होम
जशी मी फहाद फासिलच्या प्रेमात आहे, तशीच आणि तितकीच मल्याळम चित्रपटांच्या. ‘होम’ या मल्याळम चित्रपटाच्या नावातच खूप काही आलंय. आपल्याच घरासारखं एक घर. ते घर उभं करताना, मुलांना घडवताना, घरातल्या वडिलधाऱ्यांची सेवासुश्रुषा करताना दिसणारं एक जोडपं. दिवसभर घरातल्या कामात व्यस्त असलेली गृहिणी कुट्टीयम्मा आता वयाच्या तिसऱ्या टप्प्याकडे प्रवेश केलेली, तर तिचा नवरा ऑलिव्हर ट्विस्ट (विजय बापू) खरं तर एका चौकटीतलं आयुष्य जगणारा सर्वसामान्य माणूस. सकाळी आपल्या बालमित्राबरोबर फिरायला जाणारा, फिरताना त्याच्याशी मनातलं सगळं बोलणारा, घरी आल्यावर घरातल्या कामांमध्येही हातभार लावणारा, वृद्घ वडिलांचं आपल्या शरीरधर्मावरचं नियंत्रण सुटलेलं असल्यामुळे त्यांचंही सगळं काही स्वत: करणारा. मात्र हे सगळं करत असताना ऑलिव्हर ट्विस्ट आणि कुट्टीयम्मा यांची दोन मुलं दोघांना आणि घराला गृहीत धरायला लागतात.
मोठा मुलगा अँटोनी (कुम्बलिंगी नाईट्समधला मधला भाऊ, जो डान्सचे क्लास घेत असतो, तो श्रीनाथ भासी आठवतोय का?) हा दिग्दर्शक असतोच, पण त्याचबरोबर तो रायटरही असतो. त्याचा पहिला चित्रपट खूप लोकप्रिय ठरलेला असतो, त्यामुळे निर्मात्याची त्याच्याकडून दुसऱ्या चित्रपटाबद्दल अपेक्षा उंचावलेल्या असतात. अँटोनी आपल्या कामानिमित्त शहरात राहत असतो. त्याची पटकथा पूर्ण होत नसते, एक क्रिएटिव्ह ब्लॉक त्याला आलेला असतो आणि तो दूर व्हावा यासाठी तो घरी परततो. तसंच त्याची पहिली कथा त्यानं घरातच बसून पूर्ण केलेली असते, त्यामुळे त्याच ठिकाणी आपण ती कथा ठरलेल्या वेळात पूर्ण करू शकू असं अँटोनीला वाटतं. ऑलिव्हर ट्विस्टचा किशोरवयीन असलेला दुसरा मुलगा चार्ल्स हा आपल्या स्मार्ट फोनवर सतत काही ना काही व्हिडियोज शूट करून सोशल मिडियावर अपलोड करत असतो. त्याच्या खोलीतला पसारा आणि आईवडिलांकडून अपेक्षा करणं यामुळे कुटीयम्मा वैतागलेली असते.
हळूहळू ऑलिव्हर ट्विस्ट आणि कुटीयम्मा यांना आपल्या मुलांच्या वागण्यातल्या अनेक गोष्टी खटकायला लागतात. पण त्यांच्या स्वभावानुसार ते काहीच बोलत नाहीत. दोन्ही मुलं मोबाईल/तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली असतात, पण त्याच वेळी ऑलिव्हर ट्विस्टला देखील स्मार्ट फोन हाताळायचं वेड लागतं. आपल्या मुलांशी या नव्या माध्यमातून आपल्याला कनेक्ट होता येईल या वेड्या आशेनं ऑलिव्हर ट्विस्ट हे तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न करत राहतो. यातून काही घटना अजाणतेपणी अशा घडतात की त्याचा परिणाम त्याच्या मुलाच्या म्हणजेच अँटोनीच्या करियरवर होतो. नव्या जगाशी अपडेट राहतानाची ऑलिव्हर ट्विस्टची धडपड कधी हासू, तर कधी रडू चेहऱ्यावर आणते. यातलं प्रत्येक पात्र काहीतरी सांगतं. यातला एक सायकॉलॉजिस्ट, त्यानं राबवलेला लाफिंग क्लब सारखा एक डान्सिंग किंवा एक्सरसाईज करणारा गट, त्याचं तत्वज्ञान, हळूहळू त्यातही रमलेला ऑलिव्हर ट्विस्ट आपल्याला भेटतो.
‘होम’ या चित्रपटात अँटोनीच्या होणाऱ्या सासऱ्यानं ‘इट्स ऑल अबाउट मी’ नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं असतं. त्याचा प्रकाशन समारंभ व्हायचा असतो. ते पुस्तक अँटोनी वाचत असतो. त्या वेळी ऑलिव्हर ट्विस्ट ते पुस्तक काय आहे याबद्दल अँटोनीला प्रश्न विचारून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आत्मचरित्र लिहिण्यासाठी आयुष्यात खूप काही घडावं लागतं असं अँटोनी बापाला सांगतो. इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच केलं नाहीये अशी टिप्पणी करतो. आपल्या मुलाच्या या बोलण्यानं ऑलिव्हर ट्विस्ट मनातून खूप दुखावला जातो. आपल्या मित्राजवळ तो या भावना व्यक्त करतो. त्या वेळी त्याचा मित्र त्याला त्यांच्या किशोरावस्थेत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करून देतो आणि तो प्रसंग असामान्य असून तू अँटोनीला सांग असं सुचवतो.
मोबाईलवरून कोणाशी न कोणाशी कायम बोलणाऱ्या अँटोनीचा वेळ घेण्याचा प्रयत्न ऑलिव्हर ट्विस्ट करत राहतो. पण आपल्यातच मग्न असलेल्या अँटोनीला ते लक्षातही येत नाही. एकदा वेळ पकडून ऑलिव्हर ट्विस्ट त्याला आपल्या आयुष्यातल्या त्या प्रसंगाबद्दल अँटोनीला सांगतो, तेव्हा अँटोनीला त्यात वडिलांनी विशेष काही केलंय असं वाटत नाही. तो वडिलांना तसं बोलून दाखवतो आणि दुर्लक्ष करतो.
यानंतर बरंच काही घडतं. लग्न ठरल्यानंतरही आपल्या होणाऱ्या बायकोकडे दुर्लक्ष करणारा, तिला समजून न घेणारा, तिला वेळ न देणारा अँटोनी दिसत राहतो. त्याच वेळी त्याचा होणारा सासरा, जो खूप बुद्घिमान, सुह्दय असलेला आपल्या जावयाला समजून घेत असतो. आपल्या होणाऱ्या सासऱ्यावर प्रेम करणारा आपला मुलगा अँटोनी हेच प्रेम आपल्यावर का करत नाही हा प्रश्न ऑलिव्हर ट्विस्टला सतावत असतो.
पुढे एका प्रसंगामुळे अँटोनीची प्रतिमा खालावते आणि त्याच्यावर अनेक संकटाची सूचना करणारे प्रसंग ओढवतात. त्याने बँकेकडून कर्ज काढलेलं असतं आणि तो बँक मॅनेजरचे फोनही उचलणं टाळत असतो. अशा वेळी एके दिवशी कर्जाची रिकव्हरी करणारे अधिकारी थेट घरी येऊन धडकतात, त्या वेळी त्याची उडणारी तारांबळ, लहान भावाचं मोठ्या भावाला सांभाळून घेण्यासाठी धडपडणं, त्यातून होणारी विनोद निर्मिती, ऑलिव्हर टिवस्टचं सरळ वागणं, आणि सगळ्यांसमोर बँकेचे लोक का आले होते, याविषयी बोलणं घडलेल्या प्रसंगाचं गुपित उघड करतं.
त्यानंतर अँटोनीच्या होणाऱ्या सासऱ्याच्या ‘इट्स ऑल अबाउट मी’ या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होतो. आपण आज आपल्या आईमुळेच जिवंत आहोत आणि त्या पुस्तकाचं मुखपृष्टही तिनेच काढलेलं असल्याचं तो सांगतो. आपल्या आईला तो बोलायला सांगतो आणि त्याची आई आपला मुलगा लहान असताना त्यांच्यावर गुदरलेला एक प्रसंग सांगते. हा प्रसंग ऐकून ती, तिचा मुलगा इतकंच नव्हे तर ऑलिव्हर ट्विस्टच्याही डोळ्यात अश्रू दाटून येतात. हा प्रसंग ऐकल्यानंतर अँटोनीला आपल्या वडिलांमधलं असामान्यत्व दिसतं. त्याला आजवर आपण आपल्या वडिलांशी ज्या पद्घतीने वागलो याबद्दल अपराधी वाटायला लागतं. त्या आई आणि मुलावर कुठला प्रसंग ओढवला, ते सांगताना तिच्या आणि इतरांच्या डोळ्यात अश्रू का आले, या एकाच प्रसंगानं अँटोनीला आत्मसाक्षात्कार कसा होतो आणि तो त्याचं प्रायश्चित्त घेतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘होम’ या चित्रपटात मिळतात. चित्रपटाच्या शेवटी ऑलिव्हर ट्विस्टचं कुटुंब, त्याचं घर पुन्हा कसं उबदार कुशीत स्थिरावतं याचं चित्रण ‘होम’मध्ये बघायला मिळतं. आभासी जग आणि वास्तव यांच्यातला बॅलन्स राखणं किती महत्वाचं आहे हेही ‘होम’ हा चित्रपट सांगतो.
‘होम’ या चित्रपटात ऑलिव्हर ट्विस्टची भूमिका करणाऱ्या विजय बापूने ही भूमिका इतकी सहजपणे साकारलीय, की त्याच्यातला साधा भाबडा सरळमार्गी माणूस सतत दिसत राहतो. मुख्य म्हणजे ऑलिव्हर ट्विस्टचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा वाटतो. ऑलिव्हर टिवस्टचं नाव, त्याच्या बहिणीचं आणि भावाचं नाव - या नावामागची गोष्ट देखील खूप रोचक असते. खरं तर यात सगळ्याच कलाकारांन आपापल्या भूमिका उत्तमपणे उभ्या केल्या आहेत. यातला एक एक प्रसंग आठवण्यसारखा आहे. अँटोनी जेव्हा घरी राहायला येतो, तेव्हा त्याची गाडी ऑलिव्हर ट्विस्ट स्वत: धूत असतो, त्याच वेळी त्याचं लक्ष घराच्या बाल्कनीकडे जातं, तिथे त्याचा लहान मुलगा चार्ल्स उभा असतो. आपल्या लहान मुलाला आपण जे करतोय त्याची जाणीव आहे असं वाटून तो त्याच्याकडे बघून हसतो, तेव्हा चार्ल्स खाली येतो आणि गाडीच्या बाजूला उभ्या असलेल्या आपल्या स्कुटीकडे खूण करून निघून जातो. गाडी धुवून झाल्यावर ही स्कुटी वडिलांनी धुवावी असं त्यानं सांगितलेलं असतं आणि तेही न बोलता. असे अनेक प्रसंग संवादाशिवाय या चित्रपटात उभे केले आहेत.
‘होम’ या चित्रपटाचं अप्रतिम असं दिग्दर्शन रॉजीन थॉमस यानं केलं असून याचा निर्माता हा विजय बापू आहे. मल्याळम चित्रपटांचं छायाचित्रण डोळयांना तृप्त करणारं असतंच, तसंच याही चित्रपटाचा कॅमेरा नील डिकुंचा यानं हाताळला आहे. होम हा चित्रपट नुकताच म्हणजे १९ ऑगस्ट 2021 या दिवशी अमॅझोन प्राईमवर प्रदर्शित झाला असून बहुतांश लोकांनी याला पाच पैकी पाच किंवा अगदी पावणेपाचचं रेटिंग दिलं आहे हे विशेष.
हा चित्रपट नितांत सुंदर आहे. हा चित्रपट न बघणं म्हणजे खूप काही मिस करणं ठरेल. जरूर बघा, ‘होम‘.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment