जिजाऊ ज्ञानतीर्थ गुरूकुल, परभणी
जिजाऊ ज्ञानतीर्थ गुरूकुल, परभणी पुण्याहून परभणीला पोहोचताच काहीच वेळात मी आणि धनू नागेश, विशाखा आणि अहमद यांच्याबरोबर जिजाऊ ज्ञानतीर्थ गुरूकुल इथं पोहोचलो. शेतात असलेली दुमजली भव्य इमारत! इथं पहिलीपासून ते बारावी पर्यंतचे मुलं-मुली शिकायला असून आत्महत्त्या केलेल्या शेतकर्यांची मुलं-मुलीही निवासी आहेत. संस्थेच्या संचालिका ऊषा लोहट आमच्यासोबत होत्या. ही संस्था श्री नीतीन लोहट यांच्या आजोबांच्या विचारांचा वारसा असलेली आहे. सगळं लोहट कुटुंब या मुलांच्या सर्वांगीण विकासावर झटत असलेलं बघायला मिळालं. इथली सगळी मुलं अतिशय चुणचुणीत आणि अभ्यासात हुशार तर होतीच, पण अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टीत त्यांना रस असलेला दिसला. उषा लोहट यांचं वाचन प्रचंड असून त्यांचं वर्क्तृत्वही खूप चांगलं असल्याचं लक्षात आलं. स्वभावानं त्या अतिशय मनमिळाऊ आणि अगत्यशील आहेत. कार्यक्रमासाठी सगळी मुलं सभागृहात स्थानापन्न झाली होती. उषा लोहट यांनी माझा परिचय करून दिला, तोही त्यांच्या खास शैलीत. मुलांना आठवीच्या पाठ्यपुस्तकात माझा पाठ असल्यामुळे ती उत्सुकतेनं माझ्या बोलण्याची वाट बघत होती. न्यूटन, लुई पाश्चर, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, विश्वेश्वरैया यांचं बालपण आणि त्यातल्या गमतीजमती, पुढे त्यांनी लावलेले शोध यावर मुलांशी संवाद झाला. मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र वातावरणात खरी रौनक आली ती धनूच्या एन्ट्रीनं! धनू खुर्चीतून उठला आणि व्यासपीठावरून उडी मारून मुलांमध्ये शिरला. त्यांच्या अंगात विंदांची पिशी मावशी संचारली होती.....मुलं हसत होती, टाळ्या पिटत होती, घाबरत होती, किंचाळत होती.....मुलांना आनंद देणारी, शिकवणारी, हसवणारी नाट्यकला धनूच्या पिशी मावशीतून व्यक्त झाली होती. परतताना, मुलांचा निरोप घेताना मुलांचे आनंदी चेहरे आमच्या मनःपटलावर कोरले गेले हे मात्र खरं! दीपा देशमुख, पुणे.