लॉयन - ऑस्करसाठी ६ नामांकनं मिळवलेला चित्रपट 

लॉयन - ऑस्करसाठी ६ नामांकनं मिळवलेला चित्रपट 

आज खरं तर ‘मूनलाईट’ हा ऑस्कर विजेता चित्रपट बघायचा असं ठरवलं होतं. पण अपूर्वच्या आग्रहाखातर गार्थ डेव्हिस दिग्दर्शित ‘लॉयन’ बघितला. चक्क खंडवा, कोलकता, भारत ही सगळी दृश्यं पाहून चित्रपट ऑस्ट्रेलियन आहे का हिंदी हेच क्षणभर कळेनासं झालं.

सुरुवातीपासूनच चित्रपटानं पकड घेतली. कथानक, दृश्यं, पात्रं, परिस्थिती सगळ्यांनी मनाचा ताबा घेतला.....आजही शहराशहरांमधल्या फूटपाथवर झोपणारी माणसं, रस्त्यावर भीक मागत फिरणारी, बालपण हरवलेली शेकडो/हजारो मुलं, माणसाच्या रुपात असलेली जनावरं सगळं बघून मनाचं आक्रंदन सुरू झालं. डोळ्यातून अश्रू न जुमानता बाहेर पडू लागले. ‘लॉयन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून याचं कथानक खुद्द चित्रपटातल्या नायकानंच लिहिलं आहे.

सरू नावाचा अवघा पाच वर्षांचा निरागस मुलगा आपल्या भावाबरोबर भावाला कामात मदत करण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतो आणि दोघा भावांची ताटातूट होते. सरू खंडव्यापासून १६०० किमी दूर असलेल्या कोलकत्याला जाऊन पोहोचतो. आई-भाऊ यांना भेटण्यासाठी कासावीस होतो. त्याला जमेल तसं आपलं घर शोधण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यांत त्या निष्पाप जिवाच्या वाट्याला आलेले प्रसंग बघून अंगावर काटा येतो. मात्र आयुष्यभर ही काटेरी वाट त्याच्यासाठी नसावी. सरूचं आयुष्य बदलवणारा प्रसंग त्याच्या वाट्याला येतो. एक ऑस्ट्रेलियन जोडपं त्याला दत्तक घेतं आणि तो भारतातून थेट ऑस्ट्रेलियात पोहोचतो. एकीकडे भारतातलं दारिद्र्य, अस्वच्छता, गर्दी, कोलाहल आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियातल्या छोट्याशा बेटावरचं शांत, निसर्गरम्य, समुद्रकिनार्‍यावरचं वातावरण.... खरं तर त्याच्या ऑस्ट्रेलियन आई-वडलांनी त्याला दत्तक घेतलं नसतं तर त्याची अवस्था काय झाली असती याची कल्पनाही करवत नाही. त्याच्या आई-वडलांनी लग्न झाल्यावर स्वतःचं मूल होऊ द्यायचं नाही आणि जगात ज्यांना आई-बाप नाहीत अशा शेकडो/हजारो मुलांमधलं मूल दत्तक घेऊन त्याला प्रेम द्यायचं, वाढवायचं ठरवलेलं असतं.

मोठा झालेला सरू शिक्षणासाठी मेलबॉर्नला पोहोचतो. नवे मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर असतानाच एका पार्टीच्या वेळी मित्राच्या फ्रीजमध्ये असलेली जिलेबी बघून लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. या सगळ्या प्रवासात त्याचा शोध कळत-नकळत सुरूच असतो. तो अस्वस्थ होतो. कुठेच लक्ष लागत नाही आणि मग ‘गुगल अर्थ’वर त्याचा सर्च सुरू होतो. एके दिवशी मात्र योगायोगानं काही आठवणीं जास्त तीव्र होतात आणि त्या मॅपवरून बोटं फिरत असतानाच त्याला त्याचं ठिकाण सापडतं. डोळ्यात अश्रू दाटून येतात.....तो आपल्या मैत्रिणीला आणि आई-वडलांना सगळं सांगतो. जमतील त्या आठवणींना सावडून सरू भारतात पोहेाचतो. प्रेक्षक म्हणून आपलीही उत्कंठा ताणली जाते. काय होणार काहीच कळत नाही. मन सकारात्मक भावनेनं प्रार्थना करू लागतं. थोडा थोडका नाही २५ वर्षांचा काळ मध्ये लोटलेला असतो.

सरू आपल्या गावी पोहोचतो.....आठवणींच्या रस्त्यावरून घराच्या दिशेनं जात राहतो. आणि..........आणि त्याला त्याची आई भेटते.........मधलं अनेक वर्षांचं अंतर गळून पडतं. आता तर भाषाही एक राहिलेली नसते....पण प्रेम तेच असतं आणि त्या प्रेमाच्या स्पर्शात दोघं वाहून जातात....सरूचा जिवापाड प्रेम करणारा भाऊ-गुड्डू मात्र आता या जगात नसतो.

‘लॉयन’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर खरंखुरं कथानक, सुंदर अशी फोटोग्राफी, सुयोग्य पात्रांची निवड! देव पटेल - मोठा सरु आणि लहान सरु -सनी पवार यांनी कमाल अभिनय केला आहे. यात अनेक भारतीय चेहरे छोट्या-मोठ्या भूमिकेत आहेत. छोटा सरू याला स्वतःचंच नाव नीट उच्चारता येत नसतं. खरं तर त्याचं नाव शेरू असतं, पण तो सरू सांगत असतो. शेरूमुळे चित्रपटाचं नाव ‘लॉयन’ ठेवलं गेलं. चित्रपटाला ऑस्करसाठी जरी ६ नामांकनं मिळाली असली तरी काही वेळा चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो, त्यामुळेही कदाचित तो प्रथम क्रमांकावर येऊ शकला नसावा. मात्र हा चित्रपट जरूर जरूर बघण्यासारखा आहे. चित्रपट बघितल्यानंतर अनेक घटना डोळ्यासमोर येतात आणि मन अंतर्मुख होऊन विचार करत राहतं.

लहानपणी माझ्याकडे एक मांजराचं पोस्टर होतं, त्यावर लिहिलं होतं, ‘व्हेन गॉड क्लोजेस वन डोअर, ही ओपन्स अनादर’ हा चित्रपट बघताना त्याची प्रचिती येते. 

दीपा देशमुख, 
२७ फेब्रुवारी २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.