जोजी
नुकताच म्हणजे ताजा ताजा ७ एप्रिल २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीश पोथन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट ‘जोजी’ बघितला. कारण तुम्हाला ठाऊकच आहे, माझा आणि तुमचा आवडता फहाद फासिल ची भूमिका यात आहे. पॅनडॅमिकच्या काळात चित्रीत केलेला हा चित्रपट आहे हे विशेष. चित्रपटात अर्थातच केरळचा नयनरम्य निसर्ग आहे. रबराच्या बागा असलेलं एक सधन कुटुंब, तगडा, धिपाड्ड पण वृद्घ झालेला कुट्टीपन पिके नावाचा पिता आणि त्याची जयसन, जोमन आणि जोजी नावाची तीन मुलं... जयसनचा घटस्फोट झालेला आणि त्याचा कुमारवयीन मुलगा पपी त्याच्याबरोबरच त्याच मोठ्या बंगल्यात राहत असतो. जयसनला दारूचं व्यसन असतं. दुसरा जोमन हा आपल्या बिन्सी नावाच्या बायकोबरोबर त्याच घरात राहत असतो, तर तिसरा फहाद म्हणजेच जोजी हा इंजिनियरिंगचं शिक्षण अर्धवट झालेला तरुण असतो. जोजी ड्रॉपआउट असला, तरी एनआरआय बनून थाटात राहायचं त्याचं स्वप्न असतं. सिगारेटच्या धुराच्या वलयात तो ती स्वप्नं रंगवत असतो. कुट्टीपन त्याला अपयशी म्हणून सतत टोमणे मारत असतो.
चित्रपटाच्या सुरुवातीला कुट्टीपनला फसवून पपीनं ऑनलाईन एक एअरगन मागवलेली असते. त्याचा काका फहाद त्याची चोरी पकडतो आणि ती गन आपल्याकडे ठेवून घेतो. त्याच वेळी कुट्टीपन व्यायाम करताना दिसतो. तीन तगड्या तरुण कामगारांना जे काम जमत नाही ते तो एकटा करतो. घरात त्याचाच एकछत्री अंमल असतो. घरातले तिन्ही मुलं त्याला घाबरून राहत असतात.
एक अपघात घडतो आणि कुट्टीपनला ॲटॅक येतो. त्यातून तो वाचणार नाही असं डॉक्टर सांगतात. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर चक्क फादरला बोलावून कुट्टीपनसाठी त्याच्याच समोर शेवटची प्रार्थना म्हटली जाते, पण त्याचा जोरात चालणारा श्वास बघून त्याचा व्यसनी मुलगा जयसन ती प्रार्थना थांबवतो आणि धावपळ करून कुट्टीपनला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. त्याचं ऑपरेशन करण्यात येतं आणि तो काही प्रमाणात पॅरलाईज् झाला तरी बरा होतो आणि त्याला घरी आणलं जातं. त्यानंतर त्याचा अचानक मृत्यू होतो. मृत्यूनंतर गावात खूप अफवा आणि वेगवेगळ्या बातम्या पसरतात.
खरं तर कुट्टीपनच्या मुलांना, नातवाला आणि घरात एकमेव स्त्री असलेल्या बिन्सीला कुट्टीपन मरावाच असं वाटत असतं. तो मेल्यानंतर त्याची हुकूमत संपेल आणि आपल्याला मनासारख्या गोष्टी करता येतील असं सगळ्यांना वाटत असतं. यात सगळ्यांच्याच भूमिका अप्रतिम झालेल्या असल्या तरी फहाद फासिल म्हणजे ग्रेट गेट आणि ग्रेट ॲक्टर आहे! महेशिंते प्रथिकारम असो की कुम्बलिंगी नाईट्स असो, की इरूल असो, प्रत्येक चित्रपटात तो वेगळा वाटतो, प्रत्येक भूमिकेशी तो समरस झालेला असतो आणि म्हणूनच प्रत्येक चित्रपट बघताना हा फहाद फासिल नसून दुसराच अभिनेता आहे असं वाटायला लागतं. फहाद फासिलची मनोवस्था, त्याची देहबोली, क्षणाक्षणाला त्याच्या मनात चाललेली उलघाल आपल्याला जाणवते, दिसते आणि आता तो काय करेल याची उत्कंठाही वाढीला लागते.
खरं तर फक्त चारच दिवस ‘जोजी’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन झाले असले, तरी समस्त प्रथितयश वृत्तपत्रांनी आणि इतर प्रसारमाध्यमांनी ‘जोजी’ ची भरभरून प्रशंसा केली आहे, काहींनी तर याला पाच पैकी पाच रेटिंग दिलं आहे.
‘जोजी’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘मॅक्बेथ’ या शोकांतिकेवर बेतलेला आहे. डंकन राजाचा सेनापती मॅक्बेथ हा आपल्या राजा बनण्याच्या लालसेपोटी आणि महत्वाकांक्षेपोटी डंकनचा खून करतो आणि त्यानंतर खुनाचं गुपित दडवण्यासाठी एकामागून एक खून करत राहतो. मॅक्बेथचाही यात अंत होतो. ‘मॅक्बेथ’ या नाटकात शेक्सपिअरनं माणसामध्ये राक्षसी महत्वाकांक्षेनं प्रवेश केला तर तो कसा बदलतो याचं वर्णन केलं आहे. तसंच ‘जोजी’ चित्रपटातला नायक (की खलनायक?) जोजी म्हणजे फासिल फहाद गुन्हा केल्यामुळे सतत अस्वस्थ, बिथरलेला, अपराधी भाव घेऊन वावरताना दिसत राहतो. या चित्रपटात त्यानं अभिनयाची उंची गाठलेली दिसते.
शेक्सपिअर, मॅक्बेथ वगैरे सगळं काही विसरून मनाची कोटी पाटी करून ‘जोजी’ चित्रपट फहाद फासिलच्या अभिनयासाठी जरूर बघायला हवा हे मात्र नक्की!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment