डोर

डोर

रिश्ते भरोसे चाहत यकीन
उन सब का दामन अब चाक है
समझे थे हातों मे है जमीन
मूठ्ठी जो खोली बस खाक है
दिल मे ये शोर है क्यूँ
इमान कमजोर है क्यूँ
नाजूक ये डोर है क्यूँ 
केसरियॉं बालम
हे गाणं कुठेही लागलं की त्यातले स्वर माझ्या काळजाला भेदून जात होते. गाणं कशातलं आहे ठाऊक नव्हतं. संगीतबद्ध कोणी केलंय आणि गायलंय कोणी हेही माहीत नव्हतं. माझ्या आवडत्या गाण्यांच्या यादीमध्ये हे गाणं कधीचंच जाऊन बसलं होतं. मग कळलं की ये गाणं 'डोर' या बारा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं आहे. 
काल मध्यरात्री दोन ते चार या वेळात 'डोर' बघितला. अतिशय सुरेख चित्रपट!
झीनत आणि मीरा या दोन तरुणींची आयुष्यं समांतरपणे या चित्रपटात सरकताना दाखवली आहेत. झीनत ही हिमाचल प्रदेशातली एक खंबीर, कणखर, आशावादी, स्वावलंबी तरुणी! तिचं आमीर या तरुणावर प्रेम आहे. त्याचे आई-वडील मात्र दोघांच्या प्रेमाला अनुकूल नाहीत. आमीर सौदी अरेबियामध्ये जायचं ठरवतो, पैसे कमावून तो लवकरच परत येणार असतो. त्यामुळे तो झीनतजवळ सौदीला जाण्यापूर्वी लग्नाचा आग्रह धरतो. दोघंही लग्न करतात. लग्न झालं की तो आपल्या आई-वडिलांना झीनतला स्वीकारा असं सांगतो. पण तेही जिद्दी असतात. न बोलता त्यांच्या चेहर्‍यावर विरोध कायम असतो. आमीर झीनतचा निरोप घेऊन सौदीला जाण्यासाठी निघतो. 
दुसरीकडे राजस्थानमधल्या जोधपूर शहरापासून ५०-६० किमी अंतरावरचं छोटंसं गाव - तिथे मीरा ही आपला नवरा शंकर, सासू-सासरे आणि आजेसासू, दीर यांच्याबरोबर राहत असते. सासूसासरे, दीर आणि आजेसासू नसताना दोघंच नवरा-बायको सगळी बंधन, रीतरिवाज झुकारून मस्त जगत असतात. पण ती मंडळी घरी परतली की पुन्हा डोक्यावर घुँघट घेउन मीराचं रुपांतर आज्ञाधारक सूनेमध्ये होतं असतं. शंकर आणि मीरा यांच्यातलं प्रेम खूप उत्कट असतं. मीरा ही शंकरवर अवलंबून असणारी, त्याच्या सुखात आपलं सुख मानणारी स्वप्नाळू तरुणी असते. आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी - हवेली विकायची वेळ येऊ नये यासाठी शंकर सौदी अरेबियामध्ये जायचं ठरवतो. लवकरच येईन हे वचन मीराला देत तो सगळ्यांचा निरोप घेतो. 
आमीर हिमाचल प्रदेशात झीनतला दरमहा काही पैसे पाठवत असतो आणि ते पैसे जसेच्या तसे ती त्याच्या आई-वडिलांना नेऊन देत असते. कामांसाठी स्वतंत्र माणूस ठेवून स्वतःची काळजी घ्यावी असं ती त्यांना सुचवत असते. आपण विनाकारण या मुलीला स्वीकारण्यासाठी वेळ लावला आणि विरोध केला हे आमीरच्या आई-वडिलांना कळून चुकलेलं असतं. 
इकडे शंकरही दरमहा पैसे घरी पाठवत असतो. त्या पैशांमुळे त्याच्या आई-वडिलांचं कर्ज आणि सांपत्तिक स्थिती झपाट्यानं बदलत असते. मीरा ओळखीच्या एकाकडून शंकरशी फोनवरून संपर्कही ठेवून असते. 
मात्र एकाएकी शंकरचे पैसे येणं बंद होतं. त्याचं कारण म्हणजे शंकरचा खून किंवा अपघातानं मृत्यू झाल्याची बातमी कळते आणि मीरा आणि शंकरचे आई-वडील सुन्न होऊन जातात. रीतरिवाजाप्रमाणे मीराच्या बांगड्या फोडल्या जातात, कुंकू पुसलं जातं, तिचे रंगीत कपडे हलवले जातात आणि एका विधवेचं रंगहीन भकास जगणं तिच्या वाट्याला येतं. प्रत्येकजण आता तिलाच जबाबदार धरत असतो. तिच्या डोळयातले अश्रू टिपणारं कोणीही त्या हवेलीत नसतं. 
इकडे हिमाचल प्रदेशातही साधारणपणे धक्का बसणारी बातमी येऊन धडकते. 
आमीर आणि शंकर चांगले मित्र असतात आणि ते सौदीमध्ये एकत्र एका ठिकाणी राहत असतात. त्यांच्या राहत्या घरातल्या बाल्कनीतून तोल जाऊन शंकरचा मृत्यू होतो. तो मृत्यू अपघातानं झाला की आमीरनं त्याला धक्का देऊन जाणीवपूर्वक पाडलं हे कळलेलं नसतं. मात्र शंकरबरोबर आमीर असल्यानं त्याला अटक होते. त्याला फाशीची शिक्षा ठोठावली जाते. जर मृत व्यक्तीच्या पत्नीनं माफीनामा लिहून दिला तर मात्र आरोपीची त्या आरोपातून सुटका होऊ शकते असा सौदी अरेबियामधला कायदा सांगत असतो. बधिर झालेल्या अवस्थेतही झीनला इतकंच कळतं की आपला नवरा निरपराधी आहे, तिकडे तो एकटा आहे आणि आपल्याला काहीही करून शंकरच्या बायकोला शोधून तिच्याकडून माफीनामा आणावा लागेल. गंमत म्हणजे झीनतजवळ फक्त शंकर आणि आमीर यांच्या मैत्रीचं नातं दर्शवणारा एक फोटो असतो. तेवढ्या एका फोटोवरून तिला अख्खा राजस्थान पिंजून काढून शंकरला आणि पर्यायानं त्याच्या बायकोला शोधायचं असतं. 
हे आव्हान झीनत स्वीकारते आणि एकटीच राजस्थानकडे एका ट्रकमधून प्रवास करत पोहोचते. 
या प्रवासात तिच्यावर अनेक संकटं येतात, तिचं सामानही चोरीला जातं, पण ती डगमगत नाही. तिचा निर्धार पक्का असतो. आपण थक्क होतो अशा काही वेगानं ती शंकरच्या कुटुंबाचं घर शोधून काढते. ती आत्मविश्‍वासानं हवेलीत पोहोचते आणि शंकरच्या आई-वडिलांना आपण कोण आहोत, का आलोत आणि आपल्याला शंकरच्या बायकोला भेटायचंय असं सांगते. आपल्या मुलाच्या हत्यार्‍याची बायको आलेली बघून ते चवताळून उठतात आणि शंकरची आई तर चक्क झीनतवर थुंकते, शंकरचा भाऊ तिला शिवी घालत तिथे तिने येण्याची हिम्मतच कशी केली म्हणत घराबाहेर काढतात. 
अपमान होऊनही झीनत मात्र आपला धीर सोडत नाही. ती तिथेच जवळपास एक झोपडी भाड्यानं घेते आणि शंकरची बायको घराबाहेर कधी पडते याचा शोध घेते. मीरा मंदिरात जाण्यासाठी हवेलीच्या दारातून दिवसा एकदा बाहेर पडत असते. त्या देवळात झीनत मीराची वाट बघत राहते. 
