गुलाबजाम
मध्यंतरी ‘फिश करी’ हा बंगाली चित्रपट बघितला होता आणि खूप आवडलाही होता. त्यानंतरचे दिवस प्रवास आणि काम यात कसे गेले कळलंच नाही. आज अपूर्वने ‘गुलाबजाम’ लावून दिला. मी हळूहळू त्यात गुंतत गेले. कथानकाचा भाग झाले. चेहर्यावर कधी हासू तर कधी डोळ्यांमधून आसवं आली.....
आदित्य लंडनची नोकरी सोडून पुण्यात कोणालाही न सांगता महाराष्ट्रीयन स्वयंपाक शिकायला येतो आणि त्याच्या या प्रवासाची गोष्ट इथं बघायला मिळते. मात्र इथं फक्त त्याची शिकण्याचीच धडपड दिसत नाही, किंवा काही मिळवण्याचीही धडपड दिसत नाही तर हा चित्रपट अनेक बारीकसारीक पण महत्वाच्या अनेक गोष्टींना, मूल्यांना, जगण्यातल्या आनंदाला, प्रयत्नांना, चिकाटीला, धडपडीला स्पर्श करत राहतो. चित्रपटातली नायिका राधा विचित्र आणि विक्षिप्त असणारी....पण तिच्या हाताला अप्रतिम अशी चव असणारी.....तिच्या त्या स्वभावापुढे आदित्यची डाळ शिजते का हे बघत असतानाच ती तशी का आहे हे कोडं हळूहळू उलगडत जातं. तिच्या प्रवासानं प्रेक्षकही हलून जातो. त्यानंतर मात्र तिच्यातला विक्षिप्तपणा, विचित्रपणा आपण सहजपणे स्वीकारतो. आदित्य आणि राधा यांच्यातलं हळूहळू फुलत जाणारं माणुसकीचं, काळजीचं नातंही बघायला मिळतं. खरोखरंच ‘वैष्णव जन तो तेणे कहिये रे....’ प्रमाणे यातलं दुसर्याचं दुःख आपलं कसं होतं हे राधाची गोष्ट ऐकताना आदित्यची जी अवस्था होते ते पाहून कळतं. 'आजचा अनुभव उद्याची आठवण’ होणार आहे असंही हा चित्रपट सांगतो.
राधाची अनेक गोष्टीतली स्मृती गेलीये हे काही दृष्टीनं चांगलंच झालं, असं ती म्हणते. कारण भूतकाळातलं दुःख उगाळण्यापेक्षा कोरा वर्तमान जगणं जास्त चांगलं. मात्र भूतकाळ सोबत नसल्यानं आणि नव्या आयुष्यात आलेल्या कडवट अनुभवांनी राधामध्ये एक भित्रटपणा, एकटेपणा आणि विचित्रपणा येतो. खरं तर या चित्रपटातला प्रत्येक प्रसंग काही ना काही भाष्य करत राहतो. चित्रपट बघताना अनेक रिकाम्या जागा आपलं मन आपसूक भरायला लागतं. आदित्य राधाकडून झोकून देऊन, अनेक कष्ट उपसून सगळे पदार्थ मन लावून शिकतो. याचबरोबर तो तिच्यातली भीती घालवतो. तिला हसवतो, तिला जगायला शिकवतो. तिला एक नवं आयुष्य देतो.
या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर यानं आदित्यची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे आणि सोनालीबद्दल काय बोलावं? ३७ वर्षांची प्रौढतेकडे जाणारी तरुणी साकारताना मनानं मात्र कधी १७ ची तर कधी २७ ची तर कधी अकालीच ४७ ची झालेली तरुणी तिच्यात बघायला मिळते. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातली भूमिका तिनं खूपच समजून केली होती. पण मला मात्र 'गुलाबजाम'मधली तिची भूमिका जास्त भावली. ही भूमिका ती जगली असंच वाटलं आणि 'गुलाबजाम'नं मला तिच्या प्रेमात पाडलं. या चित्रपटात सोनालीचे डोळे बोलतात, तिच्या चेहर्यातून, तिच्या हालचालीतून तिची व्यथा, तिची वेदना बोलते. तिचं घाबरणं, तिचं गांगरणं, तिचा कडवटपणा सगळं काही तिच्यात भिनलेलं आहे आणि ते बाहेर येताना धडपडत येतंय असंच वाटत राहतं. ग्रेट सोनाली! बाकी सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांचं कथानक चांगलंच, दिग्दर्शनही चांगलं. चित्रपट काही वेळा थोडा संथ वाटतो, मात्र बाकी सगळ्या गोष्टी इतक्या सरस आहेत की त्याचा फार बाऊ करावासा वाटत नाही.
सगळ्यांनी या 'गुलाबजाम'ची चव चाखलीच असेल. मीच जरा उशिरा चाखली. पण नसेल चाखली तर जरूर जरूर बघा!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment