फोटो प्रेम

फोटो प्रेम

फोटोप्रेमींना दिसेल त्यात सौंदर्य दिसतं, वास्तव दिसतं .. मग ते काहींना पानाफुलांमध्ये, प्राण्यांमध्ये म्हाताऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये, पहाडा-पर्वतांमध्ये, इवल्याशा पणतीमध्ये, झाडावरून पडलेल्या वाळलेल्या पानामध्ये, चहाच्या काळ्या पडलेल्या ॲल्युमिनियमच्या किटलीमध्ये, घरदार नाहिसं झालेल्या विस्थापितांच्या पावलांमध्ये, खळखळून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये, पडक्या उदध्वस्त वास्तूंमध्ये,  दिसतं आणि ते त्यांना आपल्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं टिपता येतं. आता तर मोबाईल क्रांतीमुळे प्रत्येकजण कुशल फोटोग्राफर झाला आहे. भले तंत्र माहीत असोत वा नसोत, ओठाचा चंबू करून सेल्फी काढण्यात तर सगळेच माहीर झाले आहेत.

असे सगळे विचार मनात येताच, मला माझी आई आठवली. तिला फोटो काढायला खूपच आवडायचं. स्वत:चे, इतरांचे, घरातल्या पिंकी नावाच्या अल्सेशियन कुत्रीचे तर कधी ज्यूली नावाच्या मनीमाऊचे. माझ्यात तिचा हा गुण आला असावा. मलाही फोटो काढायला, बघायला खरोखरंच खूप आवडतं. अशा वेळी एकाएकी मला माझी बालमैत्रीण सुनिता आठवली. तिला अजिबात फोटो काढायला आवडायचं नाही. फोटो काढायला आवडत नाही अशी व्‍यक्‍ती असू शकते याचं मला नेहमीच आश्चर्य वाटायचं, अजूनही वाटतं. फोटो आपल्या प्रवासातले कितीतरी  टप्पे जपून ठेवतात. भूतकाळाला जणू जीवंत करतात आणि आपल्या वयातले सगळे बदल हळुवारपणे दाखवण्यासाठी आपला आरसा बनतात.  

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला ‘फोटो प्रेम’ हा चित्रपट अगदीच ताजा ताजा आत्ताच बघितला. मन स्वत:च्या आणि चित्रपटाच्या कथेबरोबर समांतर धावू लागलं. ‘फोटो प्रेम’ या चित्रपटात माई म्हणजे नीना कुलकर्णी ही ५५ वर्षांची प्रौढ स्त्री मध्यवर्ती भूमिकेत आहे. तिला फोटोची भयंकर भीती किंवा फोबिया आहे. आपल्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नातही तिचे फोटो खूपच कमी आहेत आणि जबरदस्तीने तिला हाक मारून फोटोच्या वेळी बोलावल्यावर तिचा चेहरा पकडून आणल्यासारखा केविलवाणा झालेला फोटोत बघायला मिळतो.... तर मुलीचं लग्न झालेलं, नवरा रोज डबा घेउन ऑफीसला जाणारा, दिवसभर माई घरातल्या कामात गुंतलेली, अधूनमधून आपल्या नंनदेकडे नवऱ्याबरोबर जाऊन येणारी....घरातला मिक्सर दुरुस्त कर, वगैरे कामंही अधूनमधून करून टाकणारी...

तसं बघितलं तर संथ आयुष्य सुरू असताना एके दिवशी नणंदेकडे जात असताना नवऱ्याला फोन येतो, की त्याच्या ऑफीसमधल्या जोशीची बायको हार्ट ॲटकने गेली...ती बातमी कानावर पडताच दोघंही तसेच जोशीच्या घरी पोहचतात. समोरच्या खोलीत मिसेस जोशीचं प्रेत, आजूबाजूला बायका सुतकी चेहरा घेऊन बसलेल्या आणि त्याच वेळी दुसऱ्या दिवशी तिचा फोटो वर्तमानपत्रात देण्यासाठी फोटो शोधण्याची हालचाल सुरू झालेली....बस्स इथूनच माईच्या मनात ठिणगी पडते. आपल्या मृत्यूनंतर आपली आठवण राहण्यासाठी आपला एकतरी फोटो असायला हवा या विचाराने ती अस्वस्थ होते..   

तिच्या मनाला एकप्रकारचा चाळाच लागतो. मृत्यूनंतर वर्तमानपत्रात देण्यासाठी आपला बऱ्यापैकी एकही फोटो नसावा याची खंत तिला वाटायला लागते. त्या दिवसापासून ती रोजच्या वर्तमानपत्रात कोण कोण गेलं आणि त्याच्या फोटोखाली काय काय लिहिलंय हे वाचत राहते. ती आपल्या भूतकाळात जाते, लग्नासाठी दाखवायचा फोटो काढताना देखील ती फोटोपासून कशी लांब पळत होती, फोटो टाळत होती इथपासून तिला अनेक गोष्टी आठवू लागतात. आपली ओळख आपल्या मृत्यूनंतर आपल्या फोटोतूनच राहणार आहे असं तिला वाटू लागतं. फोटो स्टुडिओजवळ चार वेळा जाऊनही ती फोटो काढण्याची हिम्मत करू शकत नाही. मात्र या फोटो प्रकरणानं दिवसरात्र ती या आणि याच विचारानं झपाटली जाते. या तिच्या प्रवासात तिच्या शेजारची सात-आठ वर्षांची गोड मुलगी, तिची काम करणारी बाई, असे सामील होतात, तिला मदत करतात आणि आपला एक तरी चांगला फोटो असावा यासाठीची तिची धडपड सुरू होते. या चित्रपटात शेवटपर्यंत अनेक प्रसंग आपल्याला उनपावसाच्या खेळात सामील करून घेतात.

हा चित्रपट म्हटलं तर अतिशय हलक्याफुलक्या अंगानं पुढे सरकत जातो. यात प्रसंगाच्या गंभीरतेकडे जातानाही व्‍यंग दाखवणाऱ्या अनेक जागा दिग्दर्शकानं टिपल्या आहेत. ते व्‍यंग बोचत नाही, पण लक्षात येतं. त्या विनोदानं आत डोकावता डोकावताच त्याच्या मागे असलेल्या व्‍यथाही दिसायला लागतात. या चित्रपटात नीना कुलकर्णीनं अतिशय समर्थपणे ही भूमिका साकारली आहे. तिचे डोळे आणि तिचा चेहरा ज्या प्रकारे बोलत राहतो की बस्स! तिची तगमग, तिची पोकळी, तिचं एकटेपण, तिची धडपड इतके सगळे कंगोरे खूप बारकाईने समोर येत राहतात. 

म्हटलं तर अगदी साधा, पण खोलवर नेणारा,  म्हटलं तर एक इवलासा विचार, पण एकाच वेळी चेहऱ्यावर हसू, तर त्याच वेळी हळवा भाव आणणारा असा हा चित्रपट. आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केलं आहे. वैभव जोशीचं गीतलेखन, तर कौशल इनामदार याचं संगीत आहे. ते चित्रपटात विशेष प्रभाव पाडत नाही. मात्र नीना कुलकर्णीसाठी हा चित्रपट जरूर जरूर बघायला हवा. ती, तिचा शेवटचा अप्रतिम फोटो यातून तिचा अभिनय बोलत राहतो .. त्या प्रसंगासाठी तिला हॅट्स ऑफ!!! डोळ्यात अश्रू येताच तिचे 'बोंबला' हे शब्द लगेचच चेहऱ्यावर हसू आणतात!!!

दीपा देशमुख, पुणे.
 

Tags

Comments

Submitted by गीता भावसार Fri, 06/04/2021 - 18:39

खूप छान लिहिलंत.
बर्याच दिवसांपासून टाळत होते बघायचा...आता तुमचा review वाचून नक्की बघते.

Submitted by Raj Dhalwale Sat, 06/05/2021 - 08:35

मीही लहानपणी फोटो पासून लांब पळत असे, अगदी माझ्या दोन बहिणी आणि भावाच्या लग्नात एका सुद्धा फोटो मध्ये मी नाही. नंतर नंतर मात्र मीच एवढे सुंदर सुंदर फोटो काढत आलोय की त्या प्रत्येक फोटोला लोकांनी खूप पसंती दिलीय... सोनी कॅमेरा पासून आता मोबाईल वर फोटो काढण्याचा माझा छंद जीवनाचा अविभाज्य घटक कधी बनला ते मला कळलं नाही.

Submitted by Dr Sucheta Sat, 06/05/2021 - 10:12

Deepa very nice 👌

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.