शोनार पहार याने के सोन्याचा पर्वत

शोनार पहार याने के सोन्याचा पर्वत

७२ वर्षांची उपमा नावाची एक निवृत्त शिक्षिका कलकत्यातल्या एका जुन्या घरात राहत असते. वृध्दावस्थेमुळे प्रकृतीची कुरबुरी सुरू असतात. तिची देखभाल करण्यासाठी काम करणारी मध्यमवयीन नोमिता नावाची एक स्त्री असते. रटाळ असं आयुष्य सुरू असतं. उपमाकडे बघून, तिच्या चेहऱ्यावरच्या चिंता पाहून हिचं पुढलं आयुष्य देखील कमी होईल असं वाटत असतं. उपमाचा एकुलता एक मुलगा सौम्या आपल्या बायकोबरोबर वेगळा राहत असतो. अर्थात तिच्या देखभालीसाठी जो काही खर्च लागेल तो करत असतो. सुरुवातीला दर आठवड्याला येऊन भेटून जाणारा सौम्या सहा महिन्याचं अंतर पडलं तरी भेटलेला नसतो आणि उपमालाही त्याच्या भेटण्याची गरज वाटेनाशी होते. आई आणि मुलगा यांच्या नात्यात एक कडवटपणा आल्यानं दोघंही एकमेकांपासून दुरावलेले असतात. केवळ औपचारिकता इतकाच संबंध उरलेला असतो. एके दिवशी बाथरूममध्ये उपमा पडते आणि नोमिता सौम्याला फोन लावते. त्या वेळी सौम्याची बायको फिझिओथेरॅपिस्टचे काही नम्बर पाठवते आणि बोलावून उपचार करायला सांगते. सौम्या तिला काय झालं विचारतो, तेव्‍हा ती तुझी आई पडली असून मी नम्बर्स पाठवले असं सांगते. तोही तितक्याच सहजतेनं ठीक आहे म्हणत ऑफीसला निघून जातो. इकडे ज्या कंपनीला फिजिओथेरॅपिस्ट पाठवण्यासंबंधी फोन येतो, तिथे असलेला राजदीप नावाचा एक तरुण स्वत: पत्ता ऐकून चमकतो आणि त्या फिजिओथेरॅपिस्ट तरुणाबरोबर पत्ता माहीत असल्याप्रमाणे जातो. खरं तर तो सौम्याचा लहानपणीचा मित्र असतो आणि त्यांच्याच शेजारी त्याचं लहानपण गेलेलं असतं. तो उपमाला ओळखलं का असं विचारतो. काही आठवणी सांगताच ती त्याला ओळखते. त्याचे वडील आणि आई दोघंही हयात नसतात आणि राजदीप हा आनंदघर नावाची एक एनजीओ (स्वयंसेवी संस्था) चालवत असतो. आनंदघरमध्ये अनाथ, एचआयव्‍ही बाधित मुलं राहत असतात. उपमाला आपल्या एनजीओतल्या एका उपक्रमाची माहिती राजदीप सांगतो. एकट्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी आनंदघरातला एक मुलगा दिवसभर पाठवला तर त्या ज्येष्ठ व्‍यक्तीचाही वेळ जाऊ शकतो आणि त्या मुलालाही घरपण मिळू शकतं असा त्यांचा हेतू असतो. उपमा सुरुवातीला नकार देते, तेव्‍हा राजदीप तिला सौम्याची परवानगी घ्यावी लागेल का असं विचारतो. तेव्‍हा आपले निर्णय आपण घेऊ शकतो या इगोने, ठीक आहे उद्या पाठव त्या मुलाला असं राजदीपला सांगते. बस्स, इथूनच खरा चित्रपट सुरू होतो. सात वर्षांचा बिटलू नावाचा निरागस मुलगा जेव्‍हा उपमाकडे येतो, तेव्‍हा सुरुवातीला त्याला उपऱ्याची वागणूक दिली जाते. त्याच्याशी जेव्‍हा उपमा बोलते, तेव्‍हा तो तितक्याच सहजपणे आधीच्या घरी तो जायचा तेव्‍हा ते लोक कसे त्याला भांडी घासायला लावायचे वगैरे सांगतो. नोमिता त्याला जेवायला स्वयंपाकघराच्या बाहेर खाली जमिनीवर देते. मात्र उपमाचं वागणं बिटलुच्या सहवासात बदलायला लागतं. तिची प्रकृती बऱ्यापैकी सुधारायला लागते. तिच्यातलं काटेरी आवरण हळूहळू गळून पडतं. बिटलू देखील तिला उमा अशी हाक मारायला लागतो. दोघांमधलं अतिशय सुरेख नातं बघायला मिळतं. अनेक छोटे छोट प्रसंग प्रेक्षक म्हणून आपल्या चेहऱ्यावर हासू आणतात. एकदा उपमाला कपाटावरचं काही सामान हवं असतं. मग बिटलू खुर्चीवर चढून ते काढतो. पण छोटा असल्यानं सगळं काही खाली पाडतो. त्यात एक फोटो फ्रेम असते. एक सुंदर तरुण स्त्री आणि एक गोंडस मुलगा त्या फोटोत असतो. बिटलू तिला ही तू आहेस का असं विचारतो. ती हो म्हणते. ती आणि तिच्याजवळ न राहणारा तिचा हा मुलगा आहे हे बिटलू ओळखतो. बिटलू तिच्या कॉटमागच्या भिंतीवर असलेली एका बुवाची फोटोफ्रेम काढून टाकतो आणि उपमाचा तो फोटो लावतो. उपमा रागावते, तेव्‍हा तो तिला हा बुवा किती घाणेरडा आहे आणि हा फोटो किती छान आहे असं अतिशय निष्पाप भावाने सांगतो. बिटलूचं घरात येणं नोमिताला मुळीच आवडत नाही. ती त्याला सुरुवातीला हिडीसफिडीस करते आणि उपमाला देखील तू याला फार लाडावू नकोस असं सांगते, त्या वेळी बिटलू नोमिताला ओरडताना बघून ‘ही या घरातली नोकर आहे की तू नोकर आहेस’ असा प्रश्न उपमाला विचारतो. आपणही त्याच्या थोड्या खोडकर आणि थोड्या निष्पाप चेहऱ्याकडे बघत हसायला लागतो. हळूहळू उमा त्याला रोज गोष्टी सांगायला लागते. बिटलूला गोष्टी खूप आवडत असतात. एकदा त्याला एक हस्तलिखित सापडतं. त्यात एका पानावर चित्र अणि दुसऱ्या पानावर गोष्ट लिहिलेली सापडते. ती गोष्ट असते पापून आणि उपमाची. त्यांना सोन्याच्या पर्वताच्या ठिकाणी असलेला खजिना शोधायचा असतो. इकडे बिटलूच्या सहवासात उपमा खूप आनंदित होते. बिटलूला एचआयव्‍हीची लागण झाल्यामुळे त्याच्या छोट्‍या छोट्या इच्छा पूर्ण कराव्‍यात असं उपमाला वाटतं आणि ती त्याला विचारते, तेव्‍हा तो मॅरिएट हॉटेलमध्ये एकदा शाहरूख खान आला होता आणि आनंदघरची सगळी मुलं त्याला भेटायला गेली होती, पण मी जाऊ शकलो नव्‍हतो. पण आता माझी इच्छा विचारतेच आहेस तर मला त्या हॉटेलमध्ये जायचंय असं तो म्हणतो. ती त्याला तिथे घेऊन जाते. तिथली मजा...कोनातलं आईसस्क्रीम खाण्याची मजा .. उमा बिटलूसोबत त्याच्याच वयाची होते. ते एकमेकांचे मित्रच बनतात. त्यांना कुठेही घेऊन जाणारा टॅक्सी ड्रायव्‍हर रमझान हा त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या प्रेमात पडतो आणि तोही त्यांच्याशी जोडला जातो. बिटलूच्या हट्टामुळे उमाचं रमझानची टॅक्सी चालवणं वगैरे धमाल आहे. यात बिटलू आणि उमा यांचं नातं आणि तिचा मुलगा सौम्या आणि तिचं दुरावलेलं नातं खूप अप्रतिमरीत्या दिग्दर्शकानं उभ केल आहेत. नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला वाढवणारी उपमा, आपल्या मुलासाठी पापून पात्र उभं करून गोष्ट लिहिणारी उपमा आणि त्या गोष्टीत रमणारे पापून आणि उपमा असं सगळं असताना तोच सौम्या मोठा झाल्यावर आईवर ओरडणारा दिसतो, तीही त्याला कडवटपणे उत्तर देणारी बघायला मिळते, अशीच नकोशी द्श्य प्रेक्षकांना दिसत राहतात. सुनेबद्दलचा कटूपणाही उपमा विसरू शकत नाही. यातल्या गोष्टीतला सोन्याचा पर्वत बघायला खरोखरंच बिटलू आणि उमा कोणालाही न सांगता निघतात आणि मग काय घडतं हे बघणं एकीकडे रोमांचकारी आहे कारण या गोष्टीत आपण लहाणात लहान होऊन रमतो, तर दुसरीकडे सौम्या आणि उपमा यांच्या नात्याच काय होतं हे ही बघणं तितकंच उत्कंठावर्धक आहे. शोनार पहार या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की यातली कुठलीही भूमिका काळीपांढरी अशी रंगवलेली नाही. प्रत्येक पात्र तसं का वागतं हे आपल्याला कळतं. त्यामुळे तसं बघितलं तर खलनायक यात कोणीही नाही. बिटलूची भूमिका करणारा श्रीजतो हा चिमुकला मुलगा खरोखरंच अनाथाश्रमातला, एचआयव्‍ही बाधित आहे असंच वाटत राहतं. पण त्याचबरोबर त्याच्यातला खट्याळपणा, तर कधी समंजसपणा आपल्याला खेचून घेतो. काही वेळा परिस्थितीने आणलेलं त्याच्यातल अकाली शहाणपणही जाणवत राहतं. आपणही या निरागस बिटलूवर प्रेम करायला लागतो. तनुजानं 72 वर्षांच्या वृध्‍द उपमाची भूमिका इतकी जिवंत केलीय की काय बोलावं? या चित्रपटामध्ये सत्यजित रे यांचा लाडका अभिनेता सौमित्र चटर्जी हाही खास भूमिकेत आहे. त्याला बघणं देखील खूप सुखद आहे. सौमित्र चटर्जीला बघून मला डेव्‍हिड ॲटनबरोची आठवण झाली. मध्यंतरानंतर डोळ्यांना सुखावणारा निसर्ग आहे. चित्रपटाच्या शेवटी शोनार पहारचं यानेकी सोन्याच्या पर्वताचंही दर्शन आपल्याला घडतं. शोनार पहार या चित्रपटातला दिग्दर्शक परम्ब्रता चटर्जी हा अवघ्या 39 वर्षांचा असून त्यानं अतिशय अप्रतिम असं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन देखील केलंय. इतकंच नाही तर एनजीओ असणारा, बिटलूचंच नव्‍हे तर आनंदघरचं पालकत्व घेतलेल्या राजदीप या तरुणाची भूमिका त्यानं उत्कृष्टपणे साकारली आहे. परम्ब्रता चटर्जी हा ग्रेट यासाठी की हिंदीमध्ये त्याचाच विद्या बालन आणि नवाजुद्दिन सिद्दिकी यांची भूमिका असलेला अत्यंत गाजलेला ‘कहाणी’ चित्रपट येऊन गेला. तसंच ऋत्विक घटक, महाश्वेतादेवी या दिग्गजांचा वारसा त्याला लाभलेला आहे. एका हळुवार नात्याची उत्कट भावबंध असलेली गोष्ट ऐकायची असेल, बघायची असेल तर जरुर जरुर ‘शोनार पहार’ बघायलाच पाहिजे. (हा चित्रपट मी बघावा म्हणून जिने मला आवर्जून एक यादीच पाठवली, ती माझी कॉलेजच्या दिवसांतली मैत्रीण सरिता कुलकर्णी/पाटणकर. सरिता ही अतिशय चांगली अभिनेत्री असून मला ती तेव्‍हापासूनच खूप आवडायची. तेव्‍हा भिडस्त स्वभावामुळे तुला सांगितलं नव्‍हतं, पण आता सांगायलाच हवं. सरिता, मनापासून खूप खूप थँक्यू.) दीपा देशमुख, पुणे adipaa@gmail.com चित्रपट Netflix वर आहे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.