'दीड-दमडी' 

'दीड-दमडी' 

'दीड-दमडी' 
दमडीचे तेल आणले
सासूबाईंचे न्हाणे झाले
मामंजीची दाढी झाली
भावोजींची शेंडी झाली
ओघळ मिशीपर्यंत गेला
उरले तेल झाकून ठेवले
लांडोरीचा पाय लागला
त्यात उंट वाहून गेला...

ही कविता अनेकांना आठवत असेल. यातला अतिशयोक्ती अलंकार चेहर्‍यावरही स्मितरेषा आणतो, पण त्याच वेळी वैषम्यही. हाच दमडीच्या तेलाचा प्रकार आज आसपास मोठ्या प्रमाणात म्हणजे एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरलेला दिसतो. आज दीड दमडीची माणसं कशी मोठी होत आहेत हे ही कविता वाचताना पुन्हा पुन्हा मनात येतं आणि याच सूत्राला घेऊन तंबी दुराई यांचं पाच-सहा वर्षं सातत्यानं केलेलं स्तंभ लिखाण 'दीड-दमडी' या शीर्षकाखाली रोहन प्रकाशनानं दोन संचाच्या स्वरूपात प्रसिद्ध केलं. 

'दीड-दमडी' या पुस्तकातल्या राजकीय आणि अराजकीय अशा दोन भागांत मिळून ८० लेख आहेत. यातला प्रत्येक लेख राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या घटनांवर आणि त्या त्या व्यक्तींवर तिरकसपणे कटाक्ष टाकतो. अनेकदा प्रासंगिक लिखाण हे त्या काळानंतर वाचावं वाटत नाही. त्याचे संदर्भ धूसर झालेले असतात. पण तंबी दुराईच्या या लेखांचं मात्र असं झालेलं नाही. लेख वाचत असतानाच तो धूसर झालेला, पुसट झालेला प्रसंग पुन्हा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो आणि लेख कधी सुरू झाला आणि संपला कळतच नाही. 

प्रत्येक लेखकाची आपली एक खास शैली असते आणि त्या शैलीमुळेच तो ओळखला जातो. तंबी दुराईंची ही उपहासात्मक शैली हीच त्यांची खास ओळख ठरली आहे. या शैलीतून सकस, कसदार लेखन करणं ही साधी, सोपी गोष्ट नाही. तिरकस लिहायचं, पण तरीही हे लिखाण एखाद्याला जखमी करत नाही. उलट ज्या व्यक्तीवर हे बाण सोडलेत ती व्यक्तीही अतिशय खिलाडूपणे ते स्वीकारताना दिसते. नव्यानं वाचन करणार्‍यांना विनंती की या प्रकारचं लिखाण त्यांनी जरूर जरूर वाचायला हवं. 

हे सगळं लिहायचं तात्पर्य साधारणतः महिन्यापूर्वी प्रदीप चंपानेरकर यांनी मला 'दीड-दमडी'ची भेट प्रत पाठवली. ही प्रत बघून आणि विशेषतः मुखपृष्ठ पाहून मी एकदम खुश झाले. चंद्रमोहन कुलकर्णींनी केलेलं मुखपृष्ठच पुस्तकाविषयी सारं काही बोलून जातं. कार्यक्रम आणि प्रवास यातल्या व्यस्ततेमुळे मी 'दीड-दमडी' वाचलं, मात्र त्यावरची प्रतिक्रिया लिहू शकले नव्हते आणि मग कालच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण रोहनकडून आलं आणि मग कार्यक्रम झाला की लिहू असं ठरवलं. 

कालचा रोहन मैफलचा हा दुसरा कार्यक्रम होता. पहिल्या कार्यक्रमात नरेंद्र चपळगावकरांशी संवाद घडला होता. अतिशय सुरेख अशा त्या कार्यक्रमाच्या आठवणी माझ्या मनात आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर नरेद्रं चपळगावकरांनी आवर्जून केलेला फोन आणि गप्पा देखील कधीही विसरता येण्याजोग्या नाहीत. त्यानंतर कालचा 'दीड-दमडी'चा कार्यक्रम दुसरा कार्यक्रम होता. 

रोहन टीमनं हा कार्यक्रम खूपच अनोख्या पद्धतीनं आयोजित केला होता. सायंकाळी सहा वाजता एसएम जोशीचा हॉल वाचकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. काहीच वेळात दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी आणि तंबी दुराई यांचं आगमन झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. नीता कुलकर्णी हिने कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. रोहन चंपानेरकरनं या कार्यक्रमामागची भूमिका सांगितली, तर प्रदीप चंपानेरकर यांनी 'दीड-दमडी'च्या निर्मितीमागची गोष्ट सांगितली. यानंतर खर्‍या रीतीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

दिलीप प्रभावळकर आणि गिरीश कुलकर्णी यांनी 'दीड-दमडी' मधल्या काही निवडक लेखांचं वाचन केलं. एकतर दोन्हीही अभिनेते माझेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आहेत. त्यांना बघणं, त्यांना ऐकणं, त्यांना अनुभवणं हा नितांत सुंदर असा अनुभव असतो. ही दोघं ज्या भूमिका करतील, तिचं सोनं करतील असे! आता 'दीड-दमडी'ला त्यांचा स्पर्श झाल्यावरही तेच होणार होतं (यात मात्र 'दीड-दमडी'च्या लिखाणातला सकसपणा तितकाच महत्त्वाचा!). दिलीप प्रभावळकर आणि गिरीश कुलकर्णी यांनी त्या त्या लेखातली पात्रं अक्षरशः आपल्या आवाजी अभिनयातून प्रत्यक्ष समोर आणून उभी केली. इतकी हुबेहूब की तंबी दुराईंनी आपलं मनोगत मांडताना हे मीच लिहिलंय का असा मला प्रश्न पडला असं म्हटलं. 

दुष्काळी परिस्थितीत काही राजकारण्यांनी दिलेल्या मेजवान्या आणि त्यामुळे व्यथित झालेले शरद पवार, नाना पाटेकर माणूस कसा आहे, अमीत शाह जेव्हा त्यांच्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून येतात तेव्हा, नरेंद्र मोदींची स्वच्छ भारत मोहीम अशा अनेक विषयांवरचे लेख या दोघांनी खास आपल्या स्टाईलमध्ये सादर केले, तेव्हा हे सगळं 'दीड-दमडी' प्रकरण संपूच नये असं वाटत राहिलं. 

तंबी दुराई यांनी तंबी दुराई या नावाचा जन्म कसा झाला आणि 'दीड-दमडी' या स्तंभलेखनाच्या वेळी घडलेले अनेक किस्से सांगितले. अरूण टिकेकर यांच्यामुळेच तंबी दुराई जन्माला आला हे सांगताना त्यांनी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. तसंच नीतिन गडकरींच्या आणि विलासराव देशमुख यांच्या पत्नीचा आलेला फोन, बाळासाहेब ठाकरे यांची भेट अशा काही आठवणीही त्यांनी मोकळेपणानं वाचकांसमोर सांगितल्या. 
कालच्या समाधान देणार्‍या, समृद्ध करणार्‍या आणि तृप्त करणार्‍या कार्यक्रमाबद्दल रोहन टीमचे खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी खरोखरंच वन्स मोअर म्हणायला पाहिजे. हा कार्यक्रम तुम्ही आणखी मोठा हॉल घेऊन पुन्हा एकदा आयोजित करावा अशी मी विनंती करते. 
मित्र-मैत्रिणींनो, तंबी दुराई लिखित 'दीड-दमडी' जरूर जरूर वाचा. 

दीपा देशमुख, पुणे. 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.