आपला मानूस!
आपला मानूस!
'आपला मानूस' आपल्या माणसांबरोबर बघितला. 'आपला मानूस' हा अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट 'काटकोन त्रिकोण' या डॉ. विवेक बेळे लिखित नाटकावर आधारित आहे. नाना पाटेकरची भूमिका नाटकात डॉ. मोहन आगाशे यांनी वठवली आहे. नाटक आणि चित्रपट यांची दोहोंची तुलना मला करायची नाही. मी चित्रपटाकडे स्वतंत्र दृष्टीनं बघणार आहे. रहस्य, नातेसंबधातली ओढाताण या दोन गोष्टींभोवती चित्रपट फिरत राहतो.
या चित्रपटात सुमित राघवन, इरावती हर्षे आणि नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमित आणि इरावती यांची कामं अप्रतिम! नानाचं कामही चांगलं आहे. सुमित आणि इरावती दिसलेही छान आहेत. या चित्रपटात नवरा बायको आणि नवर्याचे वृद्ध वडील दाखवले असून मुलगा हॉस्टेलवर राहतो. यात रहस्याचा भेद करण्यासाठ तपास करणारा इन्स्पेक्टर मारोजी नागरगोजे (नाना पाटेकर) दाखवला आहे. आणि कुटुंबातला वृद्ध म्हणूनही सुमित इरावती बरोबर नाना पाटेकरनंच तिच्या सासर्याची भूमिका साकारली आहे. थोडक्यात नानाला दुहेरी भूमिकेत बघायला मिळतं. चित्रपटात घडलेल्या घटनेचा रहस्यभेद करण्यासाठी मारोती नागरगोजेची नेमणूक झाली असून त्याची तपास करण्याची पद्धत खूप विलक्षण आहे. चित्रपटात दोन पिढ्यांमधल्या विचारांचा, मूल्यांचा संघर्ष आहे. आजच्या वृद्धांचा बिकट होत चाललेला प्रश्न आणि मानवी नात्यातल्या मूल्यांचा यात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मला हा चित्रपट मध्यंतरापर्यंत खूप आवडला. चित्रपटाचं कथानक, वेग आणि पात्रांचा अभिनय यामुळे मन एकदम गुंतून गेलं. मात्र क्राईम पेट्रोल बघून बघून रहस्यभेद ओळखण्याची सवय लागल्यानं चित्रपटाचं वळण कसं असणार याचा अंदाज आला होता. मध्यंतरानंतर उपदेशाच्या डोसानं वैतागल्यासारखं झालं. कथानकच एकांगी पद्धतीने लिहिलंय म्हणावं लागेलं. चित्रपटात अनेक बदल करताना हे स्वातंत्र्य पटकथा लिहिणार्याला घेता आलं असतं. रहस्य उलगडताना प्रत्येक वेळी नवी बाजू दाखवण्याचा प्रयत्न कथानक करतं. आपल्यालाही असंच घडलं असावं असं वाटायला लागतं. या चित्रपटात घडलेली घटना, कशी घडली असू शकते आणि प्रत्यक्षात कशी घडली अशा चार बाजूंनी रहस्य उलगडताना बघायला मिळतं.
मात्र या नादात चित्रपट ताणल्या गेलाय आणि निर्माता असला तरी अजय देवगणचं ठिगळासारखं निर्माण केलेलं पात्र बघण्यात काहीही रस वाटत नाही. त्यातच वृद्ध बाप नाना पाटेकर आणि मारुती नागरगोजेमधला नाना पाटेकर यांचं सारखेपण दाखवण्यासाठी एकाच पात्राची निवड करणं हेही फारसं भावलं नाही. शेवटची नाना पाटेकरची डॉयलॉगबाजी बघण्याचा कंटाळाही आला. एकूणच सतीश राजवाडे यांचे जेवढे चित्रपट बघितले तेवढे शेवटाकडे जाताना ढेपाळल्यासारखे वाटतात. चित्रपटाचा शेवट बघताना त्यांनी प्रेक्षकांचं केलेलं स्पून फिडिंग बघून आणखीनच वैताग आला. फारशा अपेक्षा न ठेवता एकदा बघायला हरकत नाही असा आपला मानूस!
ठळक बातम्या ः आसावरीची जिगरी मैत्रीण शुभा ही जळगावहून आल्यामुळे आम्ही तिघींनी हा चित्रपट एकत्रितपणे बघितला. शुभा स्वभावानं प्रेमळ, साधी, बुद्धिमान आणि साड्यांची वेडी असलेली मैत्रीण आहे. काल माझ्यावरच्या प्रेमापोटी तिनं मला अतिशय सुरेख पोपटी रंगांची कोटाकॉटन साडी भेट दिली. आसावरीनं तर पुरणपोळी काय, अप्पे काय, मटकी भेळ काय, शेगावची कचोरी काय, खिलवून खिलवून मार डाला! एकूणच मैत्रीत दिवस कसा रंगला कळलंच नाही!
दीपा देशमुख
२ मार्च २०१८.
Add new comment