कण कण संगीत झाला
एखादी कला तुमच्याजवळ असली की ती तुम्हाला सुखात, दुःखात प्रत्येक क्षणी साथ देते, सोबत करते. जगण्याचं बळ देते, संकटांना सामोरं जाण्याचं साहस देते. त्यातलीच संगीत ही कला जिच्याजवळ असेल ती व्यक्ती खरंच भाग्यवान! स्वतःला जेवढा आनंद ती देते, तितकाच दुसर्याला...आणि केवळ दुसर्यालाच नव्हे तर सगळा आसमंत, सगळा परिसर ती आपल्या सुरांनी दरवळून टाकते.
हे सगळं मनात येण्याचं कारण म्हणजे आजचा कार्यक्रम - भूमिका निर्मित, स्वरनिनाद तर्फे सादर - हे सगळं मनात येण्याचं कारण म्हणजे आजचा कार्यक्रम - भूमिका निर्मित, स्वरनिनाद तर्फे सादर - कण कण संगीत झाला!
काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण उज्ज्वला आचरेकर गोव्याहून आली आणि तिनं तिच्या पराग एडवणकर या भावाशी ओळख करून दिली. परागनं मला १० मार्चला पं. भीमसेन जोशी कलामंदिरात होणार्या संगीतमय कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि मी होकार दिला. आज अपूर्व आणि मी अगदी वेळेवर हॉलवर पोहोचलो. श्री आणि श्रीमती पराग एडवणकरांना भेटून आपल्या जागेवर स्थानापन्न झालो. बघता बघता हॉल भरला आणि समोरचा पडदा वर सरकला...कार्यक्रमाला सुरुवात झाली. विख्यात कवी जगदीश खेबुडकरांच्या गीतांवर आधारित 'कण कण संगीत झाला' हा कार्यक्रम प्रख्यात गायक निनाद आजगावकर हे आपल्या सहकलाकारांसह सादर करणार होते.
जगदीश खेबुडकर यांचा जन्म कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावात १९३२ साली झाला. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांचं घर जाळलं गेलं, तेव्हा जगदीश खेबूडकर अवघे १६ वर्षांचे होते. त्या वेळी सर्वत्र उसळलेला दंगा आणि आक्रोश पाहून त्यांच्या पहिल्या कवितेनं जन्म घेतला. 'मानवते तू विधवा झालीस' ही ती कविता! शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तब्बल ३५ वर्ष शिक्षक म्हणून काम केलं.
जगदीश खेबुडकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ३५०० हून अधिक कविता लिहिल्या. ४००० हून अधिक गाणी लिहिली आणि ३५० चित्रपटांसाठी गीतरचना केली. याचबरोबर त्यांनी २५ कथा आणि ५ नाटकं देखील लिहिली. त्यांची सर्वाधिक गाजलेली गीतं 'पिंजरा', 'सामना', 'साधी माणसं', 'चंद्र होता साक्षीला', 'अष्टविनायक' या चित्रपटांतली होती. साधी सोपी शब्दरचना आणि हृदयाला भिडणारं काव्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. भक्तिगीत असो, वा सूडगीत, प्रेमगीत असो वा अंगाई गीत, लावणी असो वा पोवाडा, अभंग असो वा समूहगीत प्रत्येक प्रकार त्यांनी कुशलतेनं हाताळला आणि त्यात आपला ठसा उमटवला. त्यांच्या एकूण ४५० लावण्या आहेत. त्यांच्या शेवटच्या काळात जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हाही त्यांनी आपली अखेरची काव्यरचना केली. राज्यसरकारनं त्यांना ११ वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केलं, तर गदिमा, फाय फाऊंडेशन, कुसुमाग्रज पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. जगदीश खेबुडकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटसृष्टीत राहूनही त्या अखेरपर्यंत निर्व्यसनी होते!
साधी माणसं या चित्रपटातली सगळी गाणी भालजी पेंढारकर लिहिणार होते. त्यांनी सगळी गाणी लिहिली, पण चित्रपटाचं थीम साँग लिहायला त्यांना वेळ मिळेना. भालजी जगदीश खेबुडकरांकडे गेले आणि त्यांना चित्रपटाचं कथानक ऐकवून म्हणाले, 'मला काही केल्या याचं थीम साँग जमत नाहीये. तू मला हे गाणं लिहून दे.' विशेष म्हणजे पुढल्या पाचच मिनिटांत शब्दप्रभू जगदीश खेबुडकरांनी साधी माणसं मधलं हे एकमेव गाणं लिहिलं. या गाण्याला लता मंगेशकर यांनी आनंदघन या टोपणनावानं संगीत दिलं होतं. ते गाणं म्हणजे ः
ऐरणीच्या देवा, तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
या गाण्यातली एक ओळ होती, 'धनी मातर माझा वाघावानी असू दे....' यातली नायिका होती जयश्री गडकर, तर नायक होते सूर्यकांत! त्यांच्याकडे बघून हीच उपमा सूचणं स्वाभाविक होतं. जगदीश खेबुडकरांनी हे गाणं लिहिताना ऐरणीच्या देवा तुला आगीफूल (अग्निफुलं) वाहू दे असं लिहिलं हेातं, पण संगीतबद्ध करताना लता मंगेशकरांना तो शब्द नीटपणे रचता येईना. तेव्हा त्यांनी खेबुडकरांना त्याऐवजी ठिणगी हा शब्द सुचवला आणि जगदीश खेबुडकरांनी तो लगेचच मान्यही केला.
'आम्ही जातो आमच्या गावा' या चित्रपटातली गाणी लिहिताना तीन चोरांवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं होतं. या चित्रपटासाठी एक गाणं असं लिहायचं होतं की ते भजनही वाटलं पाहिजे आणि त्या चोरांनाही लागू पडलं पाहिजे. जगदीश खेबुडकरांसमोर हे एक मोठं आव्हानच होतं, त्यांनी ते लीलया पेललं आणि या गाण्याला संगीत दिलं, बाबुजी यानेके सुधीर फडके यांनी. या गाण्यानं तर कमालच केली. हे गाणं होतं ः
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा,
उघड दार देवा आता उघड दार देवा
'बाई, बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला' या गाण्यात खेबुडकरांनी चिमणा हा शब्द अनेकवेळा घेतला असून प्रत्येक वेळी त्याच्यातलं सौदर्यं वेगळ्या रीतीनं आपल्यासमोर येतं. साधारणपणे आधी गीतकार गाणं लिहितो आणि मग ते संगीतबद्ध केलं जातं. मात्र 'धाकटी बहीण' चित्रपटाचे संगीतकार सुधीर फडके यांनी आधी चाली तयार केल्या आणि त्या चालींवर जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. यात पहिल्या ओळीतला पहिला शब्द दोन अक्षरी असायला हवा होता. दुसरा शब्द तीन अक्षरांचा, म्हणजे दोन तीन दोन तीन चार दोन दोन चार अशी शब्दांची कवायत त्यांना करायची होती. हे गाणं निसर्गरमय वातावरणात चित्रीत होणार होतं. हे गाणं ऐकलं की प्रेक्षकांनी त्यात धुंद होऊन जावं असं दिग्दर्शकाला वाटत होतं आणि जगदीश खेबुडकरांनी हे गाणं रचलं ः
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना.....
सामना या चित्रपटाला संगीत दिलं होतं, भास्कर चंदावरकर यांनी. जगदीश खेबुडकरांच्या शब्दाला आवाज दिला होता लता मंगेशकरांनी. या चित्रपटानं मराठी चित्रपटांची आजपर्यंत असलेली चौकटीतली व्याख्याच बदलून टाकली होती. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि कोल्ड ब्लडेड खुन्याची भूमिका निभावणारे निळू फुले यांनी गाजलेला सामना! यात सत्याचा आवाज दडपणारं वातावरण, एक शांत असा महाल आणि यात गाणारी नर्तकी उषा नाईक नियती बनून गात होती हे गाणं ः
सख्या रे घायाळ मी हरिणी
पिंजरा या चित्रपटातली सगळी गाणी लिहून झाली होती. चित्रीकरणासाठी सगळीजण कोल्हापूरला पोहोचली होती. अनंत माने, राम कदम वगैरे मंडळी गप्पा मारत असताना अनंत माने यांनी रामभाऊंना आग्रह केला आणि एक लकेर रामभाऊंनी घेतली. ती लकेर ऐकून बाहेर येरझारा मारत असलेले व्ही. शांताराम आत आले. त्यांनी रामभाऊंना ती लकेर पुन्हा घ्यायला लावली आणि जगदीश खेबुडकरांना म्हटलं, 'काढा तुमचा कागद पेन आणि या लकेरीला घेऊन तमासगीरांचं अवघं जगणं दिसेल असं गाणं लिहून काढा.' जगदीश खेबुडकरांनी गाणं लिहिलं, जे खरं तर शेवटी लिहिलं गेलं, पण पिंजरा चित्रपटात सगळ्यात पहिलं म्हणून झळकलं, विष्णु वाघमारे या गायकानं गायलेलं गाणं बाहेर पडलं तेही निळू फुले यांच्या ओठांतून. ते गाणं होतं ः
ग साजणी, कुण्या गावाची, कुण्या नावाची, कुण्या राजाची तू ग राणी
चंद्र आहे साक्षीला, मी आज फूल झाले, या भावजी तुम्ही बसा रावजी, मला म्हणतात लवंगी मिरची, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, दे रे कान्हा चोळी अन लुगडी, स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी, मी आज फूल झाले, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, विठू माऊली तू माऊली जगाची, एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी सजला ग, हाती नाही येणे, नाचत नाचत गावे, धुंद एकांत हा, हाती नाही जाणे, मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागल मला, किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदीआनंद झाला, यासह अनेक गाणी निनाद यांनी आपल्या सहकलाकारांसह गायली. एका आकंठ तृप्तीचा अनुभव मिळाला. अनेक गाण्यांमागच्या वैयक्तिक आठवणी जाग्या झाल्या. आमच्या शेजारी राहणार्या, माझ्यावर प्रेम करणार्या सांगवीकर काकू मला लहानपणी नेहमी गाणं गायचा आग्रह करत. भुताखेतांच्या गोष्टी सांगणं आणि गाणी गाणं हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. त्यांनी आग्रह करायच्या आतच मी 'किती सांगू मी सांगू कुणाला' (आणि आज गोकुळात रंग खेळतो हरी, तसंच पुढे कॉलेजला गेल्यावर जिथे सागरा धरणी मिळते, जीवनात ही घडी अशीच राहू दे, ही गाणी लगेचच एकापाठोपाठ एक) गावून दाखवायची.
जगदीश खेबुडकरांचं प्रत्येक गाणं वैविध्यानं नटलेलं! त्यांचं अष्टविनायक चित्रपटातलं गाणं अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं तर सगळ्यात मोठं म्हणजे १८ कडव्यांचं. एकीकडे पिंजरामधल्या गाण्यात ते लिहितात, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, तर त्याच वेळी ते दुसरीकडे लिहितात, काल म्हण तुम्ही तमाशाला गेलात, कमरेचा ऐवज विसरून आलात हे वैविध्य जगदीश खेबूडकरांच्याच लेखणीतून उतरू शकतं! नवरंग चित्रपटातल्या एका गाण्यावर आधारित गाणं लिहायला सांगितलं, तेव्हा राधे नाच नाच उडवू या रंग, एकदा सुषमा शिरोमणी हिनं गाण्यात हनिमून हा शब्द हवा आहे असं सांगितलं आणि खेबूडकरांनी कुठ कुठ जायाचं हनिमूनला हे गाणं लिहिलं. दादा कोंडके यांना आपल्या गाण्यात ढोंग आणि सोंग हे शब्द हवे होते तेव्हा जगदीश खेबूडकरांच्या लेखणीतून लबाड लांडगं ढाँग करतंय, लगीन करायचं सौंग करतंय हे गाणं उतरलं. तसंच धुंद या शब्दाला घेऊन खेबूडकरांनी जेवढी गाणी लिहिली, कदाचित मराठीत तेवढी गाणी दुसर्या कोणी लिहिली नसावीत. तसंच पिंजरा या चित्रपटासाठी खेबूडकरांनी एकूण किती गाणी लिहिली असावीत? दहा, वीस, तीस, पन्नास नव्हे तर तब्बल ११० गाणी त्यांनी लिहिली आणि त्यातली ११ शांतारामबापूंनी निवडली. पिंजर्यातल्या एका लावणीसाठी खेबूडकरांनी ४८ वेळा वेगवेगळ्या रचना लिहिल्या, मात्र मनासारखं घडत नव्हतं. सकाळी ९ वाजल्यापासून खेबूडकर लिहीत होते ते रात्री दोन वाजेपर्यंत ४८ रचना झाल्या तरी, शांतारामबापूंच्या हृदयाला भिडत नव्हत्या. अखेर वीज चमकावी तशी एक रचना खेबूडकरांना स्फूरली आणि ती त्यांनी शांताराम यांना ऐकवताच त्यांनाही ती खूपच आवडली आणि ती पिंजर्यात समाविष्ट तर झालीच, पण ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल’ ही ती लावणी प्रचंड गाजली.
जगदीश खेबूडकरांच्या गीतांवर आधारित सादर होत असलेल्या प्रत्येक गीताला श्रोत्यांचा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रतिसाद मिळत होता. निनाद आजगावकर यांच्या आवाजलं वैविध्य त्या त्या गाण्यातल्या भावाप्रमाणे बदलत होतं. त्यांना शिल्पा, केतकी आणि वादक कलाकार यांची अप्रतिम अशी साथ होती. कुठल्याही कार्यक्रमात तो चांगला होणं किंवा न होणं हे सर्वस्वी त्याचा निवेदक कसा असतो यावरही बर्याच प्रमाणात अवलंबून असतं. पण इथं मंदार खराडे यांनी आपल्या बहारदार निवेदनातून खेबुडकरांच्या, बाबुजींच्या, गदिमांच्या सुपुत्राच्या आनंद माडगुळांच्या आठवणी तर सांगितल्याच, पण त्या त्या गाण्यांमागचे किस्से आणि प्रसंग सांगून खरोखरंच बहार उडवून दिली. तसंच पराग वैशाली एडवणकर आणि टीम, तुमच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचला. तुमचे आभार कसे मानावेत? तुमची सगळी धावपळ आणि परिश्रम लक्षात येत होते.
निनाद आजगावकर यांचा कण कण संगीत झाला या कार्यक्रमाप्रमाणेच स्वरनिनादतर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट यांच्या कवितांवर कार्यक्रम, गीतरामायण हा रामायणावरचा संस्मरणीय कार्यक्रम, नाद विठ्ठल विठ्ठल, ज्योतीने तेजाची आरती हा पुल देशपांडे, गदिमा आणि सुधीर फडके यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम, महाराष्ट्रातल्या सणांवर आधारित कार्यक्रम महाराष्ट्र देश सुजलाम, यशवंत देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तुझे गीत गाण्यासाठी हा कार्यक्रम, ओपी नैय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित मै प्यार का राही हॅूं कार्यक्रम, एसडी बर्मन आणि आरडी बर्मन यांच्या संगीतावर आधारित बर्मन लिगसी हा कार्यक्रम, प्रेमगीतांवर आधारित कार्यक्रम पल पल दिल के पास सादर केले जातात. आपण यातला कुठलाही कार्यक्रम आयोजित करून आनंद घेऊ शकता!!!
खरं तर कण कण संगीत झाला हा कार्यक्रम म्हणजे आम्हा सर्व श्रोत्यांसाठी एक अनोखी पर्वणीच होती. एकीकडे जगदीश खेबुडकरांची गीतरचना, तर दुसरीकडे बाबुजी (सुधीर फडके) यांचं संगीत, गाताहेत निनाद आजगावकर आणि मागे पडद्यावर त्या गीताचं दृश्य स्वरूपातलं चित्रण दिसतं आहे. मध्येच जगदीश खेबुडकर मागच्या पडद्यावरून प्रसन्न मुद्रेनं आपल्याकडे बघताहेत, सहकलाकारांची वाद्यांची समर्पक साथ सगळ्या वातावरणात परिपूर्णता आणतेय असं सगळं.....! कालची संगीत रजनीनं खरोखरंच शरीराचा आणि मनाचा कण आणि कण संगीतमय झाला.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment