असे हे वारकरी....बाबुराव तावरे
आमचा मित्र कल्याण तावरे, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, साहित्यप्रेमी, मित्र-मैत्रिणींमध्ये रमणारा, सौंदर्यदृष्टी असलेला...असं बरंच काही. माझ्या मैत्रिणीने - सुवर्णसंध्या हिने फोन करून सांगितलं, 'दीपा कल्याणचे वडील नुकतेच गेले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या रक्षेचं विसर्जन त्यांच्याच शेतात करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या मृत्यूनंतर श्राध्द वगैरे कर्मकांडं न करता वृक्षारोपण करावं अशी त्यांची इच्छा होती. मी आणि शेखर आज त्याच्या शेतावर जाणार आहोत.'
वयाची १०० पार करून सुखासमाधाने मृत्यूला ये, म्हणत त्याचं स्वागत करणारे कल्याणचे वडील माझ्या डोळ्यासमोर आले आणि नारायण नागबळी, कालसर्पयोग, श्राध्द, वटसावित्री पोर्णिमा, हरतालिका, महालक्ष्मीचा पिवळा गुरूवार, बाबा लोकांचे मठ आणि त्यातले विधी, असं बरंच काही करणारे तमाम लोक आठवले. त्या पार्श्वभूमीवर हा म्हातारा वारकऱ्याची मूल्यं जपत आयुष्यभर शेतकरी म्हणून जगला आणि मरतानाही 'आता माझं पुरेसं जगून झालंय' असं म्हणत निर्मोहीपणानं इच्छामरणाचा मार्ग स्वीकारत मृत्यूचंही स्वागत करता झाला.
इथे मी कल्याणचा उल्लेख आवर्जून करतेय, कारण खुपशा घरात मृत्यू झाल्यानंतर वडिलांची इच्छा, आईची इच्छा, नातेवाईक काय म्हणतील, आपल्या घरात हे चालणार नाही अशा सबबी पुढे करून लोक त्या टाकाऊ कर्मकांडांना स्वीकारतात. पण कल्याणनं तसं केलं नाही, आपल्या मित्र-मैत्रिणींना बोलावून शेतात वेगवेगळी रोपं लावली. वडील गेल्यानंतर शोक न करता त्यांच्या चांगल्या आठवणींचा जागर केला. घरात १२-१३ दिवसांचं सुतकी वातावरण ठेवलं नाही. व्वा, कल्याण, जुग जुग जियो.
तसंच याच वेळी आपल्या वडिलांच्या आठवणीदाखल आमचाच मित्र बाळ्या म्हणजेच वसंत वसंत लिमये यांनी देखील गरूडमाचीला एक समृद्घ असं ग्रंथालय उभारलं. असे मित्र असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो.
या प्रसंगी मला अनेक लोक आठवले, मेरी क्युरी पासून अनेक...की ज्यांना आपल्या मृत्यूचा सोहोळा नको होता. त्यातच मी काल-परवापासून पुन्हा एकदा आपले भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा आयुष्य प्रवास वाचत होते अणि त्यांच्या मृत्यूनं तितकीच हळवीही झाले होते. अशा वेळी त्यांची वाक्यं मनात रेंगाळत होती: ‘....मात्र मूठभर राखेचे गंगेत विसर्जन केल्यावर जी राख उरेल ती विमानातून उंच आकाशात न्यावी आणि उंचावरून ती भारतभूमीवर विखरून टाकावी, ज्या ठिकाणी भारतातला शेतकरी काबाडकष्ट करतो त्या शेतांतून ती पडावी. तिथल्या मातीत मिसळून जावी, तिथल्या धुळीशी ती एकजीव व्हावी. भारताच्या भूमीचाच तो एक अंश बनावा. हीच माझी अखेरची इच्छा आहे.’
हेच खरे भारताचे सुपुत्र!
दीपा देशमुख, पुणे.
Blog comments
अतिशय अनुकरणीय 👍 याचसाठी…
अतिशय अनुकरणीय 👍
याचसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिस गोड व्हावा🙏
पंडित नेहरूबद्दल आज जो खोटा…
पंडित नेहरूबद्दल आज जो खोटा prac
Well said 👍🏻
Well said 👍🏻
Add new comment