पेट पुराण

पेट पुराण

सोनी लिववरची ‘पेट पुराण’ ही मालिका - म्हणजे सगळे एपिसोड एका दमात बघून संपवले आणि मग थंडगार ताक पिवून त्यावरच्या लोण्याच्या उमटलेल्या मिशा जिभेनं पुसल्या. बघतानाच मी मनाशी लै भारी, अप्रतिम, कित्ती छान, असं तर म्हणत होतेच, पण मनातल्या मनात शंभराच्या वर उड्याही मारत होते. कारणही तसंच होतं ना राव. पेट पुराण म्हणजे काही खाण्याची गोष्ट नाही ना. तर आमचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर यांच्या व्‍यंकू आणि बकूची कहाणी बघायला हे पेट पुराण बघणं म्हणजे जीवनावश्यक बाब झाली होती!
आताची तरुणाई - मुलांप्रमाणेच मुलीही लग्न, संसार, पोरंबाळ, पालनपोषण यापेक्षाही जास्त महत्व आपापल्या करियरसाठी देताहेत आणि ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. काहीजण परस्पर संमतीने म्हणजेच लिव्‍हइनमध्ये राहताहेत, तर काहीजण नोंदणी पद्धतीने विवाह करताहेत....काहींना तर आयुष्यात इतकं काही एक्सप्लोअर करून बघायचंय की दोघं मिळून आपल्याला मूल नको असा निर्णय घेताहेत......बरोब्बर चाललीये आपली गाडी! इथंपर्यंत ठीक आहे, पण काहींचे पालक लव्‍ह मॅरेज, आंतरजातीय विवाह इतकं मान्य करताहेत, स्वीकारताहेत. पण लग्न झालं रे झालं की थोडेच दिवसांत पालकांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना या नव्‍यानं लग्न झालेल्या जोडप्याकडून ‘गूड न्यूज’ ऐकायची असते. मग ते त्यांना कधी आडून कधी सूचकपणे तर कधी थेटपणे या बातमीसाठी भंडावून सोडतात, त्यांना अगदी सळो की पळो करून सोडतात. तर आदिती आणि अतुल नावाच्या अशाच एका जोडप्याची कहाणी ‘पेट पुराण’ मध्ये बघायला मिळते. तीन वर्षं झाली, तरी अजून पाळणा हलला नाही म्हणून घरातले/दारातले त्यांना विचारणा करताहेत. अशा वेळी सलोख्यानं नांदणारं हे जोडपं काय करतं ते बघणं खूपच मनोरंजक आहे. ते मुलाला जन्म देण्याऐवजी प्राणी पाळायचं ठरवतात आणि मग एका कधी ठाऊक नसलेल्या जगाचं दार त्यांच्यासाठी खुलं होतं.
यातलं खास आकर्षण आहे ते व्‍यंकटेश आणि बकुळा यांचं! व्‍यंकटेश उर्फ व्‍यंकू म्हणजे चक्‍क एक कुत्रा असून बकुळा उर्फ बकू या बाईसाहेब म्हणजे वाघाची मावशी म्हणजेच मांजरीणबाई आहेत. अतुल आणि आदिती यांच्या घरी व्‍यंकू आणि बकूचं आगमन कसं होतं आणि त्यापुढे काय काय घडतं हे अतिशय उत्कंठापूर्ण रीतीने ज्ञानेश झोटिंग या दिग्दर्शकाने ‘पेट पुराण’ या मालिकेत दाखवलंय. 
प्राणिप्रेम म्हणजे केवळ आपली करमणूक, आपला शौक नसून ती एक मोठी जबाबदारी असून ती पार पाडताना कोणत्या कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं ते या मालिकेत खुमासदार पद्धतीने दाखवलं आहे. प्राणी पाळताना आदिती आणि अतुल यांचे अनेक समज-गैरसमज ढासळून पडतात. प्रत्येक टप्प्यात त्यांना एक एक गोष्ट नव्‍याने समजते. प्राण्यांच्या निमित्ताने त्यांचंही एकप्रकारे शिक्षण होतं आणि ते शिक्षण माणसातल्या संपत चाललेल्या माणुसकीला हाक देतं. व्‍यंकू आणि बकू यांना एक घर मिळतं आणि इथून पुढे आदिती आणि अतुल यांच्यात काय काय बदल घडत जातात ते सगळं या मालिकेत बघणं हा अत्यंत रोचक अनुभव आहे. यात आपण जातपात न बघता लग्न केलंय पण प्राणी पाळताना मात्र तो कुठल्या जातीचा आहे हे बघतोय, तसंच मुलगा मुलगी समान असं म्हणत असतानाच प्राणी पाळताना 'ती' नको असं दुट्टपी वागतो आहोत अशा बऱ्याच गोष्टी अतुल आणि आदिती यांच्या लक्षात येतात.
‘पेट पुराण’चा प्रत्येक एपिसोड हा मनाला स्पर्श करून जाणारा आहे. सुरुवातीपासूनच पडदा आपल्याला खिळवून ठेवतो. अगदी समोर दिसणारी छानशी रंगीत चित्रं, श्रेयनामावलीचा फॉन्ट, पार्श्वसंगीत सबकुछ लाजबाब! पुणेरी आणि मराठवाडी विहिणींची जुगलबंदी आणि बदल हेही बघण्यासारखे आहेत. निर्माता रणजीत गुगळे, ज्ञानेश झोटिंग आणि खरं तर सगळ्याच टीमचं मी मनापासून अभिनंदन करीन. याचं कारण किती दिवसांनी इतकी आल्हाददायक, सौम्य, एखादी झुळूक यावी आणि मनाची मरगळ तिने दूर करून टाकावी अशी ही वेबसीरीज तुम्ही बनवलीत. यात ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, सतीश आळेकर,  सुयश झुंझुर्केपासून प्रत्येकाची कामं ‘वा, क्या बात है’ अशी दाद द्यावी अशी झाली आहेत. बरं ही मालिका मराठी शिवाय हिंदी, तमीळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये आहे.
‘पेट पुराण’ या मालिकेत व्‍यंकू आणि बकू यांच्याकडून ज्ञानेशने दिग्दर्शक म्हणून कसं काय काम करून घेतलं असावं खरोखरंच खूप कौतुक वाटलं आणि अभिमानही. ज्ञानेशने मुळातच हा विषय निवडला त्याबद्दल त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याने कथा उलगडली तर आहेच, पण त्याच बरोबर हसवत हसवत अंतर्मुख व्‍हायला देखील भाग पाडलं आहे.
प्राणिप्रेम म्हणण्यापेक्षा आज आपण इतके संकुचित होत चाललो आहोत की आपल्या जगात पडद्यावर किंवा कागदावरच पक्षी-प्राणी आपल्याला बघायचे आहेत. आपल्या मुलांनाही आपण त्यांच्यापासून धाकधपटशा दाखवत दूर करतो आहोत. आपलं आणि त्यांचं नातं तोडून टाकत चाललो आहोत. प्राणी पाळणं हेही एक प्रतिष्ठेचं लक्षण झालं आहे. आमच्याकडे जर्मन शेफर्ड आहे किंवा अमूक एका ब्रिडचा कुत्रा आहे हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो, पर्शियन मांजर पाळणं त्याचाच एक भाग, पण त्याचबरोबर याच प्राण्यांच्या भावभावना समजून घेणं आणि प्रेमाची वागणूक या गोष्टी विसरत जात असताना ‘पेट पुराण’ मनाला तृप्त करून टाकतं. (अर्थात, सगळेच प्राणी पाळणारे केवळ दिखावूपणासाठी प्राणी पाळत नाहीत ही गोष्ट वेगळी. अनेकजण अत्यंत मायेनं, आपल्या घरातलाच एक सदस्य असल्याप्रमाणे प्रेम करतात, काळजी घेतात.) खरोखरंच ही वेबसीरीज जरूर जरूर आणि जरूर बघा असं मी म्हणेन.
Love You Dnyanesh and Team Pet Puran.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.