आम्ही दोघी!!!

आम्ही दोघी!!!

आम्ही दोघी

गौरी देशपांडे हे नाव स्वतःचं अस्तित्व आणि स्वातंत्र्य जपू पाहणार्‍या प्रत्येक स्त्रीच्या मनात ठसलेलं आहे. गौरी खरंच प्रत्येकीच्या मनामनात जाऊन बसलेली आहे. तिच्या ‘पाऊस आला मोठा’ या कथेवर आधारित चित्रपट 'आम्ही दोघी' प्रदर्शित झाला आणि मी प्रतिमाला लगेचच बघते असा शब्द दिला. दिग्दर्शक म्हणून प्रतिमा जोशी हिचा हा पहिला चित्रपट! पण त्याआधीची अनेक वर्ष ती नाट्य-चित्रपट क्षेत्राशी जोडलेली आहे, त्यात सक्रिय आहे. अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर तिनं अनेक चित्रपटांचं साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम बघितलं आहे.

या चित्रपटाची पटकथा स्वतः प्रतिमा आणि भाग्यश्री जाधव या दोघींनी मिळून लिहिली आहे. ‘आम्ही दोघी’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, भूषण प्रधान, किरण करमरकर, आरती वडकबालकर (कसलं भयंकर अवघड आडनाव आहे) प्रसाद बर्वे यांनी भूमिका साकार केल्या आहेत. गीतरचना गुरू ठाकूर तर संगीत मंगेश ढाकणे यांचं आहे. मुक्ता तर ग्रेटच आहे. मुक्ता कोणाला आवडत नाही असा प्रेक्षक शोधून सापडणार नाही. मुक्ता तुझ्यातल्या भूमिकेचा प्रत्येक पदर या चित्रपटात तू ज्या तर्‍हेनं व्यक्त केला आहेस, आपण तर लाख वेळा तुझ्यावर कुर्बान! प्रिया बापट हिच्या सुंदर असण्यामुळे तिच्या व्यक्त होण्यावर काही मर्यादा पडतात. मात्र तिचा 'हॅपी जर्नी' हा चित्रपट खूप आवडला होता. त्यानंतर आज बघितलेल्या 'आम्ही दोघी' मध्ये तर तिला हॅट्स ऑफ! आपल्या मर्यादांना ओलांडून प्रियानं यात काम केलंय. भूषण प्रधान या तरुणाची भूमिका लहान असली तरी त्यानं आयटी क्षेत्रात काम करणारा युवा अतिशय समंजसपणे उभा केला आहे. आरती तर मला ‘चला हवा येऊ द्या’ पासूनच आवडते. ती फारच गोड मुलगी आहे. अभिनयाचीही उत्तम जाण आहे. थोडं वजन कमी केल्यास.....! याचबरोबर संदीप असेल, जॉन असेल सगळ्यांनीच काम उत्तम केलंय. या चित्रपटातल्या सगळ्याच पात्रांनी कसदार पण सहजसुंदर अभिनय केला आहे.

किरण करमरकर यांना चित्रपटातून बघून अनेक दिवस झाले. त्यांचा वकील खूपच भावला. त्यांचं कोल्हापुरी असणं, त्यांचं व्यस्त असणं, आपल्या आतला हळुवारपणा केवळ डोळ्यातून व्यक्त करणं, त्यांचं अस्वस्थ असणं हे सगळं सगळं किरण करमकरकरांनी लीलया पेललं आहे. आम्ही दोघी या चित्रपटाचं कथानक सांगत नाही, पण हा चित्रपट प्रत्येकानं जरूर जरूर बघावा! या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्याबाबत अभिनयाची तुलना करायची झाल्यास ते केवळ अशक्य आहे. या दोघी अक्षरशः आपापली भूमिका जगल्या आहेत.

या चित्रपटात एका बुद्धिमान पण हट्टी मुलीची गोष्ट आहे. तिच्याचसारख्या तिच्या वडिलांचीही गोष्ट आहे. तिच्या सावत्र आईची गोष्ट आहे, तिच्या प्रियकराची गोष्ट आहे, तिच्या मैत्रिणीची आणि तिच्या नवर्‍याचीही गोष्ट आहे. चित्रपट आपली गोष्ट दाखवत पुढे पुढे जातो. यात कुठेही उपदेशाचे डोस नाहीत, मात्र सहजगत्या एखादंदुसरं वाक्य आपल्या आत भिडून जातं. विशेषतः लग्नसंस्थेसंबंधी केलेलं भाष्य, प्रेम आणि लग्न याबद्दलचं भाष्य, स्वतःला सिद्ध करत असतानाच आपल्या स्वातंत्र्याबरोबर भावनांना बंदिस्त करण्याबद्दलचं भाष्य, नात्यातल्या प्रेमाला दडपून मुखवटा चढवल्यावरचं भाष्य, आतली घुसमट व्यक्त न होऊ देण्याची कसरत आणि मग तिच्यावर केलेलं फसवं भाष्य हे सगळं अतिशय तरलपणे आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतं.

दोन वेगवेगळ्या वातावरणातल्या स्त्रिया - अचानक इच्छा असो की नसो त्यांचा प्रवास एकत्रित सुरू होतो आणि तो एका हळुवार नात्याचे बंध त्यांच्यात निर्माण करतो याची देखील ही गोष्ट! प्रतिमाचं अभिनंदन यासाठी की सध्या यशस्वी, गल्लाभरू चित्रपटच चालतात असा समज सर्वत्र असताना एक कसदार कथा निवडून त्यावर प्रचंड मेहनत घेऊन काय चालतं यापेक्षा मी जास्तीत जास्त सकस कसं प्रेक्षकांना देईन याचा विचार करून प्रतिमानं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट करताना काय, किंवा कुठल्याही नृत्याची, चित्राची, कवितेची, नाट्याची, साहित्याची, निर्मिती करताना तो प्रवास झपाटलेला असला तरी खूप कष्टाचा, अडथळ्यांचा, अडचणींचा देखील असतो. हा प्रवास पूर्ण करून निर्मितीचं हे फळ प्रेक्षकांच्या हाती देताना त्यामागचा प्रवास प्रतिमा आणि सगळ्याच टीमला आज जाणवत असणार.

प्रतिमा आम्ही दोघीचं हे आव्हान तू समर्थपणे पेललं आहेस. तुझं आणि तुझ्या टीमचं खूप खूप अभिनंदन! ‘आम्ही दोघी’ बघायला गेले होते एकटी, पण येताना दोघींनाच नव्हे तर अनेकांना सोबत घेऊन आले! 'आम्ही दोघी' जरूर जरूर आणि जरूर बघा!

दीपा देशमुख

२७ फेब्रुवारी २०१८.

(चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद होता!)

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.