Manto

Manto

मंटो हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद
चिखते चिल्लाते नारोंके बिच कई सवाल थे
मै किसे अपना मुल्क कहूँ,
लोग धडाधड क्यों मर रहे थे
इन सब सवालोंके मुख्तलिफ जवाब थे
एक हिंदुस्थानी जवाब, एक पाकिस्तानी जवाब
एक हिंदू जवाब एक मुसलमान जवाब
कोई इसे १८५७ की खंडहरोमे ढुंढता है,
तो कोई इसे मुघले हुकूमत के
मलबेमे टटोलनेकी कोशीश करता है
सब पिछे देख रहे है, मगर आज के कातील
लहू और लोहे से तारीख लिखते जा रहे है
ये मजमून सुनाते सुनाते आप सबसे मार खा लुंगा
हिंदू मुस्लीम फसाद मे गर कोई मेरा सर फोड दे
तो मेरे खून की हर बूंद रोती रहेगी
मै आर्टिस्ट हू
ओछे जख्म और भद्दे घाव मुझे पसंद नही

प्रशांत पाटील Prashant Patil आणि सानिया भालेराव Saniya Bhalerao यांच्यामुळे काल हा चित्रपट वेस्टएंड इथं बघितला. दोघांचेही आभार !!!

अपूर्वला राजकुमार राव साठी स्त्री बघायचा होता आणि मला ‘मंटो’! खरं तर चित्रपट बघितल्यानंतर कुठली प्रतिक्रिया मनात उमटतच नव्हती. बस, सुन्नपणानं मनाला वेढून घेतलं होतं. या चित्रपटातल्या जमेची बाजू म्हणजे नवाजूद्दिन सिद्दिकी याची अप्रतिम अशी सआदत हसन मंटोची भूमिका!

मध्यंतरी मी नेटफ्लिक्सवर श्रीदेवीचा तद्दन टुकार असा ‘मॉम’ चित्रपट बघितला. मात्र नवाजुद्दिन सिद्दिकीच्या त्यातल्या भूमिकेनं त्याच्यापुढे नतमस्तक झाले. इथेही ‘मंटो’ या चित्रपटात खर्‍या मंटोला ज्यांनी बघितलं नाही, त्यांनी नवाजुद्दिनला बघितलं तरी तो तंतोतंत समोर येऊन उभा राहतो.

चित्रपटात, स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे भारताचे प्रयत्न, स्वातंत्र्याचा जल्लोष, फाळणीच्या अनगिनत जखमा, उसळलेल्या धार्मिक दंगली, अत्याचार, माणसं ना भारताची राहिली ना पाकिस्तानची, संवेदनशील मनाच्या मंटोवर झालेले मानसिक परिणाम, एका अस्वस्थ मनोवस्थेत त्याचा पाकिस्तानात जाण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर केवळ सात वर्षांचं आयुष्य! त्या सात वर्षांतही कुटुंबाची झालेली फरफट, त्याच्यातल्या प्रेमळ पित्याची तगमग, पत्नीवरचं निरतिशय प्रेम, मित्राच्या श्यामच्या मृत्यूची बातमी कळताच हादरून जाणं, शेवटपर्यंत आपल्या लिखाणातून उपेक्षितांचे विशेषतः स्त्रियांचे प्रश्न मांडणारं लिखाण, आपल्या लिखाणाच्या बाबतीत, विचारांच्या बाबतीत कुठेही तडजोड या माणसानं केली नाही. टोबा टेक सिंग, ठंडा गोस्त, काली सलवार या त्याच्या कथा खूप गाजल्या. त्याच्या लिखाणावरून वादळ उठलं. तो अश्लील लिखाण करतो म्हणून त्याच्यावर खटले चालले. वेश्यांच्या प्रश्नाबद्दल तो म्हणतो, ‘अच्छा, उन्हे वहाँ जाने की खुली इजाजत है, और हमे उनके बारे मे लिखने की नही, क्यू नही?’ त्याची ‘दस का नोट’ ही कथा अप्रतिम आहे. शरीरविक्रय करणाऱ्या मुलीची निरागसता यात दाखवली आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी सआदत हसन मंटो या विख्यात उर्दू साहित्यिकाचा मृत्यू झाला. शेवटच्या काळात त्याला दारूनं संपवलं म्हटलं तरी चालेल. चित्रपट बघताना शरदचंद्र यांच्या देवदास या पात्राची आवर्जून आठवण होते. मात्र देवदास आणि मंटो यांच्यातला फरक हा की देवदास अहंकारी असतो, तर मंटोला समाजातल्या प्रश्नांनी अस्वस्थ केलेलं असतं. मुंबई शहरावर मंटोचं अतोनात प्रेम होतं.

या चित्रपटात नंदिता दासनं त्याचं आयुष्य, त्याचा प्रवास आणि त्याचं लिखाण अशी सुरेख सरमिसळ केली आहे. यात परेश रावल, नीरज काबी, रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, जावेद अख्तर, ऋषी कपूर या सगळ्यांच्याच भूमिका सरस झाल्या आहेत. यातले बॉम्बे टॉकीजचे संदर्भ, अशोक कुमार (दादामुनी), नौशाद, जद्दनबाई, इस्मत चुगताई या सगळ्यांचे संदर्भ सुखावून जातात. तसंच कवी शैलेंद्र याचं ‘तू जिंदा है तू जिन्दगीकी जीतपर यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर’ या गाण्यानं तो काळ उभा केला.(मला स्वतःला हे गाणं प्रचंड आवडतं. या चित्रपटात त्याचे संदर्भ आहेत हेही ठाऊक नव्हतं. आणि तरीही योगायोग म्हणजे काल दुपारी एक लेख पूर्ण करत असताना मी हे गाणं २५ वेळा तरी ऐकलं असेल! ) स्वातंत्र्यानं काय मिळालं आणि काय काय हातून निसटलं, हा विचार हा चित्रपट बघून झाल्यावर अस्वस्थ करतोच, पण त्या जखमांबरोबरच सआदत मंटोसारख्या संवेदनशील साहित्यिकाच्या वाट्याला आलेले भोग बघून मनाला जी बेचैनी येते, ती चटकन जात नाही. दंगलीच्या काळात मंटोनं खिशात ठेवलेल्या दोन्ही धर्माच्या टोप्या बघून अंतःकरण अक्षरशः विदीर्ण होतं. त्यानं अखेरपर्यंत विपुल लेखन केलं. मंटोचं सगळंच लिखाण समीक्षकांच्या नजरेतूनही नोंद घेण्यासारखं दर्जेदार ठरलं. अनेकांनी त्याची तुलना डोस्तोवस्की याच्याशी केली आहे. तो म्हणायचा, ‘मै वही लिखता हूँ जो देखता हँ, जानता हूँ, मै तो बस अपनी कहानियोंको एक आइना समझता हूँ, जिसमे समाज आपने आप को देख सके’.

नंदिता दास लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटातली सगळ्यात मोठी उणीव म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना मंटो माहीत आहे असं गृहीत धरून हा चित्रपट काढलाय. त्यामुळे खूप मोठा वर्ग या चित्रपटाकडे फिरकणारच नाही. तसेही चित्रपटगृहात मोजून २० लोक होते. ते मात्र सगळेच मंटोचे चाहते होते. त्यामुळे शेवटची ऋणनिर्देश करणारी नामावळी संपली तरी माझ्यासकट ते सगळे खुर्चीतच बसून होते. मंटो या चित्रपटात नंदिता दासनं मास आणि क्लास दोन्हीचा विचार करून मंटो आणि एकूणच तत्कालिन परिस्थिती यांचा बेस अधिक चांगल्या पद्धतीने हाताळला असता, लिहिला असता, तर..............असो या जर तर ला काहीच अर्थ नाही.

असं असलं तरी मंटो हा बघायला हवा, मंटो समजला पाहिजे, मंटो कळला पाहिजे!

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.