स्लमडॉग सी. ए.
आज २४ मे २०१७, बुधवार....आजचा दिवस आवर्जून लक्षात ठेवला होता.....थोडं मागं जावं लागेल. पुस्तकवेड्या अप्पांशी माझी ओळख झाली (प्रमोद अमोंण्डिकर) आणि ती वृद्धिंगत होत गेली. प्रत्येक भेटीत अप्पा मला मी न वाचलेलं एक पुस्तक भेट देत गेले. एके दिवशी त्यांनी मला एक प्रकाशनपूर्व कादंबरीची प्रत हातात दिली आणि सांगितलं, 'दीपा मॅडम, कितीही दिवस लागले तरी चालेल, पण वेळ मिळेल तेव्हा हे नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय कळवा.' मी 'हो' म्हटलं.... एक एक कामं हातावेगळी करताना ‘स्लमडॉग सीए’ वाचायला घेतलं. फक्त चाळून त्यावर अभिप्राय देता आला असता, पण ते स्वभावात नसल्यानं एक एक पान वाचायला सुरुवात केली आणि .....हो या सीएनं माझ्या मनावर ताबा मिळवला. मी त्याच्या जीवनकहाणीत, त्याच्या प्रवासात गुंतून गेले. त्याच्याबरोबरचा प्रवास मला दमवत गेला, रडवत गेला आणि चेहर्यावर हसूही पेरत गेला. या सीएशी - अभिजीतशी माझं नातं आहे हे लक्षात आलं. हो तेच .....माणुसकीचं, मानवतेचं! कादंबरीचं नाव होतं ‘स्लमडॉग सी. ए.’ या कादंबरीचा लेखक होता - मनोज अंबिके आणि कादंबरीतला नायक होता - अभिजीत थोरात!
मी एका दमात कादंबरी वाचून संपवली. ती एक सत्यकथा होती. अभिजीत थोरात या तरुणाची! ‘स्लमडॉग सीए’ यातल्या अभिजीतची वाटचाल थक्क करणारी आहे. चिकाटी आणि प्रयत्न या जोरावर माणूस काय करू शकतो ते या पुस्तकातून मनोज अंबिके या लेखकानं सांगितलं आहे. या पुस्तकाची भाषा अतिशय सहज, सोपी, रंजक, रसाळ आणि ओघवती असून लेखक आणि या पुस्तकातला नायक अभिजीत वेगळा राहतच नाही इतकं ते सगळं एकमेकांत विरघळून गेलं आहे.
झोपडपट्टीत राहून, समाजाचा तिरस्कार झेलून, हालअपेष्टा सहन करत, परिस्थितीशी दोन हात करत हा मुलगा कसा पुढे जातो हे या कादंबरीत होतं. या मुलानं लग्नाच्या ठिकाणी भांडी घासली, स्टेशनरीच्या दुकानात काम केलं....कुठल्याही कामाला कधी लाजला नाही. सगळ्या प्रकारचे मित्र असले तरी कधी व्यसनांची संगत लागू दिली नाही. त्याच्या आईनं लोकांकडे कामं केली आणि मुलाला शिकवलं. त्याला इंजिनियर व्हायचं होतं. आर्थिक परिस्थिती तर कुठलीच साथ देत नव्हती. अशा वेळी त्याचे राठोड नावाचे एक शिक्षक त्याला धीर देत म्हणाले, 'डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजेच सर्वकाही नाही. आणखी खूप मोठं कार्यक्षेत्र आहे. तू सी.ए. हो. उद्या तू चार इंजिनियर ठेवू शकशील.' त्या वेळी अभिजीतला सी.ए. म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. पण आपल्या गुरूनं सांगितलंय आणि आपण हो म्हटलंय एवढ्या गोष्टीनं त्यानं सी.ए. होण्याचा निर्धार केला. अभिजीतला भेटलेल्या काही माणसांमुळे अभिजीत त्या काटेरी वाटेवरून चालत एके दिवशी पुण्यात पोहोचला. मराठी माध्यमातून शिकलेल्या अभिजीतला इंग्रजी भाषेशी सामना करावा लागला. अपार परिश्रम करत अभिजीत सी.ए. झाला.
त्याची ही गोष्ट 'माय मिरर पब्लिशिंग'च्या मनोज अंबिकेना कळताच त्यांनी ती प्रकाशित करण्याविषयी अभिजीतचं मन वळवलं. 'अभिजीतचा प्रवास इतरांना समजला तर अभिजीतसारखे अनेक तरुण मुलं आज अर्ध्या वाटेवरून कच खाऊन हार पत्करतात, त्यांना अभिजीतच्या प्रवासामुळे पुन्हा प्रेरणा मिळेल आणि ते आयुष्यात पुन्हा काहीतरी करू शकतील. अभिजीतसारखे अनेक अभिजीत त्यामुळे तयार होण्यास मदत मिळेल.' मनोज अंबिके याचं हे बोलणं ऐकून सुरुवातीला संकोचून गेलेला अभिजीत नंतर तयार झाला आणि त्यानं होकार दिला. वर्षभरात मनोज अंबिके यांनी अभिजीतच्या खडतर प्रवासाची गोष्ट लिहून काढली. काल्पनिक काही नव्हतंच. जिवंत अनुभवांमुळे कादंबरी तितकीच रसरशीत झाली.
कादंबरी वाचून मी ताबडतोब अप्पांना फोन करून माझी प्रतिक्रिया कळवली आणि आश्चर्य म्हणजे दुसर्याच दिवशी अप्पा चक्क अभिजीतला घेऊन घरी आले. मी अभिजीतकडे बघून थक्क झाले. मनोज अंबिकेनं चितारलेला, शब्दबद्ध केलेला अभिजीत माझ्यासमोर उभा होता. तितकाच नम्र, लाघवी आणि प्रसन्न असा तरूण! मला तो त्याच क्षणी आवडला. त्याला मी दिलेली प्रतिक्रिया आवडली होती आणि ती पुस्तकात समाविष्ट करायची होती. मी नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. २४ तारीख त्यानं रिकामी ठेवायला सांगितली कारण या दिवशी त्याच्या या पुस्तकाचं प्रकाशन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार होतं.
ठरल्याप्रमाणे मी कार्यक्रमस्थही पोहोचले. पुस्तक प्रकाशन प्रसिद्ध वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार होतं. त्यामुळे पोलिस बंदोबस्त प्रचंडच होता. मी समोरच्या आसनावर बसले आणि सहज मागे वळून बघितलं तर सभागृह खचाखच भरलेलं....अभिजीतचे, मनोज अंबिकेचे सर्व स्नेही, मित्र तिथे आलेले होते.
राज्यमंत्री शेखर चरेगांवकर, सी.ए. शिवाजीराव झावरे, सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, निखिल कन्स्ट्रक्शन्सचे योगेश पासलकर, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर नरेंद्र भंडारी, नगर भूषण सुप्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे आणि प्रकाशक आणि लेखक मनोज अंबिके हेही व्यासपीठावर स्थानापन्न झाले. ते येण्याआधी या पुस्तकाविषयी, पुस्तकातल्या प्रतिक्रियांविषयी काही निवडक लोकांचे अभिप्राय स्लाईड शो माध्यमातून दाखवण्यात आले. उज्ज्वल निकम यांची एक चित्रफितही दाखवण्यात आली. प्रकाशन समारंभ खूपच दिमाखदार पद्धतीनं पार पडला.
व्यासपीठावरती १० मंडळी असल्यानं प्रत्येकजण भाषण करत राहिला तर किती कंटाळवाणं होईल आणि कार्यक्रम कधी संपेल असे माझ्या मनात नको ते विचार येत होते. पण कार्यक्रम खूप सुरेख झाला. प्रत्येक जण अगदी थोडक्यात आणि नेमकं बोलला. अभिजीतच्या सासूबाईंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, 'अभिजीतनं आमच्या मुलीसाठी मागणी घातली, तेव्हा स्वतःची परिस्थिती लपवली नाही.' अभिजीतच्या सासू-सासर्यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे. कारण ज्याला घर नाही, पुढे कसं कर्तृत्व गाजवेल माहीत नाही अशा मुलाच्या बोलण्यावर विश्वास टाकून त्यांनी आपल्या मुलीचा हात अभिजीतच्या हाती दिला. कुठे जन्म घ्यावा हे अभिजीतच्या हातात नव्हतं. गरीब असणं हेही त्याच्या हातात नव्हतं. प्रत्येक जण सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येत नाही. या विचारानं त्यांनी अभिजीतला होकार दिला. अभिजीतविषयीचा अभिमान त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. त्यानंतर अभिजीतनं सगळ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. खरं तर त्याला खूप भरून आलं होतं. त्या भरल्या अंतःकरणानं त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. मनोज अंबिके यांनी उत्तम वक्ता असतानाही बोलण्याचा मोह टाळून आणि प्रसंगाचं भान ठेवून अगदीच थोडक्यात आपण हे पुस्तक का लिहिलं याविषयी सांगितलं. या कार्यक्रमासाठी उज्ज्वल निकम यांनी येण्यास होकार दिला ही गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची वाटते असं त्यांनी सांगितलं. राज्यमंत्री शेखर चरेगावकर, नरेंद्र भंडारी, विष्णु मनोहर हेही अगदी थोडक्यात शुभेच्छापर दोन शब्द बोलले आणि अशा अनेक अभिजीतसाठी मदतीचा हात पुढे करण्याची त्यांनी खात्री दिली. यानंतर सगळ्यांनाच उज्ज्वल निकम यांना ऐकायचं होतं.
उज्ज्वल निकम यांनी ज्ञान आणि प्रामाणिकपणा यांच्याबरोबरच अंगी नम्रता असायला हवी हे अभिजीतसह सर्वांना उद्देशून सांगितलं. आपण व्यवसायानं वकील असल्यानं आपल्याला माणसं ओळखता येतात असं सांगून त्यांनी आपण या कार्यक्रमाला का होकार दिला, त्यामागचं कारण मनोज अंबिकेनं अभिजीतविषयी जे काही सांगितलं त्यातली सत्यता आपल्याला जाणवली म्हणून आलो हेही आवर्जून सांगितलं. अभिजीतची आई, जिनं अभिजीतला स्वाभिमानाचे आणि सत्याच्या वाटेवरून चालण्याचे संस्कार दिले, त्याला मदत करणारे त्याचे शिक्षक, मित्र, शिक्षक, पत्नी या सगळ्यांविषयी उज्ज्वल निकम भरभरून बोलले आणि आपल्याला या सर्व लोकांना भेटायला आवडेल असंही म्हणाले. आपल्या व्यस्त दिनक्रमातून नगरहून एका हत्याकांड प्रकरणाची चौकशी आटोपून ते पुण्यात कार्यक्रमाला आले होते आणि कार्यक्रम संपताच लगेच मुंबईत परतणार होते.
कार्यक्रम संपला. वेळ कसा भुर्रकन उडाला कळलंच नाही. लोकांनी घेरलेल्या अभिजीतला भेटले. परत निघणार तोच अप्पा भेटले. अप्पांनी मी येणार म्हणून पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं ‘गांधीजी’ हे पुस्तक माझ्यासाठी तेवढ्या धावपळीतही लक्षात ठेवून आणलं होतं. मी स्तिमित झाले. परतताना तृप्तीची एक लहर चेहर्यावरंन हलकेच फिरत असताना, नीलिमा मोरे भेटायला आली. मिनाक्षी, नीलिमा आणि मी जवळच शीतलमध्ये कॉफी प्यायलो. ती ‘तहान’ या तरूण मुलांच्या उपक्रमात मग्न असल्यानं खूपच आनंदात होती. खूप छान वाटलं. एकमेकींचा निरोप घेत मी परतीच्या मार्गाला लागले. मात्र एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा आनंद तर होताच, पण उज्ज्वल निकम यांचे शब्द कानात घोळत होते ः
जो लोग खुदके स्वार्थ के लिए दुसरोंकी हत्या करते है
उनको मानव नही राक्षस कहा जाता है
क्या ये दहशतगर्दी बिना वजह
क्यों निर्दोष लोगोंकी हत्या करते है
क्या कहू मै इनसे ये लोग कैसे है, जो बम बनाते है
इनसे तो किडे अच्छे है जो रेशम बनाते है
-दीपा देशमुख, २४ मे २०१७.
आज पहाटे ५ वाजता मिनाक्षीचा मेसेज आला. रात्री ११ नंतर तिनं कादंबरी वाचायला घेतली आणि एका दमात संपवली. तिला ती खूपच आवडली. तुम्हीही जरूर वाचा - 'स्लमडॉग सी. ए.' लेखक - मनोज अंबिके, प्रकाशक - मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे शुल्क - १९५/-
Add new comment