उज्ज्वला आचरेकर आणि कुकिंग क्लास

उज्ज्वला आचरेकर आणि कुकिंग क्लास

तारीख

२३ आणि २४ फेब्रुवारी २०१९ हे दोन दिवस औंध, परिहार चौक इथं तरुणाईबरोबर पदार्थांच्या दरवळणार्‍या सुवासात गेले. अपूर्वला व्हेज आणि नॉन व्हेज डिशेस शिकायच्या होत्या आणि मी मैत्रिणीला मदत करण्यासाठी ....(अर्थातच, मी काडीचीही मदत केली नाही ही गोष्ट वेगळी!)

उज्ज्वला आचरेकर हे माझी गोवेकरीण मैत्रीण! सुविद्य, देखणी, अंगी नाना कलागुण असलेली, उत्साही आणि प्रेमळ! लग्न करताना तरुणाईनं मानसिकरीत्या कसं तयार असायला हवं यासाठी तिचा 'लग्ना, तुझा रंग कसा' हा कार्यक्रम गोव्यापासून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आयोजित केला गेला आणि त्याचा सहभागी तरुणाईला लाभही झाला. 

आजकाल शिक्षण संपलं की मुलं-मुली नोकरीला लागतात, किंवा परदेशी जातात त्या वेळी बाहेरचं खाणं नकोसं होतं, कधी ते परवडत नाही आणि कधी तर त्या खाण्यानं आजारी पडणंही होतं. अशा वेळी या मुलामुलींसाठी उज्ज्वलानं खूप चांगल्या पद्धतीनं मेन्यू निश्चित केला आणि कमीत कमी वेळात ही मुलं स्वयंपाक कसा बनवू शकतील याचा अभ्यास केला. उज्ज्वलाचे गोवा आणि महाराष्ट्र इथे अनेक कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी संधी मिळेल तेव्हा तिला आवर्जून आपल्या गावी बोलावून स्वतःच्या हातानं तिला खाऊही घातलं, अधूनमधून आपण केलेल्या डिशेसचे फोटोही ही मंडळी उज्ज्वलाला पाठवत असतात. 

तर या दोन दिवसांपैकी पहिल्या दिवशी शाकाहारी पदार्थ उज्ज्वलानं शिकवले. १६ प्रकारच्या डिशेस तिनं शिकवल्या. पदार्थ करताना एक कुकर, दोन पॅन अशी तीनच भांडी तिनं वापरली. मिक्सरचा वापर शून्य! हळद, तीखट, आलं-लसूण, गरम मसाला, मीठ, तेल, तूप याशिवाय जास्तीचं अवडंबर नव्हतं. उज्ज्वलानं काही तंत्रं स्वतः विकसित केली असल्यानं ती इथं लिहीत नाही, पण आपण करत असलेल्या पारंपरिक पद्धतींना पूर्णपणे फाटा देत अतिशय सोप्या पद्धतीनं तिनं हे पदार्थ शिकवले. केवळ वीस मिनिटांत एकीकडे भात, किंवा मुगाची खिचडी, किंवा पुलाव, किंवा तोंडल्याचा मसालेभात आणि दुसरीकडे छानशा अनेक प्रकारच्या भाज्या, सांबार, असं तयार होत होतं. असे एकूण १६ पदार्थ, त्यात दोन प्रकारचे सूप सुद्धा होते. त्यानंतर या तयार पदार्थांना टेबलवर सजवलं गेलं आणि सहभागींनी त्यावर मनसोक्त ताव मारला. 

दुसर्‍या दिवशी मांसाहारी पदार्थ शिकायचे होते! मी तर कधी चिकन, मासे प्रत्यक्षात करताना बघितले नव्हते आणि खाण्याची गोष्ट तर दूरच! शाकाहारीपेक्षाही मांसाहारी पदार्थ बनवणं आणखीनच सोपं असल्याचं उज्ज्वलानं लक्षात आणून दिलं. इथंही मिक्सरचा वापर शून्य होता. हळद, तीखट, मसाला, आलं-लसूण पेस्ट, तेल, तूप, कॉर्नफ्लॉवर, याशिवाय काही जास्तीचं वापरायचं नव्हतं. मांसाहारी पदार्थांमध्ये खिमा असेल, बटर चिकन असेल, हराभरा चिकन असेल, खिमाडाल असेल, मेक्सिकन राईस असेल, थाई करी असेल आणि सूपचे प्रकार असतील सगळं भन्नाटच होतं. हे पदार्थही फक्त २० मिनिटांत तयार होत होते. सहभागी तरुण आनंदात स्वतःही करून बघत होते हे विशेष! कधीही नॉनव्हेजला हातही न लावणारी मी, सगळ्यांबरोबर व्यवस्थित जेवले. थोडक्यात, मांसाहारी सदस्य बनले. कुशल नावाच्या तरुणाचा वाढदिवस असल्यानं उज्ज्वलानं स्ट्रॉबेरी शिरा सगळ्यांना शिकवला. अतिशय अप्रतिम असा! स्वीट डिशवरही आम्ही मनसोक्त ताव मारला हे सांगायला नकोच!

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं उज्ज्वलाचा हा कुकिंग क्लास असतो. पूर्ण वेळ हसतमुखानं ती माहिती सांगत सांगत पदार्थ करत असते आणि करवून घेत असते. तिच्या या संपूर्ण उपक्रमात किचकटपणाला कुठेही थारा नाही. शिकणार्‍या व्यक्तीत त्याच वेळी आपण स्वयंपाक करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होतो. पदार्थ अतिशय रूचकर आणि पौष्टिक असण्याची दक्षता उज्ज्वलानं घेतलेली असते. कमीत कमी भांडी, कमीत कमी मसाले आणि कमीत कमी वेळात केलेला स्वयंपाक ही उज्ज्वलाच्या कुकिंग क्लासची देण आहे! हे सगळं नीटनेटकं करत असतानाच उज्ज्वलाचा स्टॅमिना बघणं ही अवाक् करणारी गोष्ट आहे. अशी सर्वगुणसंपन्न मैत्रीण लाभणं म्हणजे नशीब, भाग्य वगैरे....पण उज्ज्वला, तुझा खूप खूप अभिमान वाटतो! पुढल्या उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा! (एकच सूचना - उज्वला, एका दिवसांत इतके पदार्थ शिकवू नकोस. १६ ऐवजी ८ पदार्थ खूप झाले!!!)

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.