पुणे महानगरपालिका कामगार युनियनची पंच्च्याहत्तरी आणि सिंफनी!
पुणे महानगरपालिका कामगार युनियनची पंच्च्याहत्तरी आणि सिंफनी! ८ डिसेंबर २०१८ ची सायंकाळ माझ्यासाठी खूप अनोखी असणार होती. भारतातलं शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या आघाडीवर असणारं शहर म्हणजे पुणे! आता तर राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणूनही पुण्याचा क्रमांक झळकतोय. अभिमान वाटावा अशा पुणे शहरात पुणे महानगरपालिका कामगार युनियनची स्थापना १९४३ साली झाली. मुंबईहून पुण्यात आल्यावर मुक्ता मनोहर@Mukta Ashok Manohar या मैत्रिणीमुळे मला कामगार युनियनचं खूप जवळून दर्शन झालं.
त्या आधी अतुल पेठेनं दिग्दर्शित केलेला आणि पुणे महानगर पालिका कामगार युनियनची निर्मिती असलेला 'कचराकोंडी' हा माहितीपटही बघितला होता. त्या वेळी सफाई कामगारांचं जगणं बघून अंगावर काटा आला होता. जसजशी मी युनियनच्या अनेक कार्यक्रमांना जाऊ लागले, तसतसं शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं कामगारांचं योगदान बघून थक्क झाले. युनियनच्या ७५ वर्षांच्या कालावधीत सफाई कामगारांमध्ये सगळ्यात बाबतीत जागृती आली. त्यांच्या कुटुंबातली मुलं-मुली एवढंच नव्हे तर सुना-जावई हे एमएस्सी, इंजिनिअर, वकील झालेले बघायला मिळाले. युनियननं कामगारांसाठी सर्वच क्षेत्रात अनेक उपक्रम राबवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात कामगारांचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं.
अतुल पेठे यांनी 'सत्यशोधक' हे महात्मा जोतिबा फुले यांचं आयुष्य आणि कार्य यावरचं नाटक दिग्दर्शित केलं, तेव्हा पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं त्यात कामगार स्त्री-पुरुष यांनी असा अभिनय केला की या नाटकातून त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर राजधानी दिल्ली देखील गाजवली. गणित, विज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक विषयांबाबतची प्रशिक्षण युनियनतर्फे कामगारांसाठी आजही वेळोवेळी आयोजित केली जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यातले सफाई कामगार शहराची स्वच्छता जास्त चांगल्या पद्धतीनं राखतात आणि ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद आहे. देशभरात कुठेही अन्याय झाला, तर निषेधाचे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरलेले पुणे कामगार युनियनचे कार्यकर्ते आधी दिसतात.
अशा या सर्वगुणसंपन्न पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियननं ७५ वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या कामगारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आपला वर्धापनदिन किंवा पंच्च्याहत्तरी साजरी करताना युनियननं कामगारांमध्ये असलेल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर म्हणजेच ८ डिसेंबर २०१८ च्या सायंकाळी आमच्या 'सिंफनी'वर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला अच्युत गोडबोले, मी आणि अपूर्व यांचं स्वागत युनियनच्या वतीने करण्यात आलं. अच्युत गोडबोले यांचा आवाज बसल्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर कार्यक्रम संपेपर्यंत मी श्रोत्यांबरोबर संवाद साधण्यात गुंग झाले. सिंफनीची निर्मिती, पाश्चात्य संगीतातल्या रचना, त्यावर आधारित असलेली हिंदी चित्रपटातली गाणी आणि किस्से यांनी मैफल रंगत गेली.
पडद्यावर कधी एल्व्हिस प्रीस्ले तर कधी बीटल्स, कधी राज कपूर, तर कधी माधुरी दिक्षित गाताना, नृत्य करताना दिसत होते. समोरचे श्रोते माना डोलावत, हातांनी ठेका धरत पसंतीची पावती देत होते. खरं तर कार्यक्रम कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही. सुरुवातीला मोझार्ट ची 40no chi symphony सादर केली आणि त्यानंतरच गाणं गदिमा यांनी लिहिलेलं फांद्यावरी बांधीले ग सादर केलं. माझ्या विनंतीला मान देऊन गदिमा यांचे सुपुत्र आणि सुनबाई म्हणजेच माझे मित्र शरद आणि नीता माडगुळकर कार्यक्रमाला आवर्जून आले याचा आनंद देखील शब्दातीत होता. आमच्या आधी असलेला लिज्जत पापड पुरस्काराचा कार्यक्रम उशिरा संपल्यामुळे थिएटर उशिरा ताब्यात येऊनही युनियनच्या सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांनी अतिशय अल्पवेळात व्यासपीठावरची बैठक व्यवस्था, ध्वनियंत्रणा आणि प्रकाश योजना यांची व्यवस्था केली. संदीप चौरे, जाधव, शैलेंद्र यांच्या सहकार्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभारच मानायला हवेत.
'सिंफनी'चा कार्यक्रम संपल्यानंतर मनोविकासच्या पुस्तकाच्या स्टॉलवर@Manovikas Prakashan आमची पुस्तकं घेण्यासाठी एकच गर्दी झाली. सिंफनी, कॅनव्हास, तंत्रज्ञ जीनियस अशा पुस्तकांची विक्री जास्त झाली आणि त्यावर स्वाक्षरी करणं, पुस्तक घेणार्यांचा परिचय, त्यांच्याबरोबरचे फोटो हे क्षण तर आणखीनच सुखावणारे होते. Thanks, Appa, Mahesh Sakhare, Sonali Badhe-kadam, Arundhati, Indira Saha, Neeta Madgulkar and Sharadji. घरी परतताना एकीकडे मनात सिंफनी हलकेच वाजत होतीच, पण दुसरीकडे पंच्च्याहत्तरीचा सोहळा साजरा करणारी पुणे महानगरपालिका कामगार युनियनसाठीची कृतज्ञताही व्यक्त होऊ पाहत होती.
दीपा देशमुख, पुणे