कागज के फूल 

कागज के फूल 

एका फिल्म स्टुडिओचं प्रवेशद्वार ढकलत एक वृद्ध आत शिरतो. तो सारा परिसर त्याच्या ओळखीचा असावा जणू. अंगात आणलेलं उसनं बळ घेऊन तो पायर्‍या चढत वर जातो आणि तिथले अनेक स्पॉट लाईट्स त्याला त्याच्या भूतकाळात घेऊन जातात. तारुण्यातला तो - सुरेश सिन्हा! एक यशस्वी दिग्दर्शक! येणारा प्रत्येक चित्रपट त्याला प्रसिद्धी आणि संपत्ती यांच्या बरोबर वर वर नेणारा... शेकडो/हजारो चाहते त्याच्या एक नजरेसाठी व्याकुळ झालेले....तो दिसताच झुंबड उडणारी गर्दी...स्वाक्षरीसाठी त्याला वेढून टाकणार्‍या सुंदर तरुणी.....हे दृश्य तर त्याच्यासाठी सवयीचंच झालेलं....अंगात किमती सूट आणि हातात सदोदित पाईप असलेला सुरेश एवढा मोठा दिग्दर्शक असला तरी त्याच्यातलं संवेदनशील मन सतत जागं असतं. म्हणूनच चित्रिकरणाच्या वेळी बाळाला दूध पाजणारी एखादी एक्स्ट्रा आणि तिच्यावर डाफरणारे कर्मचारी पाहून त्याचा जीव हलतो, तो तिला आधी बाळाला शांत कर, झोपव आणि नंतर सेटवर ये असं सांगतो. त्याचा वक्तशीरपणा सेटवरच्या प्र्रत्येकाच्याच ओळखीचा झालेला असतो. कामाबाबत कुठलीही तडजोड त्याला मान्य नसते. म्हणूनच तर चित्रपटाच्या बाबतीत मुख्य अभिनेत्री असो, वा निर्माते - त्यांच्या वाट्टेल त्या सूचनांची दखलही तो घेत नसतो. वेळच आली तर ती अभिनेत्री कितीही टॉपची असो, तिला त्या चित्रपटातून कमी करायलाही तो मागेपुढे पाहत नसतो.

त्याचे निर्माते त्याच्यावर खुश असतात. तो म्हणेल ती त्यांच्यासाठी पूर्व दिशा असते. कारण त्याच्या प्रत्येक चित्रपटानं त्यांना मालामालच केलेलं असतं. अशा सुरेशचं वैयक्तिक आयुष्य मात्र दुःखद असतं. त्याचं लग्न एका सो कॉल्ड प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातल्या मुलीशी झालेलं असतं. त्यांना एक गोड मुलगीही असते. त्या काळातच काय, जवळजवळ आत्ताआत्तापर्यंत सिनेमासृष्टीत असणारी लोकं म्हणजे हीन, वाया गेलेली, हे क्षेत्र बदनाम झालेलं! अशा क्षेत्रात आपला नवरा असल्यानं सुरेशची बायको कायमची माहेरी निघून गेलेली असते. तिच्या या कृतीला तिच्या आई-वडिलांचा पूर्ण सपोर्ट असतो. त्या घरात केवळ तिचा भाऊच (जॉनी वॉकर) सुरेशला काय तो समजून घेत असतो. त्यालाही रेसकोर्सवर जाण्याचा आणि घोड्यांवर पैसे लावण्याचा प्रचंड नाद असतो. सुरेशच्या मुलीला डेहराडूनला बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांनी ठेवलेलं असतं. त्याचं आपल्या मुलीवर अतोनात प्रेम असतं. तो तिला भेटायला डेहराडूनला गेला की त्याची मुलगीही त्याला कडकडून भेटत असते. मात्र शाळेकडून त्याला तो मुलीचा कायदेशीर गार्डियन नसल्यानं भेटायला मनाई केली जाते. तो दुःखी होऊन आपल्या सासरी जातो, तिथे त्याला वागणूक पाळलेल्या कुत्र्यापेक्षाही दुर्लक्षित अशी दिली जात असते. त्याची बायको तर त्याचं तोंड बघायलाही तयार नसते. आपल्याला मुलीला भेटू द्यायला हवं असं तो सासू-सासर्‍यांना सांगतो. पण ते त्याला कोर्टात जा अशी भाषा ऐकवतात. खिन्न मनानं तो परततो.

रात्रीची वेळ आणि मुसळधार पाऊस अशा वातावरणात त्याची भेट शांती नावाच्या एका अनाथ मुलीशी होते. तिला भिजताना पाहून तो आपला कोट तिला देतो आणि ही गोष्ट विसरूनही जातो. ती मुलगी मात्र त्याला शोधत त्याच्या कोटात त्याचं कार्ड सापडल्यानं त्याच्या स्टुडिओत येते. त्याच्या मागोमाग येताना कॅमेर्‍यात ती शूट होते. दिवसभराचं शूट झाल्यावर सायंकाळी ते तुकडे परत पाहताना सुरेशला चुकून कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये आलेली ती मुलगी दिसते आणि तो स्तिमित होतो. त्याच्या देवदास चित्रपटातल्या पारोसाठी त्याला हवी तशी मुलगी ती असते. तो अस्वस्थ होतो आणि तिचा शोध घ्यायला सगळ्यांना सांगतो. शांतीलाही नोकरीची गरज असते. मात्र अभिनय कशाशी खातात हेही तिला माहीत नसतं. पण सुरेशच्या हळुवार वागण्यानं आणि मार्गदर्शनानं ती उमलते आणि त्याला हव्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. तिच्यातलं साधं, सात्विक सौंदर्य त्याला भुरळ घालतं. तो त्याच्याही नकळत तिच्याकडे ओढला जातो. खरं तर तीही त्याच्याकडे खेचली जाते. त्याचा अपघात होतो, तेव्हा त्याची बायको बातमी कळून देखील त्याला आवश्यकता असल्यास त्यानं तिच्याकडे यावं आणि तिथे त्याची देखभाल करण्यात येईल असं कळवते पण त्याला बघायला येण्याची तसदी घेत नाही. अशा वेळी शांती त्याची काळजी घेते.

दोघांतलं हळुवारपणे उमलत जाणारं प्रेम अनुभवणं हा या चित्रपटातला नितांत सुंदर अनुभव आहे. तो तिला आपलं लग्न झाल्याचं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तिला ते केव्हाच माहीत झालेलं असतं. त्यांच्यात संवाद इतके कमी होतात, पण तरीही दोघांनी एकमेकांना पुरतं जाणलेलं असतं. आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम करतोय हे ठाऊक झाल्यानंतरही त्यांच्यातला सयंतपणा कुठेही सुटत नाही. मात्र चित्रपटसृष्टीत अशा गोष्टी लपून राहत नाही. त्या दोघांबद्दलच्या तिखटमीठ लावून तयार केलेल्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायला लागतात आणि लोकही चवीनं त्या वाचायला लागतात. डेहराडूनला शिकत असलेल्या मुलीच्या मैत्रिणी तिला या गोष्टीवरून चिडवतात. आई-वडिलांच्या वेगळं राहण्याचा परिणाम भोगणार्‍या त्या मुलीची मनःस्थिती खूपच बिघडते आणि एके दिवशी ती शाळेतून चक्क पळून येते आणि शांतीचं घर गाठते. शांतीच्या घरात लावलेला सुरेशचा- आपल्या वडिलांचा फोटो बघून तिला आणखीनच राग येतो. आपल्या आई-वडिलांना एकत्र आणायचं तर शांतीचा अडसर कसा दूर करावा हे तिला कळेनासं होतं. शांती तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण शांतीनं आपल्या वडिलांच्या आयुष्यातून निघून जावं असा हट्ट मुलगी करते. देवदासचा प्रिमियर शो होतो, हाही चित्रपट प्रचंड गाजतो. मात्र सुरेशच्या मुलीला दिलेल्या शब्दाखातर शांती सुरेशच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेते आणि चित्रपटसृष्टीला रामराम करते. निर्माते तिच्यावर केस करण्याची धमकी देतात, पण ती कोणाचंच ऐकत नाही. सुरेशला जेव्हा ती निघून जात असल्याचं कळतं, तेव्हा नेमकं काय घडलं असेल याची कल्पना त्याला कोणी न सांगताही येते. तो आपल्या मुलीला तिनं जे केलं ते चांगलं केलं नाही हे सांगतो आणि शांतीला भेटायला जातो. हा प्रसंग इतका हृद्य आहे की दोन जिवांची होणारी ताटातूट प्रेक्षक म्हणून आपणही बघू शकत नाही. शांती तिनं त्याच्यासाठी विणलेला स्वेटर त्याला देऊन निघून जाते. आतून पुरता तुटलेला सुरेश घरी परततो. मात्र कोर्टात केस दाखल होऊन मुलीचा ताबाही ती अज्ञानी असल्यानं तिच्या आईकडे दिला जातो. मुलीच्या प्रेमालाही तो पारखा होतो आणि शांतीच्या प्रेमालाही मुकतो.

त्या अवस्थेत तो दारुला जवळ करतो. वक्तशीर असणारा सुरेश स्वतःच्या जगण्याचं गणित बिघडवून बसतो. तो वेळा पाळेनासा होतो. इतकंच काय पण शूटिंगच्या वेळी त्याला समोर येणार्‍या एक्स्ट्रा अभिनेत्रीमध्येही शांतीच दिसायला लागते. आणि याचा परिणाम व्हायचा तोच होतो. त्याचा येणारा चित्रपट कोसळतो. त्याला डोक्यावर घेणारे प्रेक्षक त्याचं यश, त्याचे परिश्रम विसरून त्याच्याकडे पाठ फिरवतात. त्याचे निर्माते त्यांना झालेलं नुकसान पाहून चवताळतात आणि त्याला दिग्दर्शक म्हणून काढूनच टाकतात. त्याच्यात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही असा शिक्का मारून ते त्याची अवहेलना करतात. एका उंच कड्यावरून कोणी ढकलून द्यावं अशी अवस्था सुरेशची होते. मात्र त्याच्या स्वभावानुसार तो आतल्या आत घुसमटत तिथून निघून जातो. पुन्हा उभं राहणं त्याला जमतच नाही.

सिनेमासारख्या मायावी जगातलं अतिशय भयाण भेसूर सत्य इथं दिसतं. तो प्रवाहातून फेकला जातो. त्याला कोणीही ओळखेनासं होतं. कालांतरानं निर्माते शांतीच्या विरोधात दाखल केलेली केस जिंकतात आणि कराराप्रमाणे शांतीला त्यांच्या चित्रपटात काम करावं लागेल या विचारांन खुश होतात. अशा वेळी सुरेशचा मेव्हणा जॉनी वॉकर हा दूर एका छोटयाशा गावात गरीब मुलांना शिकवणार्‍या शांतीला भेटतो आणि तिनं काम केलं आणि सुरेशनं दिग्दर्शक म्हणून चित्रपट केला तर तो पुन्हा उभा राहू शकेल हे सांगतो. आपल्या निस्सिम प्रेमापुढे शांतीला दुसरं काहीच नको असतं. शांती परतते आणि निर्मात्यांना सुरेशच या चित्रपटाचा दिग्दर्शक हवा अशी अट घालते. निर्मातेही त्याला मनवून परत आणण्यासाठी त्याला शोधत दारूच्या गुत्त्यात जातात. मात्र त्याच्याशी बोलण्याच्या नादात त्यांच्याकडून सत्य बाहेर पडतं आणि मानी असलेल्या सुरेशला ती गोष्ट लागते. तो चित्रपट नाकारतो. शांतीचे प्रयत्न अयशस्वी होतात. काळ पुढे सरकत राहतो. सुरेशच्या मुलीचं लग्न ठरतं. तिला आपले वडील हवे असतात, ती त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत राहते. पण तो तिच्यासमोर येत नाही. त्यानं आपल्या जवळ तिची लहानपणची बाहुली आणि शांतीनं त्याच्यासाठी विणलेलं स्वेटर जपून ठेवलेलं असतं. एके दिवशी स्टुडिओच्या गर्दीत उभ्या असलेल्या सुरेशला एक्स्ट्राच्या भूमिकेसाठी पकडून सेटवर नेलं जातं. मेक-अपमधल्या सुरेशला तसंही कोणी ओळखत नाहीच. सुरेश आतून पुरता मोडलेला असतो. संन्याशिनीच्या रुपात असलेली हिरॉईन त्याच्या जवळ आली की केवळ एकच वाक्य त्याला बोलायचं असतं. पांढर्‍या साडीतली, हातात एकतारी घेतलेली शांती आपला डॉयलॉग म्हणत त्याच्याजवळ येते आणि तो तिच्याकडे केवळ बघतच राहतो. त्याला साधं एक वाक्यही म्हणता येत नाही बघून त्याला तिथून हुसकावून दिलं जातं.

शांती त्याला त्याच्या अंगातल्या उसवत चाललेल्या फाटक्या स्वेटरवरून ओळखते. ती त्याच्या मागे धावते, पण आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर असते आणि तिच्यासाठी वेडी झालेली गर्दी तिला अडवते, तिला पुढे जाऊच देत नाही. बघता बघता तिच्या नजरेसमोर पुन्हा एकदा तिचं प्रेम तिला हुलकावणी देतं. दारू आणि वृद्धत्वानं जराजर्जर झालेला सुरेश आपल्या भूतकाळातून भानावर येतो. स्टुडिओतल्या एक एक गोष्टी तो न्याहाळत राहतो. तो हाताळत असलेला त्याचा कॅमेरा, त्याची बसायची खुर्ची...सारं काही बघून तो थरथरत्या मनानं आणि थकलेल्या शरीरानं खुर्चीचा आधार घेत बसतो. सकाळ होते. नेहमीप्रमाणे स्टुडिओत काम करणारी गर्दी स्टुडिओत येते. खुर्चीत कोण आगंतुक येऊन बसलाय म्हणून बघते. सुरेशला ओळखणारा एक जण त्याच्याजवळ येतो आणि सुरेश केव्हाच हे जग सोडून गेल्याचं त्याला कळतं. गर्दी स्तब्ध होते. त्याच वेळी निर्माता येतो, त्यालाही कळतं की कोणे एके काळचा दिग्गज दिग्दर्शक खुर्चीत मृत्यू पावलेला आहे. पण आता त्याची किंमत शून्यच असते. एक कलेवर या पलीकडे सुरेशला कुठलंच मूल्य नसतं. या प्रेताला हलवा इतकं सहजपणे तो सूचना देऊन पुढचं काम सुरू करण्याविषयी सांगतो. चित्रपट संपतो.

लहानपणापासून वेगवेगळया गोष्टी शिकण्याची आवड असलेला अतिशय संवेदनशील हळव्या स्वभावाचा हा मुलगा पुढे टेलिफोन ऑपरेटर म्हणून आपल्या करियरला सुरुवात करतो काय आणि बघता बघता जागतिक दर्जाच्या उच्च कोटीच्या १६० उत्कष्ट चित्रपटात कागज के फूल सारख्या चित्रपटाला अढळ स्थान देतो काय सगळंच विलक्षण! गुरुदत्तनं तीन वेळा आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो दोन वेळा अयशस्वी झाला. असं म्हणतात, तिसर्‍या वेळी त्यानं मरणापूर्वी भरपूर दारू घेतली आणि नंतर झोपेच्या गोळया खाऊन १० ऑक्टोबर १९६४ या दिवशी या जगाचा निरोप घेतला! गुरुदत्तच्या स्मरणार्थ भारत सरकारनं पोस्टाचं तीकिट काढून आपली श्रदृधाजंली वाहिली. ज्याप्रमाणे बलराज साहनी हा अभिनयाच्या क्षेत्रातला दादा माणूस, त्याचप्रमाणे गुरुदत्त हा बाप माणूस! कागज के फुल या चित्रपटात प्रकाश आणि सावली यांचं अजब मिश्रण बघायला मिळतं.

लहानपणी गुरुदत्त छाया-प्रकाशाचा उपयोग करून हाताच्या बोटांना सावलीत नाचवत आपल्या भाऊ-बहिणींना चित्रमय गोष्टी सांगायचा. ती त्याची आवड या मोठया सिनेमास्कोप चित्रपटात बघायला मिळते. अब्रार अल्वी यांचं कथानक, कैफी आझमीची उत्कृष्ट अर्थपूर्ण अशी गीतरचना आणि एसडी बर्मन यांचं जीव हेलावणारं संगीत या चित्रपटात आहे. बिछडे सभी बारी बारी, सन सन सन वो चली हवा याशिवाय वक्त ने किया क्या हसी सितम हे गीता दत्तच्या आवाजातलं काळीज कापत जाणारं गाणं या चित्रपटाचा आत्मा आहे. गुरुदतची गाणी त्याच्या चित्रपटाबदद्वल बोलतात. गीता दत्तचा आवाज तर मनातून मिटता मिटत नाही. खरं तर या चित्रपटात सुरुवातीपासून या गाण्याचा उपयोग केला आहे. गुरूदत आणि वहिदा रेहमान यांचं प्रेम जेव्हा समोरासमोर व्यक्त होतं, तेव्हा हे गाणं दोघांच्याही मनात उमटतं....दोघंही दूर असतात, या गाण्याच्या वेळी स्टुडिओच्या दोन बाजूला उभे असलेले दोघं आणि दोघांच्या मनातली उत्कट ओढ छतातून येणार्‍या प्रकाशझोतातून सावलीच्या रूपात एकरूप होतात आणि पुन्हा विलगही होतात. पण मनानं मात्र एकरूप झालेले असतात. प्रत्येक प्रसंग या गाण्याचा वेगळाच अर्थ सांगत राहतो. हे गाणं, यातले शब्द, यातलं संगीत जगण्याचा, त्या वेदनेचा एक अपरिहार्य भाग बनून जातं. या

चित्रपटातला वहिदा रहेमान आणि गुरूदत्तचा अभिनय, यावर काय बोलावं, इतकी सहजता, की जणू काही वास्तव आणि कल्पना यातली धूसर रेषाही जणू मिटून गेली असावी. त्यांचे डोळे बोलतात, त्यांचा देह बोलतो आणि दिग्दर्शकाची प्रत्येक फ्रेमही बोलत राहते. या संपूर्ण चित्रपटात दोघंजण एकदाच जवळ आलेले दाखवलेत. अतिशय बकाल आणि गरीब अवस्थेत दारूच्या आधीन झालेल्या सुरेशला (गुरुदत्तला शोधत) शोधत शांती (वहिदा रेहमान) त्याच्या त्या झोपडीवजा घरात येते, तेव्हा इतक्या कालावधीनंतरही ते एकमेकांशी खोटं बोलू शकत नाहीत, न बोलताही ते एकमेकांची मनं जाणतात आणि त्या हळव्या क्षण ती त्याच्या छातीवर काही सेकंद फक्त डोकं टेकवते तो प्रसंग दोघांच्या अभिनयाची उंची गाठलेला प्रसंग म्हणावा लागेल. दोघांचे मिटलेले डोळेच फक्त बोलत राहतात.

२ जानेवारी १९५९ साली प्रदर्शित झालेला आणि फिल्म फेअर ऍवार्डनं पुरस्कृत केलेला हा गुरूदत्त दिग्दर्शित कागज के फूल हा चित्रपट त्या वेळी मात्र एक आठवडाभरही हा चित्रपट चालला नाही. इतक्या सुंदर कलाकृतीचं भरभरून यश बघणं गुरुदत्तच्या नशिबी नव्हतं. आज मात्र जगभरातल्या १३ नामांकित विश्‍वविद्यालयांमधून हा चित्रपट अभ्यासासाठी ठेवलेला आहे. २० वर्षांनी या चित्रपटानं लोकांना जाणीव झाल्यावर आणि या चित्रपटाचं महत्त्व पटल्यावर अक्षरशः डोक्यावर घेतलं. राजकपूर या दिग्दर्शक आणि अभिनेत्यानं तर म्हणूनच ठेवलं होतं. की कागज के फूल या चित्रपटाचं कलामूल्य लोकांना उशिरा कळेल. हा चित्रपट काळाच्या आधीच प्रदर्शित झालाय आणि तसंच झालं. गुरुदत काळाच्या पुढचा विचार करणारा कलावंत होता. त्याच्या कलेचं मूल्य त्या काळातल्या लोकांना समजणंच शक्य नव्हतं. चुकीच्या वेळी तो जन्मला आणि त्याचं मोल जगाला फार उशिरा समजलं. कागज के फूल हा चित्रपट मनाला बेचैन करून सोडतो. गुरुदत्तच्या वेदनांनी आपल्या हदयात जाऊन कधी जागा घेतली आपल्यालाही कळेनासं होतं हेच खरं! 

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.