मीरा आणि झीनत यांची ओळख होते. मात्र शंकरच्या आई-वडिलांना सत्य कळताच त्यांनी आपल्याला हाकलून दिलं, तसंच मीरानं करू नये यासाठी झीनत आधी मीराचा विश्‍वास संपादन करायचा ठरवते. हळूहळू दोघींची मैत्री त्या तुटपुंज्या वेळात फुलायला लागते. झीनतमधली स्वाभीमानी खंबीर मुलगी मीराला आवडते. मीराला झीनतमधलं स्वावलंबन, स्वतःचं स्वत्व जपणारी स्त्री भावते. त्याचबरोबर झीनतमध्ये लवकर जगाशी सामना करावा लागल्यानं कोरडी झालेली स्त्री मीराच्या मैत्रीनं हळुवार बनते. दोघी खूप आनंदाचे क्षण टिपतात. सुरुवातीला गाणं लागताच मीराची पावलं थिरकायला लागतात. आपण नाचतोय हे पाप आहे असं वाटून ती खजिल होते. पण झीनत तिला तिच्या आनंदाचं अवकाश खुलं करून दाखवते. 
यानंतर झीनतचा हेतू मीराला कळतो का? झीनत आणि मीरा यांचं भेटणं तिच्या सासरच्या लोकांपर्यंत पोहोचतं का? मीराला कुठल्या संकटांशी सामना करावा लागतो? झीनतचा हेतू साध्य होतो का? मीराला तिच्या आस्तित्वाची, स्वातंत्र्याची जाणीव होते का? हे सगळं डोरमध्ये खूप सशक्तपणे दाखवलं आहे. दोघींमधली मैत्री अबाधित राहते की तुटते ?
खरं तर या चित्रपटाचं संपूर्ण कथानक सांगू शकले असते, पण ते प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणं हा नितांत सुंदर अनुभव आहे. तो अनुभव प्रत्येकानं वेगवेगळा घ्यावा. 
यात गुल पनाग आणि आयेशा ताकिया या दोघींनी अप्रतिम कामं केली आहेत. त्यांना साथ द्यायला श्रेयस तळपदे, गिरीश कर्नांड, प्रतीक्षा लोणकर, उज्ज्वला बावकर आदी मंडळी आहेत. सगळ्यांचीच कामं सरस झाली आहेत. 
हा चित्रपट जरूर जरूर बघावा. आत्म्याला स्पर्शून जाणारा असा हा चित्रपट आहे! नागेश कुकूनुर यानं इक्बाल नंतर दिग्दर्शित केलेला आणि चित्रपट अतिशय अप्रतिम असा बनवला आहे. लिहिला आहे. अनेक प्रसंग आपल्याला हलवून सोडवतात, विचार करायला भाग पाडतात, अंतर्मुख करतात.  बदल कसे घडतात? चिकाटी आणि आशावाद तुम्हाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात? माणुसकी, प्रेम, विश्‍वास, स्वत्व अशा अनेक कंगोर्‍यांना स्पर्श करत हा चित्रपट पुढे सरकत राहतो. स्त्रीवादावर कुठलंही भाष्य न करताही हळुवारपणे स्त्रीवादाबद्दल हा चित्रपट बोलतो. 
'डोर' बघा आणि प्रतिक्रिया कळवा. 
आणि हो, तुम्हालाही हे गाणं नक्कीच आवडेल आणि तुम्ही अनेक वेळा ते ऐकाल!
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके
मन्जिल मुश्कील तो क्या, धुंधला साहील तो क्या
तनहा ये दिल तो क्या हो
राह पे कॉंटे बिखरे अगर
उस पे तो फिर भी चलना ही है
शाम छुपाले सूरज मगर
रात को एक दिन ढलना ही है
रूत ये टल जायेगी
सुबह फिर आयेगी हो
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके
होगी हमे जो रहमत अदा
धूप कटेगी साये तले
अपनी खुदा से है ये दुआ
मन्जिल लगा ले हम को गले
जूर्रत सौ बार रहे, उंचा इकरार रहे
जिंदा हर प्यार रहे हो
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके
दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.