माझं बांबू प्रेम
पुस्तकं ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून गेले दोन वर्ष केनच्या दुकानात चकरा मारत होते. दोन रॅक करण्यासाठी मी अॅडव्हान्स रक्कम द्यायची, मला तो एक तारीख सांगायचा आणि मग त्या तारखेनंतर आणखी एक तारीख मग तारखांवर तारखां असा सिलसिला सुरु व्हायचा. अखेर तीन-चार महिन्यानंतर मी वैतागून दे माझे पैसे परत असं म्हणायची आणि तोही तितक्याच प्रामाणिकपणे माझे पैसे परत द्यायचा. आता आपल्या घरात सगळं फर्निचर केनचं झाल्यामुळे दुसरे कुठले रॅक मला आवडायचे नाहीत, मग मी येरे माझ्या मागल्या म्हणत पुन्हा त्याच केनच्या दुकानात जावून शरणागती पत्करत त्याला अॅडव्हान्स रक्कम पुन्हा द्यायची. अशा रीतीनं हा सिलसिला अगदी आत्तापर्यंत सुरू होता. मी आता हताश होवून नाद सोडून दिला होता. आणि अचानक माझ्या व्हाटसअपवर केनच्या दोन रॅकचं छायाचित्र दिसायला लागलं आणि पाठोपाठ त्याचा फोनही आला. मॅडम, तुमचे रॅक तयार आहेत. घेवून येतो. माझा आनंद गगनात मावेना वगैरे माझी अवस्था झाली.
दोन जुळे भाउ घरात आल्याचा आनंद मी रॅक येताच साजरा केला. त्यांना हॉलच्या कोपर्यात जागा केली आणि मग अपूर्वच्या अतिक्रमण केलेल्या कपाटांमधली पुस्तकं काढली. ती पुस्तकं पुन्हा बघणं, त्यांचं वर्गीकरण करणं अणि ती रॅकमध्ये लावणं ही सगळी कामं न कंटाळता केली. त्यानंतर दोन दिवस पाठदुखी आणि मानदुखी यांनी त्रस्त, ग्रस्त झाले आणि आज रॅकमध्ये दिमाखात बसलेली पुस्तकं बघून सगळा शीण दूर झाल्यागत वाटलं. माझ्या संयमाची परीक्षा घेणार्या त्या केनवाल्याचे मनोमन खूप खूप आभारही मानले.
Add new comment