राहिले दूर घर माझे....
'राहिले दूर घर माझे’...या शफाअत खान लिखित नाटकावरची हरी नरके यांची पोस्ट वाचली आणि मी 'लगेचच पुस्तक आणून वाचते' असं त्यांना सांगितलं. बुकगंगावरून पुस्तक ऑनलाईन मागवलं, आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे ऑर्डर केल्यानंतर लगेचच एकच दिवसानं मला घरपोच पुस्तक मिळालं. खरं तर मी दोन पुस्तकं मागवली. दुसरं पुस्तक माझी मैत्रीण सुवर्णसंध्या हिच्यासाठी.
एका दमात पुस्तक वाचून काढलं. 'शोभायात्रा' बघितल्यानंतर मी शफाअत खान यांची जबरदस्त चाहती झाले. पुण्यात बालगंर्धवला बघितलेल शोभायात्रा या नाटकानं माझ्या मनावर खूप दिवस कब्जा केला होता. त्यातला नंदू माधवचा बापट ऊर्फ गांधी, सयाजी शिंदेनं वठवलेली नेताजी सुभाषचंद्र बोसांची भूमिका सगळंच अप्रतिम होतं....त्यानंतर अनेक वर्षांनी 'मिळून साऱ्याजणीच्या' वर्धापन दिनानिमित्त मेघना पेठे, निखील वागळे आणि शफाअत खान ही मंडळी एकत्र व्यासपीठावर आली. त्या वेळचं शफाअत खानचं भाषणही भाषण न वाटता आपल्याशी कोणीतरी मनातली गोष्ट बोलावी इतकं ते सहजसुंदर मला वाटलं. त्यानंतरची या नाटकावरची हरी नरकेंची पोस्ट...नाटकाचा विषय मनाला अस्वस्थ करणारा.
भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण फाळणीची न बरी होणारी जखम उरी देउन. भारत-पाकिस्तान असे तुकडे झाल्यानं इकडचे लाखो लोक तिकडे आणि तिकडचे लाखो लोक इकडे ....यात अनन्वित अत्याचार, अविश्वास, धर्मांधता यांची वर्णनं वाचताना आजही अंगाचा थरकाप उठतो. या नाटकातही असंच काहीसं घडलेलं दाखवलं आहे. भारतात सगळं काही भरभरून असलेलं कासीमचं कुटुंब फाळणीनंतर कफल्लक होतं आणि पाकिस्तानात जाउन पोहोचतं. तिकडे त्यांना एक हवेली दिली जाते. त्या हवेलीतली एकमेव वृद्धा जिवंत असते आणि ती हिंदू स्त्री आपली हवेली सोडायला तयार नसते. या एकाच घटनेनं कासिमच्या कुटुंबाची बदलती मानसिकता, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा दृष्टिकोन, हिंदू असो वा मुसलमान...त्या त्या धर्मात काय सांगितलंय यांचा मौलवीनं केलेला खुलासा...अखेर मानवता हाच खरा धर्म हे सांगताना धर्मांधता आणि माणुसकी यांच्यातला संघर्ष खूप चांगल्या पध्दतीनं यात रंगवला आहे.
शफाअत खानच्या मनात निर्माण झालेलं वादळ, त्यांच्या मामाच्या कुटुंबाबरोबरच्या आठवणी, फाळणी आणि त्या निमित्तानं मनावर उमटलेले असंख्य ओरखडे आणि त्यातूनच मनात जिवंत झालेली पात्रं त्यांना अस्वस्थ करत राहिली आणि अखेर त्यांच्या लेखणीतून ती साकारली. खरोखरंच शफाअत खान हा एक साहित्यिक म्हणून, एक नाटककार म्हणून आणि त्यापेक्षाही एक माणूस म्हणून खरोखरंच ग्रेट आहे. निखील वागळे यांनी तर प्रत्येक हिंदूनं आणि प्रत्येक मुसलमानानं हे नाटक वाचायलाच हवं असं म्हटलंय.
आज आपापल्या धर्माला महत्त्व देत माणसामाणसामधलं अंतर वाढत चाललंय. भीती, दहशत, अविश्वास यांचं वातावरण जगण्यातला निर्भेळ आनंद नष्ट करताहेत. अशा वेळी शफाअत खानसारखी माणसं आशेचा एक दीप घेउन समोर येतात. त्यांचं लिखाण केवळ पुस्तकात बंदिस्त न ठेवता आपण ते आचरणात आणायला हवंय.
धन्यवाद बुकगंगा आणि धन्यवाद हरी नरके सर.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment