अनर्थ - नाशिक इथे पार पडलेला दिमाखदार प्रकाशन समारंभ आणि मुलाखत
२५ मे २०१९ या दिवशी सायंकाळी ६ वाजता कुसुमाग्रज स्मारक इथल्या विशाखा सभागृहात, पुस्तक पेठ नाशिकच्या वतीनं नाशिकचे प्रख्यात आर्किटेक्ट संजय पाटील यांच्या हस्ते अच्युत गोडबोले लिखित आणि मनोविकास प्रकाशन निर्मित ‘अनर्थ - विकासनीतीःसर्वनाशाच्या उंबरठ्यावर?’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या वेळी नाशिकचे प्रसिद्ध साहित्यिक लोकेश शेवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनर्थ पुस्तकाची निर्मिती करण्यामागची भूमिका मनोविकासचे अरविंद पाटील यांनी सांगितली, तर लोकेश शेवडे यांनी सद्यःस्थितीत अनर्थ या पुस्तकाची आवश्यकता असल्याचं सांगितलं. संजय पाटील यांनी आपल्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला याचा आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या. यानंतर लगेचच व्यासपीठावरचे मान्यवर सभागृहात स्थानापन्न झाले आणि मी अच्युत गोडबोले यांच्याशी अनर्थ पुस्तकावर खास करून संवाद साधला.
मॉल आणि कॉर्पोरेट संस्कृतीमधून आलेला शहरी लखलखाट डोळ्यांना सुखावणारा वाटत असला तरी तो किती बेगडी आहे, विकासाच्या प्रक्रियेतून समृद्धी आणि समता निर्माण होण्याऐवजी विषमता आणि निसर्गाचं शोषण कसं होत आहे, अधिक नफ्याच्या हव्यासापोटी प्रदूषणाचा विळखा कसा घट्ट होतोय, जोडीला भीषण दारिद्र्य, कोंडीत सापडलेला शेतकरी आणि शेती, पर्यावरणाचा र्हास, हवामानातले बदल हे प्रश्न गंभीर बनले आहेत. ही सगळी अनर्थकारी स्थिती निर्माण का झाली आणि आज ही स्थिती विनाशाच्या कुठल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे? यावर काही उपाय आहेत की नाही? विकासनीती म्हणजे काय, जागतिकीकरणाचा इतिहास, त्याची कारणं आणि त्याच्यामुळे आयुष्यावर झालेले परिणाम, चंगळवाद आणि मानसिकता, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी या सगळ्या प्रश्नांचं वेध घेणारं पुस्तक अनर्थ असल्यामुळे या सर्व प्रश्नांबाबतची उत्तरं जाणून घेण्यासाठी अच्युत गोडबोलेंची मुलाखत घेण्यात आली होती.
विस्तृत आकडेवारीसह प्रत्येक प्रश्नामागचं गांभीर्य अच्युत गोडबोले यांनी उपस्थितांच्या नजरेला आणून दिलं. हे सगळं आपल्याला विनाशाकडे कसं नेत आहे आणि आपण वेळीच सावध होण्याची कशी गरज आहे याविषयी ते खूप तळमळीनं बोलले. खरं तर २५ मे या दिवशी नाशिकमध्ये अनेक कार्यक्रम असूनही अनर्थच्या प्रकाशन समारंभ आणि मुलाखत या कार्यक्रमाला नाशिकच्या सजग नागरिकांनी गर्दी केली होती. सभागृह संपूर्ण भरले होते. नाशिकच्या पुस्तकपेठेच्या निखिल दाते यांनी खूपच परिश्रम घेतलेले दिसून येत होते. मुलाखतीनंतर सर्वच वयोगटातल्या लोकांनी अच्युत गोडबोले यांना प्रश्न विचारले.
या प्रसंगी अनर्थ आणि आमच्या सर्वच पुस्तकांची विक्री सवलतीच्या दरात पुस्तक पेठ, नाशिकतर्फे करण्यात आली होती. अनर्थ बरोबरच कॅनव्हास, जीनियस, सिंफनी ही पुस्तकं वाचकांनी विकत घेतली होती आणि त्यावर स्वाक्षरी करताना खूप आनंद होत होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळचे मुख्य संपादक श्रीमंत माने, अर्थशास्त्र अभ्यासक आणि लेखक मिलिंद मुरुगकर, घरकुलच्या संचालिका विद्या फडके, शुभम शेंडे, पल्लवी अकोलकर, माझी मैत्रीण वैशाली आणि तिच्या गोड मुली राधा आणि आर्या, गीता या सर्वांच्या उपस्थितीनं आणि भेटीनं आनंदात आणखीनच भर पडली. कार्यक्रम चांगला झाला, श्रोत्यांनी येऊन पसंतीची पावती दिली की समाधान वाटतं.
जरूर जरूर वाचा - अनर्थ!
दीपा देशमुख, पुणे