांगितल्या आणि मी भराभर शिकले. या शिकण्यानं माझ्यातला कॉन्फिडन्स वाढला.
दहावीत असल्यापासूनच कपड्याचा पोत, दर्जा, टिकाऊ रंग यातल्या अनेक गोष्टी मला समजायला लागल्या. स्लिव्हलेस, मेगॉ स्लिव्हज, लांब बाह्या, फुग्याच्या बाह्या कापताना मापं कशी बदलतात हे लक्षात आलं. माझ्या मैत्रिणी आणि नंतर त्यांच्या मैत्रिणी अशा अनेकांची गर्दी माझ्याकडे वाढली. आई या प्रकाराला वैतागायची. पण मला खूप आवडायचं. मी कितिक मैत्रिणींचे कपडे शिवून दिले असतील याची तर गिनतीच नाही. पुढे तर मी कटपिसेस आणून त्यांचे छान छान माझ्या मनात येतील त्या कल्पना वापरून पंजाबी ड्रेसेस, गाऊन्स, मॅक्सी, स्कर्टब्लाऊज, लहान बाळांचे वेगवेगळ्या प्रकारचे राहिलेल्या कपड्यांतून फ्रॉक्स, झबली, दुपटी असं काय काय शिवायला लागले. यातून व्याप वाढला आणि येणारी मंडळी मला पैसेही द्यायला लागली. मी स्वतः मात्र कधीच कोणाला पैसे मागितले नाहीत.
माझी ही कीर्ती ऐकून एकदा तर एका शाळेनं त्यांचं य्ाुनिफॉर्म शिवायचं कॉन्ट्रॅक्टच मला दिलं. एवढं मोठं काम मी कधीच केलं नव्हतं. पण तेही यशस्वीरीत्या पार पाडलं. आजही रेडिमेडचा जमाना असला तरी माझे साडीवरचे ब्लाऊज, गाऊन्स, पंजाबी ड्रेसेस, साडीचा फॉलपिको करणं हे मी स्वतः स्वतःचं अजूनही करते. आज माझ्याकडे शिलाई मशीन नाही, पण मी जेव्हा मुंबईला अंधेरीला माझ्या शोभना गोडबोले या मैत्रिणीकडे जाते, (तिलाही हे सगळं उत्कृष्टरीत्या येतं) तेव्हा मला ब्लाऊज शिवायचेत सांगितलं की दुपारी, रात्री ती तिची इम्पोर्टेड मशीन काढून माझ्यासमोर ठेवते आणि माझं काम आमच्या गप्पांच्या साक्षीनं सुरू होतं. आज फेसबुकवरची मैत्रीण सायली राजाध्यक्ष हिची साड्यांची निवड, त्यातली रंगसंगती, तिचं स्वतःचं साडीमधलं क्रिएशन बघते तेव्हा तिचा खूपच अभिमान वाटतो. आज हे सगळं आठवताना या सगळ्या गोष्टीतला आनंद कळतोय. या गोष्टींनी नकळत मला स्वावलंबनाचे धडे दिले. प्रत्येक कामातला आनंद काय असतो, कुठलंच काम कमी दर्जाचं नाही हेही नकळत शिकवलं. निर्णयक्षमता दिली आणि कलेचं एक सुंदर दालन उघडं करून दिलं.
-दीपा.
Add new comment