मढेवडगावमध्ये साजरा झाला आंतरराष्ट्रीय महिला दिन!

मढेवडगावमध्ये साजरा झाला आंतरराष्ट्रीय महिला दिन!

तारीख
-
स्थळ
मढेवडगाव

सकाळी साडेसहा वाजता रथरूपी गाडीचालक चंदू आणि मी दौंडमार्गे मढेवडगावचा रस्ता पकडला. चंदूने सहा महिन्यांपूर्वी नवीन टॅक्सी घेतली, पण नव्या टॅक्सीत बसण्याचा योग् महिला दिनाच्या दिवशीच येणार होता! चंदूची हालहवाल विचारत आणि महत्वाचे फोन कॉल्स करत प्रवास सुरू होता. अगदी ठरलेल्या वेळेत ग्रामपंचायत मढेवडगाव परिसरात पोहोचलो. मंडपात फेटे बांधून मोजता येणार नाहीत इतक्या सर्व वयोगटातल्या स्त्रिया खुर्च्यांवर स्थानापन्न झालेल्या दिसल्या. नुकत्याच त्या प्रभातफेरी काढून आलेल्या होत्या. विशेष म्हणजे मंडपात पुरुषही तितकेच उपस्थित होते. मढेवडगाव हे चार ते पाच हजार लोकसंख्येचं गाव! स्वच्छ परिसर, टुमदार, छोटी छोटी घरं, सुशिक्षित स्त्रिया, कार्यक्रमाचं नेटकं आयोजन...मस्तच वाटलं.

तसंही मला मोठ्या शहरांपेक्षा गावांमधल्या लोकांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर संवाद साधायला आवडतो. त्यातच श्रीगोंद्याच्या माझ्या अनंत झेंडे-शुभांगी-विकास या मुलांच्या शेजारी असलेलं हे गाव, त्यामुळे कार्यक्रमाला ‘नाही’ म्हणायचा तर प्रश्नच नव्हता. मी पोहोचताच सरपंचांपासून सर्व मान्यवरांशी ओळख झाली. फेटेवाले सज्ज असल्यामुळे त्यांनी मलाही लगेचच फेटा बांधला आणि मीही इतर स्त्रियांसाठी रुबाबदार दिसायला लागले (म्हणजे मला तसं वाटायला लागलं!) जिजाबाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून नमस्कार केला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. इतक्या लहान गावात मुली इंजिनिअर, डॉक्टर्स, पायलट, वकील, पोलीस अधिकारी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवताना पाहून खूपच अभिमान वाटला. त्यांचा सत्कार करताना, त्यांना सन्मानचिन्ह देताना त्यांचं किती कौतुक करावं असं वाटलं. मी उपस्थितांशी संवाद साधला, उपदेश, कंटाळवाणा सल्ला असं भाषण करायला मला स्वतःलाच आवडत नसल्यानं सुरुवातीपासूनच त्यांच्याशी छान गप्पा मारल्या.

सुरुवात करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, विवेकानंद, महर्षी धोंडो केशव कर्वे असे सगळे लोक आठवत होते. ‘ज्या देशात स्त्रीला मान नाही, तो देश सुसंस्कृत नाही’ असं गांधीजी म्हणत. ते आठवलं आणि मढेवडगावच्या तेजस्वी स्त्रिया समोर दिसायला लागल्या. राजेंद्र परमार या तरुण अधिकार्याची कष्टकरी आई परिघाबाई पानसरे आठवल्या. माझाच म्हणजेच एका स्त्रीचा आदिम काळापासूनचा आजपर्यंतचा प्रवास झर्रकन डोळ्यासमोरून सरकला. महिला दिन साजरा का केला जातो, त्यामागचा इतिहास काय, विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना साधा मतदानाचाही हक्क नव्हता तेही आठवलं आणि मग आठवली ती क्लारा झेटकिन! न्यूयॉर्कमध्ये कापड उद्योगातल्या स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून केलेली निदर्शनं, हक्कासाठी केलेल्या मागण्या...स्त्रीच्या या प्रवासात माझ्यासमोर उभी होती, दोन वेळा नोबेल पुरस्कारानं गौरवली गेलेली मेरी क्युरी....तिच्या वाट्याला आलेली उपेक्षा आणि तरी न डगमगता तिनं केलेलं अतुलनीय कार्य, तेही आठवलं.

स्त्रियांना संपवणार्‍या, त्यांचं जगणं नाकारणार्‍या काही प्रथा आठवल्या, यात सतीच्या प्रथेविरोधात बंड करणारे राजा राममोहन रॉय आठवले आणि त्यांची लाडकी वहिनी अलकमंजिरी देखील! भारतातून सतीची प्रथा कायद्यानं कशी हद्दपार करण्यात आली हेही आठवलं आणि मग स्त्रीची स्वातंत्र्याकडली वाटचाल दिसू लागली. रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आठवली. पिंजर्‍यातला एक पक्षी आणि स्वच्छंद निसर्गात विहरणारा दुसरा पक्षी यांच्यातला संवाद स्वातंत्र्याची व्याख्याच जणूकाही सांगत होता. आपला मार्ग, त्यावर वाटचाल करताना परिश्रम करू, शॉर्टकटचा आधार न घेता चालत राहू कारण त्यानंतर मिळालेलं यश हे कायमस्वरूपी असेल. स्वातंत्र्यासाठी संघर्ष अटळ असतोच. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या, कर्तव्यं आपण पार पाडायला हवीत. महिला दिन एका दिवसासाठी नाही तर आपलं आयुष्य, आपलं जगणं सुंदर करण्यासाठी रोजच आपल्या कृतीतून, आपल्या कामातून साजरा करू या. महिला आणि पुरूष असं वेगळं न पाहता एक व्यक्ती म्हणून बघत मी मनापासून दोघांनाही शुभेच्छा दिल्या. संवादाचा शेवट अर्थातच चळवळीतलं माझं आवडतं गाणं, 'इसलिये राह संघर्ष की हम चुने’ या गाण्यांच्या काही ओळी गावून केला.

इसलिये राह संघर्ष की हम चुन 
जिंदगी आसूमे नहाई न हो
शाम सहमी न हो, रात हो ना डरी
भोर की आख फिर डबडबाई न हो
इसलिए....
सूर्यपर बादलोंका न पहरा रहे,
रोशनी रोशनाईमे डुबी न हो
युं ना इमान फूटपाथपर हो खडा
हर समय आत्मा सबकी उबी न हो
हो किसी के लिए मखमली बिस्तरा
और किसीके लिए इक चटाई न हो
इसलिये....

मी सगळ्यांचा निरोप घेतल्यानंतर तिथेच दुपारी स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्या संवादाआधी श्रीगोंदे इथून आलेल्या डॉ. विकास सोमवंशी या तरुण डॉक्टरनं महिला दिनाचं औचित्य साधून स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ कसा काढला पाहिजे आणि आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवलं पाहिजे याबद्दल अतिशय सोप्या पद्धतीनं दैनंदिन जगण्यात काय काय करायचं या गोष्टी सांगितल्या. मढेवडगावची सून झालेल्या पोलीस अधिकारी तरुणीनं देखील महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार होते आणि त्यानंतर सगळ्यांसाठी चविष्ट भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

मी निघाले तेव्हा अतिशय चुणचुणीत आणि गोड अशा कॉलेजकन्यकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले, तर ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ग्रुप फोटो काढले. अनंताची भेट होऊ शकली नाही, पण शुभांगी आणि विकास आणि त्यांची अख्खी टीम श्रीगोंदे इथून मला भेटायला आणि ऐकायला आली होती. अनंता आणि शुभांगी यांनी प्रेमानं माझ्यासाठी आठवणीनं हरभरा आणला होता. निघताना नंदिनी वाबळे यांनी अगत्यानं त्यांच्या घरी नेलं आणि आग्रहानं अतिशय सुग्रास असं जेवण जेवायला लावलं. लखुजी जाधव यांच्या वंशज असलेल्या वाबळे या खूपच कर्तबगार असल्याचं जाणवलं.

सरपंच महानंदा मांडे आणि उपसरपंच कल्याणी गाढवे या कार्यतत्पर आणि हसतमुख मैत्रिणींशी ओळख झाली.

गाडीत बसताच मी तृप्त मनानं डोक्यावरचा फेटा उतरवला, चंदूनं माझ्याकडे बघत हसतच गाडी सुरू केली आणि आम्ही पुण्याच्या रस्त्याला लागलो!

दीपा देशमुख, पुणे.

८ मार्च २०२०.

कार्यक्रमाचे फोटो