जीनियस, गॅलिलिओ आणि राजू!
आज सकाळी आजच्या कामांची यादी बघितली आणि राजूला फोन केला. राजू प्रवासात होता, त्यामुळे रात्री सविस्तर बोलूया असं ठरलं. राजू इनामदार@Raju Inamdar हा मासूम, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अनेक संस्थांसाठी अनेक वर्षांपासून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याच्यातला साधेपणा, सच्चेपणा आणि कामातली तळमळ यामुळे तो माझा आवडता मित्र देखील आहे. माझ्या कामातही त्यानं अनेकदा मला सहकार्य केलेलं आहे. राजूशी झालेल्या फोनवर 'कामाविषयी रात्री बोलू' असं आमचं ठरलं. आज तो अतुल पेठेंबरोबर सातार्याला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी चालला होता, त्याबद्दल बोलत असतानाच त्यानं मला सकाळी सकाळी खूप छान बातमी दिली. तो म्हणाला, 'दीपाताई, 'जीनियस' Manovikas Prakashan ही मालिका लिहून शेकडो/हजारो लोकांवर तुम्ही उपकारच केले आहेत.' तो 'जिनियस' मालिकेवर भरभरून बोलत होता. तो म्हणाला, 'कॉलेजच्या मुलांसमोर जेव्हा मी गॅलिलिओ हे पुस्तक वाचायला घेतलं, तेव्हा सुरुवातीला मी साशंक होतो की ही मुलं एवढं पूर्ण पुस्तक शांतपणे ऐकतील का? मात्र सगळीच मुलं माझं पूर्ण वाचन होईपर्यंत एकाग्रचित्ताने ऐकत होती.
त्यानंतर गॅलिलिओवर चर्चा झाली. आता ही मुलं गॅलिलिओवर नाटक बसवताहेत. गॅलिलिओच्या आयुष्याबरोबरच त्यानं विज्ञानात केलेलं कामही मुलांपर्यंत पोहोचलं. या मालिकेमुळे ठिकठिकाणी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं सोपं होतंय.' राजू खूप मनापासून बोलत होता आणि मी मात्र 'जीनियस' या मालिकेचा पहिला भाग लिहितानाच्या त्या आठवणींमध्ये गेले.
गॅलिलिओचा गणितावरचा 'आसेयर' हा ग्रंथ, त्याची गणितासारखा क्लिष्ट विषय समजावून सांगायची अतिशय सोपी पद्धत, त्यातली चिकाला या किटकाची गोष्ट, त्याचं उत्तम वर्क्तृत्व, त्यांचा संगीतातला रस, गॅलिलिओनं मांडलेली वेग आणि बल यांची संकल्पना, त्यानं निर्माण केलेली दुर्बिण, तापमापक, त्याचे ‘डॉयलॉग’ आणि ‘डिसकोर्सेस’ हे महत्त्वाचे ग्रंथ (याशिवाय अनेक ग्रंथ त्यानं लिहिले ते वेगळेच.), आणि 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' असं म्हटल्यामुळे आयुष्यभर कट्टर सनातनी समाजानं (प्रामुख्यानं चर्च!) केलेला त्याचा अतोनात छळ (यात त्याच्या कुटुंबाची झालेली फरफट, शेवटी तर त्याची दृष्टी देखील गेली.) हे सगळं आठवून, पुन्हा एकदा डोळ्यातून पाणी आलं.
विसाव्या शतकातला प्रसिद्ध जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त याच्या लेखणीतून साकारलेलं ‘द लाईफ ऑफ गॅलिलिओ’ हे नाटक १९४५ साली सादर केलं गेलं. हे नाटक इंग्रजी भाषिक देशांमध्ये खूपच लोकप्रिय झालं. पुढे १९७५ मध्ये याच नाटकावर आधारित ‘गॅलिलिओ’ नावाचा चित्रपटही निघाला. गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी म्हणजे १९८२ साली ‘सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो या विषयीची जुनीच केस पुन्हा चर्चमध्ये उभी राहिली. मग त्यावर १० वर्ष विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले. शेवटी सगळे पुरावे बघून १९९२ साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी ‘गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते’ हे कबूल केलं. तेव्हा ही बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मथळ्यावर झळकली होती! गॅलिलिओनं कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिद्ध केल्याशिवाय खरी मानली नाही. गॅलिलिओला पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हटलं जातं ते उगाच नाही! आज हे सगळं राजूमुळे पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहिलं.
कला, विज्ञान, समता आणि अंधश्रद्धेच्या विरोधातच आपलं लिखाण असेल हे ठरवल्यामुळे आणि तसंच जगायचा प्रयत्न करत असल्यामुळे खूप खूप समाधान मिळतं. त्यातच जेव्हा आपल्या लिखाणाचं रुजणं सर्वदूर होतंय हे कळलं की तो आनंद द्विगुणित होतो. थँक्स राजू, माझी सकाळच नव्हे तर संपूर्ण दिवस तू गॅलिलिओमय करून टाकलास. हा राजू तुमच्यासमोर वेगळ्या रुपात चारच दिवसांत येणार आहे - माझ्या लेखणीतून! तोपर्यंत प्रतीक्षा!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment