बुद्धपोर्णिमा आणि नाणेघाट - नानाचा अंगठा आणि मधुर आठवणींसोबतचा तुफानी वारा!

बुद्धपोर्णिमा आणि नाणेघाट - नानाचा अंगठा आणि मधुर आठवणींसोबतचा तुफानी वारा!

तारीख

२१ आणि २२ मे २०१६ हे दोन दिवस ‘अविस्मरणीय’ या शब्दांभोवतीच घुटमळत राहतील हे नक्की!

२१ मे २०१६ ला आम्ही रत्ना हॉस्पिटलमध्ये एका मित्राला भेटायला गेलो असताना मनोज हाडवळेच्या फोनमुळे बुद्धपोर्णिमा साजरी करण्यासाठी अचानक जुन्नरकडे आमच्या गाडीची चाकं वळली. मनोज हाडवळे हा एक भन्नाट तरूण आहे. चौकटीतलं आयुष्य जगायचं नाही हे ठरवून त्यानं आपली पावलं कृषी पर्यटनाकडे वळवली आणि तो तिकडेच वळाला. काहीच वर्षांपूर्वी तो आणि त्याच्यासारखेच काही वेडे मित्र एकत्र आले आणि त्यांनी ‘इडियट’ नावाचा आपला ग्रुप स्थापन केला. या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त इडियट (थोडक्यात लौकिकार्थानं बावळट!) लोकांनाच प्रवेश मिळतो. एकत्र जमून ही मंडळी धूम करत असतात. या ग्रुपनं बुद्धपोर्णिमा साजरी करण्याचं ठरवलं. या ग्रुपबरोबरच आर्याबाग सांस्कृतिक ग्रुपच्या वतीनं मी, मनोज, कल्याण तावरे आणि दत्ता बाळसराफ असे त्यांच्यात सामील झालो. या सगळ्यांमध्ये मी एकटीच स्त्री असल्यानं सगळे इडियट सुरुवातीला अवघडल्यासारखे झाले. पण काहीच मिनिटांत ते अवघडलेपण दूर झालं आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. ते इडियट आणि आम्ही ठार वेडे असे एकत्र आलो होतो!

नाणेघाटाच्या परिसरात फिरताना मनोज सातत्यानं प्रत्येक ठिकाणाची माहिती उत्साहानं देत होता. एकीकडे दिवस मावळतीला येत चालला होता आणि त्यात मनोजनं सातवाहनांचा सांगितलेला इतिहास, त्याबद्दल साक्ष देणारे प्राचीन शिलालेख आणि समोर भविष्याची स्वप्नं रंगवायला सांगणारा सूर्यास्त यात आम्ही सगळेच रंगून गेलो होतो. जाईपर्यंत जुन्नर आणि नाणेघाट याविषयी मला फारशी काही माहिती नव्हती. तिथे जाताच भर टळटळीत उन्हाळ्यात तिथला हिरवागार निसर्ग पाहून आश्‍चर्याचा धक्काच बसला. खरंच पुण्याजवळच्या जुन्नर इथल्या नाणेघाट या पश्‍चिम घाटातल्या डोंगराला पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. २००० वर्षांपूर्वीच्या काळात नेऊन सोडणारा परिसर...सातवाहनांचा कालावधी आणि व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या जीर्णनगरी (आताचं जुन्नर) इथले धान्याचे रांजण आणि व्यापाराची व्यवस्था बघून थक्कच झाले. त्या वेळी सातकर्णी यांचं राज्य या भागात होतं. सातकर्णीची राणी नागणिका ही अतिशय कर्तबगार राणी होती आणि ती या व्यापारावर देखरेख ठेवायची. इथे असलेल्या गुहा ती आणि तिच्या कुटुंबाविषयी माहिती सांगतात. तिथे त्यांचे राजा असलेला रायासी, सीमुका, सिरीमातो देवी, नागणिका, राणो, राजपुत्र कुमार, महारथी या राजघराण्यातल्या मंडळींचे पुतळे कोरलेले होते. शिवाय ब्राह्मी लिपीत अनेक गोष्टी तिथे नोंदवून ठेवलेल्या आहेतच. 

काहीच वेळात सूर्यास्त झाला, अंधारून आलं आणि भेळ आणि चहा यांचा आस्वाद घेऊन झाल्यावर सगळयांना आता २३०० फूट उंचीचा नानाचा अंगठा चढायचा होता. मला वाटलं, अगदी वरती माथ्यापर्यंत गाडीनंच जायचं. पण प्रत्यक्षात मात्र पायथ्याशी गाड्या थांबल्या आणि सगळे इडियट्स खाली उतरून नानाचा अंगठा सर करण्यासाठी उत्साहानं अंधारात वाट काढायला लागले. मला तर मागंही फिरता येईना आणि पुढे जायची हिम्मत होईना. कारण माझं कमी असलेलं हिमोग्लोबिन, बी-१२, व्हिटॅमिन सगळेच मला भीती दाखवायला लागले. पण भिडेपोटी मी तशीच पावलं पुढेच उचलली. मनोजनं माझ्याकडे बघितलं आणि माझ्यासमोर हात पुढे केला. त्याच्या हातात हात सोपवल्यावर मात्र मला त्या हाताच्या स्पर्शानं इतका विश्‍वास दिला की आपण आता पडणार नाही, त्याच्या पाठोपाठ हवं तितकं अंतर पार करून शकतो असं वाटायला लागलं. इतकी काळजी, इतका स्नेह आणि हळुवार बोलणं....मनोजशी एक दृढ नातं त्याच क्षणी तयार झालं. माझ्यासमोर सगळीच इडियट मंडळी वेगात चालली होती. हा डोंगर चढा किंवा खडा म्हणूया. लहान मुलांसारखी पटापट गप्पा मारत चाललेली ही मंडळी बघून मी मला लागलेला श्‍वास, दम विसरून जात होते. बघता बघता आम्ही वर पोहोचलो. 

चंदाचा प्रकाश, प्रचंड तुफानी वारा, अंगाला वाजणारी बोचरी थंडी आणि थोडंही हाललो तर कागदासारखे उडून जाऊ अशी परिस्थिती! आम्ही त्या टोकावरच्या चिंचोळ्या जागेत सगळे कसेबसे दाटीवाटीनं बसलो. सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं. वय वर्ष २५ पासून ६५ पर्यंतचे तरूण जोरजोरात आरडाओरडा करत होते. विषय होता, प्रत्येकाच्या जीवनात आलेली आर्ची! ज्याची वेळ येईल तो हातात मोरपीस घेऊन आपल्या मोरपिशी आठवणी उलगडून सांगत होता. कोणाचं शाळेतलं प्रेम, कोणाची परिस्थितीमुळे झालेली ताटातूट, कोणाची चिकाटीनं पूर्ण केलेली प्रेमकहाणी, इच्छा असूनही घेतलेली कोणाची माघार...हे सगळं ऐकताना खूपच मजा आली. प्रत्येकाची प्रेमकथा अनोखी होती. जणूकाही आत्ताच सगळं घडलं असावं असा भास होत होता. माझ्याही आयुष्यातला परश्या मला आठवत होता ..... १२-१२.३० नंतर रात्री आदिवासींनी केलेलं चिकन, तांदळाची भाकरी आणि माझ्यासारख्या व्हेजवालीला चविष्ट पिठलं खायला मिळालं. गप्पा पहाटे साडेचारपर्यंत रंगत गेल्या. या वेळी हा नवा इडियट ग्रुप बरोबर असला, तरी आर्याबागच्या सगळ्यांचीच खूप आठवण येत होती. सगळेच जण असायला हवे होते हे सतत जाणवत होत. सुचेता, प्रतिभाताई, आसावरी, गायत्री, उषा, श्रीनिवास, नीलिमा (स्क्वेअर), ऋतू, चिऊ, भास्कर, संजीव, संगीता, वंदना, वनिता, दर्शन, प्री, किरण, प्रीती, रिया, योगिता, सुवर्णरेहा, ज्ञानेश्‍वर, सुवर्णसंध्या, महेश, हेमंत किती नावं घेऊ? नाणेघाटातून खाली उतरतानाही हे सगळेजण बरोबर होतेच शिवाय प्रत्येकाला त्याच्या आठवणींचं मोरपिस सुखावत होतं. प्रत्येकाची आर्ची त्याला या चांदण्या रात्री सोबत करत होती. 

परतीच्या प्रवासात एक एक पाऊल उतारावरच्या दगडांवर टाकणं खूपच कठीण आहे हे मला जाणवायला लागलं. बेसबॉल किंवा बॅडमिंटन याशिवाय एकही मैदानी खेळ न खेळलेली मी आज एवढा मोठा डोंगर चढून गेले हा मलाच मोठा धक्का होता. याच वेळी राजूभाऊ आणि आम्ही सगळे ज्यांना कॅप्टन म्हणत होतो असे दोघंही दोन्हीकडून पुढे आले, त्यांच्या हातात आता माझे दोन्ही हात मी दिले होते. अतिशय काळजीपूर्वक ते मला खाली उतरायला मदत करत होते. गप्पाही मारत होते. मी थकले नाही ना हेही सारखं बघत होते. वर जाताना आणि खाली येतानाही मला थंडी वाजतेय बघून जर्किन आणण्यासाठी पळणारा, घशाला कोरड पडली असेल म्हणून प्यायचं पाणी घेऊन धावत येणारा राजू....माझा कोण? कॅप्टनला तर मी प्रथमच भेटत होते, पण त्यांच्या हाताचा स्पर्श किती विश्‍वास देत होता. ‘मै हूँ ना’ हेच सांगत होता. त्या दोघांच्या बोलण्याला हुंकार भरत मी खाली उतरत होते. पण भरलेले डोळे टपटपत होते. कोणालाही ते दिसणं शक्य नव्हतं. पण इतका स्नेह, इतकं प्रेम मला कसं व्यक्त करावं तेच कळत नव्हतं. असलाच कुठे तर तो बुद्ध साक्षीला होताच!

तास-दोन तासही पुरती झोप होते न होते तोच आम्ही पुन्हा उठलो. आता नाणेघाट धुक्यात वेढलेला होता. माझी नजर समोर गेली आणि आपण कुठल्या धुनकीत वर जाऊ शकलो हे खरंच कळत नव्हतं. एवढा डोंगर चढून आणि उतरूनही सगळेच दोन तासाच्या झोपेनंही उत्साहानं झिंगले होते. चहा पिऊन सगळ्यांनी झिंगाटवर चक्क नाचायलाच सुरुवात केली. मलाही त्यात खेचून घेतलं. नाचता येत नसूनही माझीही पावलं थिरकायला लागली. जल्लोष सुरू होता. 

काहीच वेळात आम्ही पुन्हा जुन्नरकडे वळलो आणि तिथलं कुकडेश्‍वर मंदिर बघितलं. मध्येच पुन्हा मिसळ आणि भजी असा नाश्ता गप्पांच्या संगतीत केला आणि बघता बघता निरोपाची वेळ झाली. निरोप घेताना मन जड झालं. काल अनोळखी असलेली सगळीजण आज अचानक जिवाभावाची झाली होती. पुन्हा भेटावं लागणारच असं न बोलता सांगत आम्ही निरोपाचे हात केले. त्यानंतर आम्ही मनोजच्या पराशर कृषि केंद्रालाही भेट दिली. तिथेच साधं पण चविष्ट जेवण केलं. मनोज आणि त्याची आर्ची नम्रता यांच्या सान्निध्यात थकवा छू मंतर झाला. तिथल्या रणरणत्या उन्हाळी वातावरणाला नम्रतानं गार, टवटवीत केल्याचा प्रत्यय येत होता. इडियट ग्रुप, मनोज, नम्रता यांची अदृश्य सोबत घेऊन आमची गाडी पुण्याच्या दिशेनं धावू लागली!

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.