रॉकेट बॉईज

रॉकेट बॉईज

भारताला स्वातंत्र्य  मिळण्यापूर्वीचा काळ, स्वातंत्र्यासाठी झगडणारे भारतीय, भारतातली विज्ञानाच्या क्षेत्रातली परिस्थिती, रामानुजन, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सी. व्‍ही. रामन, सत्येन बोस, शांतिस्वरूप भटनागर यासारखे जीनियस वैज्ञानिक. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आर्थिक आणि मानसिकरित्या उद्घवस्त झालेल्या भारतात रस्ते, रेल्वेमार्ग, शेती, शिक्षण, रोजगार, उद्योग, अशा अनेक गोष्टींवर काम करत असतानाच संशोधनावर/संशोधनकेंद्र स्थापन करण्यावर, खूप मोठा भर दिला आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं. शांतिस्वरूप भटनागर, विक्रम साराभाई यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या पायावर दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती करत रोजगार उपलब्ध करण्याचं काम केलं. थोडक्यात, विज्ञान हे प्रयोगशाळेत बंदिस्त न होता, लोकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग कसा करता येईल याची दक्षता त्यांनी घेतली. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर विज्ञानावर प्रेम असणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या, विज्ञानाला आपल्या जगण्याचा भाग बनवणाऱ्या अशा सगळ्यांसाठी आणि इतर सगळ्यांसाठी देखील सोनी लिव्‍हवर उपलब्ध असलेली वेबसीरीज म्हणजे ‘रॉकेट बॉईज’!

अणुऊर्जेची निर्मिती करून भारताला बलशाली बनवण्याचं स्वप्न बघणारे होमी भाभा आणि अवकाश संशोधनाचं महत्व जाणणारे विक्रम साराभाई या दोन विज्ञानप्रेमी मित्रांची गोष्ट यात चित्रीत केली आहे. दोघांचं देशांवरचं प्रेम तितकंच, पण वैचारिक मतभेदही तितकेच. दोघांचे मार्ग निराळे असले तरी विज्ञानावरच्या प्रेमानं ते न बोलवता एकत्रही येतात. दोघांचा वैज्ञानिक आणि वैयक्तिक जीवनाचा प्रवास ‘रॉकेट बॉईज’ या मालिकेतून उलगडत जातो. मालिकेच्या पहिल्याच भागात - १९६२ साली चीनने भारतावर हल्ला केला, तेव्‍हा होमी भाभा आपण अणुबॉम्ब बनवणार असं ठरवतात, तेव्‍हा विक्रम साराभाई आपण यात सामील होणार नसल्याचं सांगतात. त्या वेळी आपल्याला पळपुटा, देशद्रोही म्हटलं तर चालेल का असं विचारल्यावर विक्रम साराभाई, देशद्रोही तर देशद्रोही पण तुझ्याबरोबर राहून मी देशाचं नुकसान होऊ देणार नाही’ असं ठामपणे सांगतात. 

केंब्रिजमध्ये शिक्षण घेतलेले विक्रम साराभाई तिथे असतानाही रॉकेट तयार करण्यासाठी अनेक प्रयोग करत असतात. एकदा ते रॉकेटचा प्रयोग करताना सुरूवात तर चांगली होते, पण क्षणार्धात ते रॉकेट लगेचच खाली येऊन कोसळतं. त्या वेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद मावळतो. त्या वेळी साराभाई त्याला माझ्याकडे कधीही न संपणारा उत्साह असल्याचं सांगतात. आता पुढे काय असा प्रश्न आपसूकच साराभाईंच्या मित्राच्या ओठातून बाहेर पडतो, तेव्‍हा अजून एक प्रयत्न असं ते शांतपणे सांगतात.

या मालिकेच्या प्रत्येक भागात अनेक प्रसंग आपल्या चेहऱ्यावर हासू फुलवतात. भाभा आणि साराभाई यांच्यातली औपचारिकता गळून दोघंही जेव्‍हा एकमेकांच्या जवळ येतात आणि नावानं हाक मारायला लागतात. ब्रिटिशांची घमेंड उतरवताना भाभा आणि साराभाई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरच्या इमारतीवरून इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून स्वराज्याचा झेंडा फडकवतात तेव्‍हा त्यांच्या चेहऱ्यावर झळकतानाचा आनंद बघत राहावा असा. झालेल्या अपमानामुळे संस्थेची देणगी ब्रिटिश बंद करतात आणि होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्यावर केस दाखल करतात. कोर्टात प्रवेश करतानाही दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असतं आणि शेकडो कार्यकर्ते चले जाव च्या घोषणा करत न्यायालयाबाहेर आणि आत उभे असतात. होमी भाभाचे कायदेतज्ज्ञ असलेले वडील जहाँगीर भाभा कोर्टातून निर्दोष सोडवतात. त्या वेळी विक्रम साराभाई बाहेर आल्यावर त्यांना, हे सगळं माझ्यामुळेच झालं, होमीचा त्यात काहीच दोष नाही असं सांगायला लागतात, त्या वेळी जहाँगीर भाभा, मला माहिती माझा मुलगा कसा आहे ते, तो कधीच कोणाच्या ऐकण्यात येत नाही, ‘आईचा मुलगा’ असं म्हणून गाडीत बसतात. दोघंही धावतच गाडीमागे जातात आणि विक्रम साराभाई मी समोर ड्रायव्‍हरसीटच्या बाजूला बसतो, तू मागे बस असं म्हणतात आणि दोघंही गाडीचं दार उघडणार तेवढ्यात जहाँगीर भाभा, तुझ्या आईने हट्ट केला म्हणून मी तुला सोडवलं, तुला खूपच हिरोगिरी करायची असली तर ती कर, पण तुझं तू ये असं म्हणून दोघांनाही न घेता तितक्याच कोरड्या चेहऱ्यानं निघून जातात. हा प्रसंग बघण्यात एक वेगळीच मौज आहे. एकीकडे मुलावरचं आत्यंतिक प्रेम, पण त्याच वेळी एका कठोर, शिस्तशीर बापाचाही आवेश, भाभा आणि साराभाई दोघांचेही बघण्यासारखे झालेले चेहरे अशा सगळ्या प्रसंगांनी खरोखरंच एक नितांत सुंदर अनुभव मिळतो.

मी संस्थेचा राजीनामा देतो म्हणजे कदाचित प्रश्न सुटेल आणि ब्रिटिश पुन्हा संशोधनासाठी संस्थेला देणगी देतील असं सी व्‍ही रामन म्हणतात, तेव्‍हा होमी भाभा आणि विक्रम साराभाई दोघंही त्यांना तुम्ही इन्स्टिट्यूट सोडून जाऊ नका आम्ही देणगीदार मिळवतो असं सांगतात. त्यांच्यासमोर जेआरडी टाटा आणि म्हैसूरचे राजे अशी नावं समोर येतात. त्या वेळी सी व्‍ही रामन त्यांना म्हैसूरच्या राजाला विज्ञानापेक्षा कला आवडते, ते का आपल्याला देणगी देतील असं म्हणतात. मात्र हे ऐकून होमी भाभांचा मेंदू वेगानं काम करायला लागतो. होमी भाभा हे फक्‍त एक वैज्ञानिकच नव्‍हते, तर त्यांना संगीत, साहित्य, कला, नाटक सगळ्यांमध्ये खोलवर रस होता. आपण वैज्ञानिक प्रत्येक समस्या सोडवणारे असतो असं ते म्हणतात. त्याच वेळी  शेक्सपिअरचं हॅम्लेट, मॅक्बेथ, किंग लिअर काय करावं असा विचार ते करायला लागतात, त्याच वेळी असत्यावर सत्याने विजय मिळवण्याची गोष्ट सांगणारं रामायण करून आपण देणगी मिळवूया असं विक्रम साराभाई सांगतात. दोघंही एका नृत्यसंस्थेत जातात. तिथल्या गुरूला विक्रम साराभाई आमच्या संस्थेला कशी मदत हवी आहे असं अडखळत सांगतात, आणि त्या वेळी गुरू मात्र त्यांच्यावर भडकतात. तुम्ही बापूसाठी काम करणाऱ्या मृदुलाचे भाऊ आहात म्हणून मी इथून जा असं सांगण्याऐवजी नमस्कार करतो असं म्हणतात. त्या वेळी होमी भाभांना त्या गुरूची नस सापडते आणि ते म्हणतात, ब्रिटिशांनो भारत सोडा. गुरुजी आम्ही क्रांतिकारी आहोत. आम्ही आमच्या संस्थेत स्वराज्याचा झेंडा फडकवला म्हणून ब्रिटिश आमच्यावर नाराज झाले आहेत. आमची संस्था बंद होऊ नये म्हणून आम्ही देणगी मिळवण्याचा कार्यक्रम करत आहोत. होमी भाभांचं बोलणं पूर्ण व्‍हायच्या आतच गुरूजी विक्रमला, अरे तुम्ही देखील क्रांतिकारी आहात, ही गोष्ट आधी का सांगितली नाहीत? असं विचारतात, तेव्‍हा होमी भाभा, क्रांतिकारी असणं आमच्या रक्तातच आहे’ असं म्हणतात तेव्‍हा विक्रम साराभाई आश्चर्याने होमी भाभाचं हे रूप बघतच राहतात आणि गुरूजी मात्र रामायणाची कथा सांगणारा नृत्याचा कार्यक्रम करायला तयार होतात. याच कार्यक्रमात सीतेची भूमिका करणाऱ्या मृणालिनी स्वामीनाथन या तरुणीच्या प्रेमात विक्रम साराभाई पडतात.

विक्रम साराभाई जेव्‍हा मृणालिनी साराभाईच्या प्रेमात पडतात, तेव्‍हा, तिला प्रपोज करताना तारांबळ उडते तेव्‍हा, होमी भाभा त्यांना तिच्याशी बोलण्यासाठी उद्युक्‍त करतात. मृणालिनी जात असताना तिला सीता अशी हाक मारून थांबवणं आणि नंतर काय बोलावं हे न सुचल्याने आपल्याला काम किती आवडलं हेच पुन्हा पुन्हा सांगणं, त्या वेळी विक्रम साराभाईंची उडालेली धांदल बघणं खूप रोचक आहे....त्यानंतर मात्र तिने सुचवल्यानुसार ‘द थिंग्ज टू कम’ या सायन्स फिक्शन असलेल्या चित्रपटाला दोघं जातात. सायन्स फिक्शनवर आधारलेली ती गोष्ट बघून विक्रम साराभाई वैतागतात आणि चित्रपट सुरू असताना मध्ये मध्ये बोलत राहतात. विक्रम साराभाईला गप्प बसवण्याचा प्रयत्न लोक करायला लागतात आणि चित्रपटात रंगून गेलेली मृणालिनी हा चित्रपट इललॉजिकल नसून सायन्स फिक्शनमध्ये काहीही घडू शकतं तू एकतर शांतपणे पहा नाहीतर निघून जा असं त्यांना सांगते. विक्रम साराभाई तिची वाट बघत चित्रपट संपेपर्यंत बाहेर उभे राहतात. तिला सॉरी म्हणतात, मात्र जो माणूस कलेचा आदर करू शकत नाही तो माझा आदर काय करणार असं म्हणून मृणालिनी तिथून निघून जाते. 

विक्रम साराभाई अस्वस्थ होतात आणि आपण राजीनामा दिलाय ही बातमी सांगायला आलेल्या होमीचा एकही शब्द ऐकून न घेता आपल्या मनातल्या मृणालिनीविषयीच्या भावना व्‍यक्‍त करतात. हा प्रसंग देखील खूपच सुंदररीत्या चित्रीत केलाय. आपलं मृणालिनीविषयीचं प्रेम ते विज्ञानाच्या भाषेत व्‍यक्‍त करत राहतात. इट्स लाईक अ ग्रॅव्‍हिटी, कॉन्स्टंट ॲट्रॅक्शन, मॅग्नेटिक फिल्ड असे सगळे शब्द त्यात असतात. होमी भाभा मिश्कील हसत आता तू काय माझा किस घेणार आहेस का असं म्हणत, जा तिच्याजवळ आणि आपल्या भावना व्‍यक्‍त कर असं सांगतात. विक्रम मृणालिनीला घेऊन एका शांत ठिकाणी घेऊन जातात आणि विखुरलेल्या चांदण्यांचं आकाश दाखवत आपलं रॉकेट बनवण्याचं स्वप्न सांगतात. तीही त्यांना आपल्या भरतनाट्यमच्या कलेतून ब्ल्यू लोटस नावाची संस्था उभारून स्त्रियांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचं स्वप्न सांगते आणि दोघंही परतात. प्रेमाविषयी थेट विचारण्याचं राहूनच जातं. मात्र पुन्हा संस्थेत परतल्यावर आपल्याच नादात असलेले विक्रम साराभाई ‘मृणालिनी स्वामीनाथन, मृणालिनी साराभाई, मृणालिनी विक्रम साराभाई’ असं पुटपुटत असतात. त्यानंतर मात्र ती जेव्‍हा शहर सोडून जाणार असं कळतं, तेव्‍हा पुन्हा होमी भाभाचं त्याला समजवतात आणि म्हणतात, जे करायचं ते मनापासून आणि शंभर टक्के प्रयत्न करून. पहिल्याच खेपेला कुठला प्रयोग यशस्वी होतो, पण तो यशस्वी होण्यासाठी सातत्यानं न थांबता प्रयत्न करावे लागतात आणि तू हेही करू शकतोस. तेव्‍हा विक्रम साराभाईंमध्ये आत्मविश्वास वाढीला लागतो आणि तिला थांबवण्यासाठी तिला मनातलं सांगण्यासाठी विक्रम साराभाई आपल्या पीएचडीच्या प्रबंधाचं सादरीकरण अर्धवट सोडून तिच्या चालत्या बसमध्ये चढतात, तिच्या हॉस्टेलवर जाऊन पुन्हा एकदा आपल्या मनातल्या भावना छोटंसं एक रॉकेट उडवून तिच्यापर्यंत चिठ्ठी पोहोवण्याचं काम करतात, तेव्‍हा तो प्रसंगही चेहऱ्यावर हासू आणतो. असे अनेक क्षण या मालिकेत आपल्याला कधी आनंद तर कधी गहिवरून यायला भाग पाडतात.

विक्रम साराभाई आणि होमी भाभा च्या झेंडा प्रकरणाने चिडलेले ब्रिटिश निधी बंद करतात आणि तो सुरू ठेवायचा असेल तर होमी भाभा किंवा सी व्‍ही रामन यांनी राजीनामा द्यावा असं सांगतात. रामन ऐवजी भाभा राजीनामा देतात आणि जेआरडी टाटा यांनी बोलावल्यामुळे ती संधी घेण्याचं ठरवतात. भाभा जाणार असल्यानं कॉस्मिक रेचं युनिट बंद होतं आणि त्यातलं सामान भाभाबरोबर जाणार असतं. विक्रम साराभाई धावत येऊन होमी भाभांना आपण ब्रिटिश सोडून आणखी लोकांना भेटून निधी जमवू सांगतात. पण त्या वेळी होमी भाभा आपलं काम संशोधन करणं असून इतर कामात ऊर्जा घालवणं नाही असं सांगतात. साराभाई भाभांना तू विद्यार्थ्यांचं नुकसान वैयक्तिक संधीमुळे करतो आहेस असं सुनावतात. त्या वेळी भाभा शांतपणे त्यांना संधीचा उपयोग करून काम करण्यात चांगलं वाईट, योग्य अयोग्य करत बसण्यात मला रस नसल्याचं सांगतात आणि तू सुद्घा येणाऱ्या संधीचा उपयोग केला नाहीस, तर मागे पडशील असाही सल्ला देतात. होमी भाभाची दूरदृष्टी आणि अलिप्तपणे विचार करण्याची वृत्ती तर विक्रम साराभाईची संवेदनशीलता आणि स्वप्नाळू स्वभाव अनेक छोट्यामोठ्या प्रसंगांमधून जाणवत राहतो.

या मालिकेतले अनेक संवाद अंतर्मुख करतात. विक्रम साराभाई आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातले असून त्यांच्या घरातलं वातावरण गांधी विचारांनी प्रभावित झालेलं दिसतं. त्यांची बहीण मृदुला साराभाई ही स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेली दिसते. त्या वेळी जिन्नांचं भाषण ऐकून मनाची उद्विग्न झालेल्या अवस्थेत आपण  आपण केंब्रिजमधून परत भारतात यायला नको होतं अशी खंत व्‍यक्‍त करतात. केंब्रिजमधलं वातावरण, तिथले एकाहून एक असे बुद्घिमान प्रोफेसर्स, शिकागोला जाऊन गोडार्ड या वैज्ञानिकाबरोबर रॉकेटसंबंधीचं संशोधन करण्यासाठीचं स्वप्न याविषयी बोलताना महायुद्घ एक ना एक दिवस संपलं असतं अशी खंत व्‍यक्‍त करतात.  साराभाईंचे वडील अंबालाल साराभाई त्यांना, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत लढाई कधीच संपत नसते, कधी समोरच्या शत्रूबरोबर तर कधी स्वत:ची स्वत:शीच. फक्‍त लढण्याची हिम्मत ठेवावी लागते, नवे मार्ग शोधावे लागतात असं म्हणून धीर देतात.  

६ ऑगस्ट १९४५ या दिवशी जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकल्या गेलेल्या परमाणू बॉम्बमुळे ८० टक्के शहर बेचिराख झालं. दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आणि जे वाचले ते कायमस्वरूपी अपंग झाले. याच वेळी भाभांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि वडिलांना आवडणाऱ्या पावरी या क्रिकेटपटूला भेटून त्याच्या स्वाक्षरीसहित आपल्या वडिलांना भेट द्यायला आणलेलं पुस्तक हातात असलेला होमी, जेव्‍हा रडणारी आई आणि आपल्या वडिलांचं कलेवर बघतो, तेव्‍हा त्याची नजरच सगळं काही बोलते. कित्येक दिवस त्यांनी स्वत:ला आपल्या खोलीत कोंडून घेतलेलं होतं.

विक्रम साराभाईंना काही काळ आपलं रॉकेटचं स्वप्नं बाजूला ठेवावं लागतं, कारण अहमदाबादला परतल्यानंतर गिरणी कामगारांचं दारिद्र्यातलं जगणं, जुनाट मशीन्स सगळं बघून ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून गिरणीकामगारांचं जगणं सुसह्य कसं करता येईल, जास्त उत्पादन कसं मिळू शकेल यासाठी प्रयत्न करतात. अनेक अडचणींशी त्यांना सामना करावा लागतो. याच मालिकेत आणखी एका रॉकेट बॉयचा प्रवेश होतो आणि त्याचं दर्शन पडद्यावर घडणं हाही एक अत्यंत सुखद अनुभव आहे. स्वातंत्र्यानंतर धार्मिक तेढ वाढवणाऱ्यांना,

बरबाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफी है
हर शख्स पे उल्लू बैठे है, अन्जाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा

असं म्हणत समज देणाऱ्या एपीजे अब्दुल कलाम यांचा लहानपणापासूनचा प्रवास, त्यांची विक्रम साराभाईंची भेट खूप विलक्षण अनुभव देणारी आहे. कलाम यांचा जगावेगळा बायोडेटा आणि त्यांनी भेटायला येऊनही विक्रम साराभाईंना आपण तुमच्याबरोबर काम करू शकणार नाही हे सांगणं आणि त्याच वेळी आपलं बाजूला टाकलेलं स्वप्नं बरोबर घेऊन विक्रम साराभाईंनी कलाम यांना आपल्या अवकाश कार्यक्रमात सहभागी करून घेणं हे बघणं खरोखरंच एक आनंददायी  प्रसंग आहे. 

ट्रॉम्बेमध्ये भारतातला नव्‍हे, तर आशियातला पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर लाँच करण्यासाठी भाभा कामाला लागतात. ज्या वेळी पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री उदघाटनाला आलेले असतात, त्या वेळी अचानक उदभवलेली समस्या आणि दीड मिनिटांपेक्षा जास्त वेळ जीवावरची जोखीम पत्करून भाभांनी सोडवलेला प्रश्न आणि त्यानंतरचं उदघाटन करतानाचं पं. जवाहरलाल नेहरूंचं भाषण - त्यात त्यांनी म्हटलं होतं, न्यूक्लिअर रिॲक्टर लाँचचा दिवस ऐतिहासिक असून आपण आज आत्मनिर्भरतेकडे जाणारं पाऊल टाकलंय, त्यांनी त्या रिॲक्टरचं नाव ‘अप्सरा’ असं ठेवलं. त्या प्रसंगी भाभांचे विरोधक देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतात.

१९६२ साली चीनने भारतावर केलेलं आक्रमण, अशा वेळी उदभवलेली परिस्थिती आणि त्यात पत्करावी लागलेली हार यामुळे पं. नेहरूंच्या विरोधात तापलेलं वातावरण, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे नागरिक अशी परिस्थिती असताना भाभांची अस्वस्थता आणि अखेर अणुबॉम्ब बनवण्याची परवानगी त्यांना मिळते तो क्षण. याच वेळी दुसरीकडे विक्रम साराभाई गिरणी कामगारांना समजवण्यात यशस्वी होतात आणि कलाम यांना बरोबर घेऊन काम सुरू करतात. थुम्बा इथल्या स्थानिकांची मदत घेऊन पहिल्या रॉकेटचं उडडाण करण्यात ते यशस्वी होतात.

खरं तर वैज्ञानिकांच्या आयुष्यावर अशी मालिका काढणं हे खूपच आव्‍हानात्मक काम आहे. कारण त्या त्या वेळचं वातावरण, परिस्थिती, ते लोक, विज्ञान आणि शोध, हे सगळं हुबेहूब उभं करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण यात केवळ मुख्य पात्रच येत नाहीत, तर अनेक उपकथानकं, पात्रं आणि त्यांची सत्यता पडताळून बघावी लागते. तपशील मिळवावा लागतो. एखाद्या चित्रपटापेक्षांही जास्त रोमांचकारी, थरार, उत्कंठा निर्माण करणाऱ्या विज्ञानविश्वातलं वास्तव या वेबसीरीजमध्ये दाखवलं आहे. 

रॉकेट बॉईज ही मालिका बघताना स्काय इज द लिमिट चा प्रत्यय येतो. स्वत:वरचा विश्वास आणि प्रयत्न यांनी झपाटून काम केल्यावर काय साध्य होतं हे मालिका बघताना दिसतं. तसंच नेहरूंसारखा दूरद्ष्टी असलेला राज्यकर्ता असेल तर वैज्ञानिक, त्यांचं संशोधन, संशोधन संस्था यांना चालना कशी मिळू शकते हेही कळतं. या मालिकेचं चित्रीकरण ४ महिने चाललं. यात वारंवार येणारे लॉकडाऊनचे अडथळे पार करून ही मालिका तयार झाली. त्यासाठी टीमने अफाट संशोधन तर केलंच, पण ८ शहरांमध्ये एकाच वेळी चित्रीकरण करताना सुमारे २०० तंत्रज्ञ काम करत होते आणि ४०० ज्युनिअर आर्टिस्टचा सहभाग होता. विक्रम साराभाईंच्या कुटुंबीयांनी टीमला खूप सहकार्य केलं आणि शुभेच्छाही दिल्या. निर्मिती, डिझायनिंग, आर्किटेक्चर, मेकअप यासाठी टीमनी किती परिश्रम घेतले याची कल्पना ‘रॉकेट बॉईज’ बघताना येते. जबरदस्त लेखन/दिग्दर्शन अभय पन्नू यांचं आहे. जिम सर्ब, इश्वाक सिंग, रेजिना कॅसेंड्रा, रजीत कपूर यांनी आपापल्या भूमिका जिवंत केल्यात आणि अचिंत्य ठक्कर याचं संगीतात इतकी प्रचंड ताकद आहे की त्या काळात, त्या वातावरणात ते आपल्याला घेऊन जातं. 

आपला देश लहानातली लहान गोष्ट परदेशातून आयात करतोय, तेव्‍हा अणुऊर्जेचा विधायक उपयोग करून वीजनिर्मिती, आणि अनेक गोष्टीतून आपण स्वयंपूर्ण व्‍हावं, कुठल्याही देशाने आपल्याकडे कमकुवत म्हणून पाहू नये याची इच्छा उराशी बाळगणारे आणि आयुष्यभर प्रयत्नशील असणारे भाभा असोत, वा अहिंसक मार्गाने, शांततेने मार्ग काढत आपल्या नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य कसं होईल याचा ध्यास घेतलेले आणि रॉकेटचं स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करणारे विक्रम साराभाई असोत, त्यांचं जगणं, त्यांची स्वप्नं, त्यांचं कार्य, हे अनुभवण्यासाठी विद्यार्थी असो वा पालक, गृहिणी असो वा शिक्षक, उद्योजक असो वा शेतकरी प्रत्येकाने ही मालिका बघितलीच पाहिजे हे मात्र खरं! सोनी लिव वर जरूर बघा ‘रॉकेट बॉईज’.

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.