पुण्यातलं पु. ल. देशपांडे जपानी उद्यान
ठरल्याप्रमाणे मी आणि अपूर्व घरातून सकाळी साडेसहा वाजता पुण्यातल्या पु. ल. देशपांडे जपानी उद्यानाच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. आतमध्ये जाताच जादू घडावी तसंच झालं. मनातल्या विचारांची गर्दी एकदम पांगली आणि मन शांत शांत झालं. मी पावलं टाकू लागले तसतसं मला आजुबाजूला मोहात पाडावं असं वातावरण दिसू लागलं. बाजूला बांबूचं वन, मध्ये तळं, त्यातली छोटी छोटी तीन बेटं, उडणारे कारंजे, छोटे छोटे खळखळत वाहणारे ओढे, झरे.....उंच टेकडी....ठिकठिकाणी बसायला लाकडी बाकडी, समोर दिसणारे हिरवेगार डोंगर, मात्र ते उंचच उंच झाडांच्या पडद्याआड दडलेले.....उंचापासून ते खालपर्यंतची झाडी गडद हिरवी, फिकट हिरवी अशा हिरव्याच रंगांच्या विविध रंगछटांमध्ये नजरेला पडत होती....मध्येच माझ्या डाव्या हाताला भातशेतीचे वाफे दिसले. एका ठिकाणी खळखळणार्या पाण्यातून वाट काढत एक तरूण चालतानाही दिसला. प्रत्येक ठिकाणच्या धबधब्यांचा, ओढ्यांचा पाण्याचा आवाज निरनिराळा होता. कुठे ते वेगात कोसळत होते, तर कुठे त्यांचं संगीत मनाला शांत करत धावत होतं. अतिशय स्वच्छ आणि देखणं असं हे उद्यान!
जपानमधल्या ओकायामा शहरातल्या कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर हे निर्माण केलं गेलं आहे. कोराक्वेन उद्यानाला ३०० वर्षांचा इतिहास आहे. पुण्यातलं हे जपानी पद्धतीचं उद्यान भारतातलं एकमेव उद्यान आहे. खरं तर जपान आणि भारत यांच्यातल्या मैत्रीचं हे प्रतीक म्हणता येईल. या उद्यानाचे निर्माते अधिकारी समीर खळे आज स्वतः हे उद्यान दाखवण्यासाठी इतक्या सकाळी उद्यानात आले होते. समीर हे आसावरीचे मित्र! समीर आणि त्यांची पत्नी मोनिका दोघंही अतिशय मनमिळाऊ, त्यांच्या अधिकारपदाचा बडेजाव कुठेच औषधालाही जाणवला नाही. सोबत त्यांचे सहकारी देखील होते. या उद्यानाची निर्मिती करताना जपानमधून आलेली मंडळी, त्यांनी पुण्यात अनेक जागा कशा बघितल्या आणि अखेर सध्याची ही जागा त्यांना कशी पसंत पडली हे समीर सांगत होते. आता जिथे अप्रतिम असं उद्यान आहे, तिथे कोणे एके काळी कचर्याचा ढीग आणि अतिशय दुर्लक्षित अशी ती वाईट्ट जागा होती. पुणे महानगरपालिकेनं ती जागा उद्यानासाठी दिली आणि उद्यानाचं काम सुरू झालं. सुनिताबाईंच्या मनातल्या उद्यानाबद्दलच्या काय कल्पना आहेत याचीही आपल्या अधिकार्यांनी विचारणा केली. तसंच उद्यानाला पु.लं.चं नाव देण्याविषयीची परवानगीही मागितली.
सुरुवातीला या उद्यानाचं नाव पुणे-ओकोयामा मैत्री उद्यान असं होतं. जपानी क्वोरोक्वेन या उद्यानाच्या धर्तीवर हे उद्यान निर्माण करायचं असल्यामुळे आपल्याकडली काही निवडक मंडळी जपानमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेली. गंमत म्हणजे आपल्याकडून गेलेल्या मंडळींना जपानी भाषा येत नव्हती आणि इंग्रजीही येत नव्हती. जपानी लोकांचंही तसंच होतं. त्यांना इंग्रजी आणि मराठी दोन्हीही भाषा कळत नव्हत्या. पण तरीही या मंडळींचं आपसांत खूप चांगलं जमलं आणि भाषा न समजताही प्रशिक्षण उत्तम झालं. जपानमधून पाच-पाच च्या गटानं तज्ज्ञ मंडळी पुण्यात येत राहिली. नैसर्गिक वाटावं असं कृत्रिमरीत्या हे उद्यान उभं करायचं होतं. वाद्योलीच्या खाणीतून दगड शोधण्यात आले. कृत्रिमरीत्या टेकड्यांची रचना करण्यात आली. चहूबाजूंनी भिंती किंवा पडदे उभारावेत अशी झाडी लावण्यात आली. पुण्यातल्याच नव्हे तर इतरत्र असलेल्या नर्सरीज पालथ्या घालण्यात आल्या. दगडं, झाडं यांची निवड परिश्रमपूर्वक करण्यात आली. धबधबा किंवा ओढयातल्या पाण्याचा आवाज कसा आला पाहिजे याचीही अनेकवेळा चाचणी घेण्यात आली. हवा तसा आवाज येईपर्यंत जपानी मंडळी ते काम अविरतपणे पुन्हा पुन्हा करत राहिली. एक एक दगड लावताना तो नैसर्गिक कसा दिसेल याकडे त्यांचं कटाक्षानं लक्ष असे. या काळात जपानी लोकांचं कामातलं पर्फेक्शन आणि परिश्रम करण्यासाठीची अफाट जिद्द समीर खळेंच्या लक्षात आली. त्याचबरोबर त्यांची सौंदर्यदृष्टीही त्यांना जाणवली.
अग्नी, सुसंगती, रेषा, आत्मा, विश्व आणि जल ही जपानी उद्यानाची मूलतत्वं आहेत. या तत्वांचा अनुभव ठिकठिकाणी या उद्यानांमध्ये फिरताना येतो. जपानी लोकांच्या उद्यानात प्रकाश आणि अंधार, कठीणपणा आणि मृदूपणा, निश्चलता आणि गती, उष्ण आणि थंड अशा वैविध्यपूर्ण अनुभवांची जाणीव होत राहते. यिन आणि यान तत्वज्ञानावर जपानी उद्यानं निर्माण केली जातात. त्यामुळे मनाला एक वेगळीच शांतता अनुभवता येते. दहा एकर जमिनीवर पुण्यातलं हे पु. ल. देशपांडे उद्यान पसरलेलं आहे. वर्षभरातल्या प्रत्येक बदलत्या त्रतुंचं वेगळंच दर्शन या उद्यानात घडतं. पहाटे 6 पासून या उद्यानात चहलपहल सुरू होते, ती सकाळी ११ वाजेपर्यंत आणि नंतर ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत! या उद्यानाची मजा म्हणजे कितीही कसेही चालत राहा, चढउतार जाणवतच नाहीत अशी इथली रचना आहे. अगदी टेकडीच्या पायर्या चढतानाही दम लागत नाही. कृत्रिम असूनही नैसर्गिक असल्याचा प्रत्यय सतत येत राहतो. इथंच मुघल उद्यानही आहे. मात्र त्याचं दुरुस्तीचं काम आणखी महिनाभर चालणार असल्यामुळे आणि त्याचं खरं रूपडं सायंकाळी बघण्यासारखं असल्यामुळे आता महिन्याभरानंतर सायंकाळी येऊ असं आम्ही ठरवलं.
समीर खळे यांनी त्यांच्या मुंबई-पुणे अशा व्यस्त दिनक्रमातून आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार कसे मानावेत हा प्रश्नच आहे. माझ्यासोबत एक सिंंफनी असल्यामुळे समीर आणि मोनिका आदरपूर्वक भेट दिलं. त्यांच्या सहकार्यांनी उद्यान फिरून आल्यावर आमचा पाहूणचारही केला. त्या सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही घरी परतलो.
मनाला समाधी अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जरूर जरूर पु.ल. देशपांडे उद्यानाला भेट द्या. थँक्स आसावरी आणि थँक्स समीर!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment