फादरहूड

फादरहूड

नुकताच फादर्स डे साजरा झाला आणि फेसबुकवर अनेकांनी आपापल्या वडिलांविषयीच्या आठवणी शेअर केल्या. हा शब्द सतत डोळ्यांना दिसत असतानाच मी ‘फादरहूड’ हा चित्रपट बघितला. खरं तर हाही चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊन अवघे चारच दिवस झालेत. म्हणजे 18 जून 2021 या दिवशी तो रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाविषयी खूप सकारात्मक लिहिलं आहे.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं मॅट (मॅथ्यू) आणि लिझ नावाचं एक जोडपं, लुटूपुटीचे मतभेद असले तरी एकमेकांविषयीच्या भावना ठाऊक असलेले...तिला दिवस गेलेले...एके दिवशी तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतानाच डॉक्टर सांगतात, की बाळाची वाढ चांगली झालेली आहे आणि आपल्याला आजच डिलिव्‍हरी करावी लागेल. खरं तर बाळाची जन्माची वेळ येण्यास आणखी अवधी असतो, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लिझला ॲडमिट केलं जातं. आपल्याला मुलगी होणार आहे हेही दोघांना माहीत असतं. तुला तिचे डायपर्स बदलावे लागतील असं लिझ मॅटला चिडवत असते आणि तोही हो, मी आनंदाने ते काम करेन असं म्हणत असतो. कारण त्याला आपल्या मुलीच्या आगमनाची अपार उत्सुकता असते. त्याही क्षणी त्याने तिच्यासाठी एक सुंदरसं सोन्याचं डायमंड असलेलं लॉकेट आणलेलं असतं, मॅट तिच्या गळ्यात घालतो. एकीकडे शस्त्रक्रियेची तयारी सुरू असते आणि दुसरीकडे हा तिथेच ऑपरेशन थिएटरमध्ये लिझचा हात हातात घेऊन तिच्याशी बोलत असतो. छानशा गोंडस मुलीचा - मॅडीचा- जन्म होतो आणि पहिल्यांदा आपल्या मुलीला हातात घेताना मॅटला खूप भरून येतो, त्याच्या डोळ्यातून, चेहऱ्यावरून तो आनंद ओसंडून वाहत असतो.

मग मग मॅटची आई येते, त्याचे वडील वेगळे राहत असतात. लिझचेही आई-वडील आपल्या नातीला बघायला हॉस्पिटलमध्ये येतात. सगळे खूप आनंदात असतात आणि लिझचा मृत्यू होतो. मॅटसाठी लिझचं असं आकस्मिक सोडून जाणं खूप धक्‍कादायक असतं. बाळाच्या दोन्हीही आज्जी बाळाची काळजी घ्यायला त्याच्याकडेच राहतात. पण एके दिवशी मॅट माझी जबाबदारी मी उचलेन, मी मॅडीचा सांभाळ करेन असं सांगून सगळ्यांना आपापल्या घरी पाठवतो. इथून त्या बापलेकीची गोष्ट सुरू होते...मॅडीचं रडणं...तिचे डायपर्स बदलणं...तिची खेळणी...तिचे वेळेवर डोस....या सगळ्यात मॅटची उडणारी तारांबळ, त्याच्या मित्रांचं अतिशय खेळकरपणे त्याला साथ देणं, इतकंच काय पण त्याचा बॉसही त्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा देतो, कधी ऑफीसला यायचंच झालं तर मॅट बाळाला घेऊन ऑफीसला येत असतो.

या सगळ्यात खूप गमतीजमती देखील घडतात. म्हणजे बालसंगोपन हे आईच करते, करू शकते वगैरे....एक पुरूष बाळाला सांभाळूच शकणार नाही अशी सगळ्यांची मानसिकता...लिझनं आपल्या बाळासाठी जे जे केलं असतं ते ते सगळं मॅट मॅडीसाठी करतो. मात्र स्वत: पुरुष असल्यामुळे मॅडीला शाळेत स्कर्ट ऐवजी पँट घालून पाठवणं, तिचंही कपडे खरेदी करायला गेल्यावर मुलांच्याच अंडरपँट आवडीने विकत घेणं, त्यावरून शाळेत तिला चिडवणं....असं खूप काही....पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप लेकीचं बाँडिंग ज्या तऱ्हेनं दाखवलं आहे ते बघताना अनेकदा डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात...खरं तर चित्रपट खूप हलकाफुलका आहे, पण तरी तो छोट्या छोट्या प्रसंगात आपल्याला हलवून सोडतो. रडणाऱ्या मॅडीला चूप कसं करायचं या विचारानं परेशान झालेला मॅट आणि मग अनेकांकडून अनेक गोष्टी कळल्यावर व्‍हॅक्यूम क्लिरनरच्या आवाजात शांत झोपणारी मॅडी....या सवयीने एके दिवशी हा पठ्ठ्या ऑफीसमध्ये मिटिंग सुरू असताना मध्येच ती अर्धवट सोडून तिचा रडण्याचा आवाज ऐकू येताच, जाऊन व्‍हॅक्यूम क्लिनर सुरू करून तिला शांत करायचा प्रयत्न करताना दिसतो, तेव्‍हा सगळे चकित होऊन बघतच राहतात... तर कधी अंगाई गीत म्हंटल्यावर बाळ झोपत कळल्यावर मॅट आणि त्याचे मित्र कर्कश आवाजात जे प्रयत्न करतात ते बघताना हसू आवरत नाही. 

मातृत्व हा शब्द आपण सतत ऐकतो, वापरतो.  हा चित्रपट बघितला की पितृत्व काय असतं, त्या तरल, उत्कट भावना मॅटच्या वागण्यातून, डोळ्यातून, मॅडीविषयीच्या दिसत राहतात. मॅडीला वाढवताना मॅटला आपले वेगळे राहणारे पण वडील म्हणून प्रेम करणारे वडीलही आठवत राहतात, आपल्या सासूशी मतभेद असणारा मॅट....मॅडीच्या प्रेमानं दोघं कसे जवळ येतात असं खूप काही यात आहे. चित्रपटाच्या शेवटी मॅट मॅडीला शाळेत सोडतो असं दृश्य आहे, हे दृश्य अफलातून आहे. ते सांगण्यापेक्षा बघण्यात खूप जास्त मौज आहे. आपल्या मुलीला कम्फर्टेबल करण्यासाठी एक बाप काय काय करतो याची गोष्ट म्हणजे ‘फादरहूड’!

‘फादरहूड’ हा एक अमेरिकन चित्रपट असून पॉल विट्झने दिग्दर्शित केला आहे. ‘टू किसेस फॉर मॅडी : ए मेमॉयर ऑफ लॉस अँड लव्‍ह’ या 2011 साली प्रकाशित झालेल्या मॅथ्यू लॉगलिन याच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. हे आत्मचरित्र न्यूयॉर्कच्या सर्वाधिक विक्री असलेल्या पुस्तकांच्या यादीत मोडतं. केविन हार्ट हा या चित्रपटाचा एक निर्माता देखील आहे. तसंच तो विनोदी भूमिका करण्यात माहीर आहे, असं असताना ही वेगळी भूमिका साकारताना तो कुठेही कमी पडलेला नाही. मेलडी हर्ड या चिमुकल्या मुलीने मॅडीची भूमिका साकारली असून केविन हार्ट आणि मेलडी हर्ड दोघंही खरोखरंचे बापलेक वाटतात.

एक सुरेख, शब्दातीत अनुभव घ्यायचा असेल तर नेटफ्लिक्सवर ‘फादरहूड’ हा चित्रपट जरूर बघा.

दीपा देशमुख, पुणे.
 

Comments

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.