न्यूड सिनेमा - ना भिडणारा, ना सुन्न करणारा
न्यूड चित्रपटाबद्दल बरंच काही ऐकलं होतं. त्यामुळे काल आसावरी आणि मी हा चित्रपट बघितला. चित्रपटगृहात मोजून २० प्रेक्षक! हरकत नाही, दर्दी प्रेक्षक कमीच असतात अशी समजूत करून घेऊन चित्रपट बघायला सुरुवात केली. छाया कदम, कल्याणी मुळे, किशोर कदम, नेहा जोशी, ओम भूतकर आणि पाहुणा कलाकार म्हणून नसिरुद्दिन शाह यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट रवी जाधव यानं दिग्दर्शित केलाय. दोन तास आणि २४ मिनिटांची लांबी असलेल्या चित्रपटाची पटकथा मुळातच ढिसाळ आहे. नग्नतेवर भाष्य करण्यासाठी कथेची मांडणी खूप खोलवर असणं आवश्यक होतं. कला आणि नग्नता, नग्नता आणि समाजाचा दृष्टिकोन, याला स्पर्श करून जाणारी मांडणी नक्कीच भिडली असती.
या चित्रपटात कलेविषयी आणि नग्नतेवर काम करणारे रोदँसारखे कलाकार घेऊन नग्नतेमधलं सौदर्यं आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर करावा लागणारा संघर्ष दाखवता आला असता. खरं तर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स हे मुंबईतलं नामांकित कॉलेज दाखवल्याबरोबर खूप मोठ्या अपेक्षा मनात तयार झाल्या होत्या. काहीतरी सकस बघायला मिळणार असं वाटत असतानाच पार भ्रमनिरास झाला. जमेची बाजू इतकीच की यातल्या सर्व कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. मुळात बंडखोर असलेली नायिका सुरुवातीला नवर्याचा मार सहन करणारी, त्याचा बाहेरख्यालीपणा सहन करणारी दाखवलीये. नंतर ती मुलाला बरोबर घेऊन सगळं सोडून मुंबईला आपल्या मावशीकडे जाते आणि तिथे काम शोधत जे. जे. मधलं न्यूड मॉडेल म्हणून काम करायचं ठरवते.
या चित्रपटातली गंमत अशी की सुरुवातीला ती नदीत पोहत नेहा जोशीला एका झोक्यावर बसलेली बघते, मग काहीच वेळात तिथं एक राकट पुरूष येतो आणि दोघांमधला पाण्यातला प्रणय सुरू होतो. काहीच वेळात नायिका घरी आणि तो राकट पुरूष घरात येऊन तिला माझा पाठलाग का केलास म्हणून मारहाण करताना दाखवलाय. मुळातच ती ज्या वेळी दोघांनाही बघते तेव्हा तिच्या चेहर्यावर रागाचे, तिरस्काराचे, चीड येणारे कुठलेच हावभाव आपल्याला बघायला मिळत नाहीत. उलट चोरून ती हे दृश्य बघतेय आणि ती बिचारी सेक्सपासून वंचित आहे असंच प्रेक्षक म्हणून वाटलं. या नायिकेचा मुलगा ऐतखाऊ, चार-चार वर्ष नापास होणारा असा दाखवला आहे. असं असताना त्याच्या शिक्षणासाठी तिचा आटापिटा आणि तिच्या नवर्यानं तिच्या बांगड्या घेतल्या म्हणून चिडणारी ... त्या विकून मुलाची फिस भरण्याचा तिचा अट्टाहास खूपच हास्यास्पद वाटतो. मुंबईत गेल्यावरही तो मुलगा शिकून मोठं होऊ असा विचार करण्यापेक्षा वाईट गोष्टीच करत राहतो. तिलाही गलिच्छ भाषेत वाट्टेल ते ऐकवत राहतो. चित्र काढणार्या या मुलाजवळ जराही संवेदनशील मन नसतं. अशा मुलासाठी ती आत्महत्या करते हे पटतच नाही. तसंच आपल्याला कोणी समजून घेत नाही, लोकांना फक्त शरीर दिसतं वगैरे मुद्दे पटतच नाही. कारण या चित्रपटात कॉलेजमधले विद्यार्थी असतील, वा नायिकेचा मावशीचा नवरा कोणीही तिच्याकडे बाई किंवा उपभोग्य वस्तू म्हणून बघितलेलं दाखवलं नाही.
न्यूड चित्रांवरून जे. जे. वर हल्लाबोल होतो आणि तिथली अनेक न्यूड पेटिंग्ज जाळली जातात. त्या वेळी नायिका आत्मविश्वासानं उभी राहून इतरांना प्रेरणा देते, तीच नंतर मुलामुळे कोलमडून पडते हे सगळं विसंगत वाटतं. एकूणच न्यूड हा चित्रपट म्हणजे आजच्या दांभिक संस्कृती रक्षकांना दिलेली सणसणीत चपराक वगैरे सबझूठ आहे.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment