कामशेतमध्ये रंगल्या गप्पा
आज कामशेतजवळ असलेल्या आदिती लर्निंग सेंटर आणि किशोर मित्र या संस्थांमध्ये अकरावीच्या मुली आणि शिक्षक यांच्याबरोबर गप्पांचा कार्यक्रम नयन आणि मेरी डिसुझा यांनी आयोजित केला होता. सकाळी कामशेतला पोहोचताच आदिती लर्निंग सेंटरचं प्रवेशद्वार दिसायला लागलं. मागे हिरवेगार डोंगर आणि आजूबाजूला पसरलेली तशीच हिरवीगार शेतं, प्रवेशद्वाराच्या आत मोठमोठे वृक्ष आणि त्यातून डोकावणारी नयन आणि मेरी यांची संस्थेची इमारत....मला मासवणची आठवण पुन्हा पुन्हा करून देत उभी होती.
तीन तगड्या श्वानांनी आमचं स्वागत केलं. काहीच वेळात आम्ही हॉलमध्ये प्रवेश केला. कामशेत, कान्हेफाटा, जांभूळ आणि पवनानगर अशा २० किमीच्या अंतरावरच्या गावांमधून मुली इथं येतात. इथे त्यांना शिक्षक शिकवतात, इथल्या ग्रंथालयातली पुस्तकं मुली वाचतात आणि या मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी मेरी आणि नयन सातत्यानं नवनवीन पाहुणे बोलावून या मुलींसाठी अनेक कार्यक्रम घडवून आणतात. मेरी आणि नयन या दोघी नसत्या तर या मुलींना शिकायला कदाचित मिळालं नसतं. या मुलींच्या घरच्या लोकांनी त्यांचं लग्न लावलं असतं, किंवा घरात बसवून ठेवलं असतं. आज नयन आणि मेरी यांनी गावागावातल्या लोकांच्या मनात विश्वासाचं नातं निर्माण केलंय. त्यामुळे आपल्या मुलींना ते विश्वासानं या सेंटरमध्ये पाठवतात. बदलाचे वारे वाहण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करावं लागतं, त्यासाठी काहींना कठोर परिश्रम करावे लागतात, कामात झोकून द्यावं लागतं. आणि हे सगळं करणाऱ्या मेरी आणि नयन - आपल्या निवृत्तीनंतर नव्यानं कात टाकून नवी ऊर्जा घेऊन अशा अनेक मुलींना घडवण्याचं काम करत आहेत.
आज या उत्साही मुलींनी माझं स्वागत केलं. नयन आणि माझ्या गप्पांमधून माझा लेखनप्रवास त्यांच्यासमोर उलगडला. या प्रवासानं मुलींच्या आणि शिक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हळूहळू करत सगळ्यांच्या मनातले प्रश्न त्यांच्या ओठांवर आले आणि एक एक प्रश्न त्या मला विचारू लागल्या. माझ्या घरचं वातावरण कसं होतं, माझी मतं ठाम कशी झाली, अडचणींशी सामना कसा केला, प्रेरणा देणार्या व्यक्ती कोण, मुलगी म्हणून काही बंधनं होती का, ही प्रश्न विचारत असतानाच माझ्या बोलण्यातलं त्यांना काय काय आवडलं तेही त्या सांगत होत्या. साधं राहणं, स्वतःशी प्रामाणिक असणं आणि इतरांशी पारदर्शी असणं, प्रत्येक गोष्ट शिकण्याची असोशी असणं, वगैरे. मी बोलताना टीव्हीवरच्या एका कार्यक्रमाचा उल्लेख करून त्यांना म्हणाले, आपला जन्म कुठे झाला, कसा झाला हे आपल्या हातात नसतं. त्यामुळे एखाद्याच्या दिसण्यावरून, वैगुण्यावरून विनोद करणं हे अतिशय अयोग्य आहे आणि आपण तरी निदान त्या विनोदावर हसू नये आणि तसे विनोद चुकूनही करू नयेत. मुलींना ते पटलं होतं.
कार्यक्रम संपल्यावर अनेकींना माझ्याबरोबर फोटो काढायचे होते. त्यातली एकजण माझ्यासमोर आली आणि म्हणाली, माझे पती राहुल अपंग आहेत. त्यांचा एक हात आणि एक पाय म्हणजे एक बाजू पूर्ण पोलिओमुळे लुळी पडलेली आहे. अॅरेंज मॅरेज असूनही मी या मुलाला होकार दिला. त्यावेळी माझ्या घरातले, मैत्रिणी, नातलग मला खूप बोलले. माझ्या नवर्यावरही त्यांनी कमेंट्स केल्या. पण मी माझ्या मतावर ठाम होते आणि आज आमचा संसार सुखाचा सुरू आहे. तुमच्या आजच्या बोलण्यानं मला खूप बरं वाटलं. या मुलीच्या बोलण्यामुळे खरं तर मलाच खूप बरं वाटलं. स्वतःमध्ये कुठलंही वैगुण्य नसताना तिनं अशा मुलाची निवड केली होती. जगानं त्या मुलाला जगणं नकोसं केलं, तेव्हा ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. खरं तर मीच तिला मनोमन सलाम केला. या मुलींना शिकवणारे शिक्षक/शिक्षिका तरूणच होते. तेही खूप प्रसन्न आणि उत्साही होते. या मुलींमधली मुस्कान नावाची मुलगी खूपच चुणचुणीत होती. एकामागून एक प्रश्न विचारत होती, तिच्या प्रश्नांची मालिका संपतच नव्हती.
सोनाली, साक्षी, नम्रता, करूणा, नंदिनी, सबा, माझ्या लक्षात राहणार नाहीत इतकी गोड नावं असलेल्या गोड मुली आज भेटल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मी इसलीए राह संघर्ष की हम चुने, तू जिंदा तू जिंदगीकी जित पर यकीन कर आणि वैभवची सांज घराशी ही कविता गायले. मुलींची दाद मिळवली आणि त्यानंतर तिथेच वनभोजन करून तृप्त होऊन घरी परतले. मनात मेरी आणि नयन यांना 'थँक्यू' असं खूप वेळा म्हणूनही झालं.
दीपा देशमुख, पुणे