इन्टर्न

इन्टर्न

रॉबर्ट डिनेरो हा अतिशय लोकप्रिय असलेला अभिनेता - त्यानं ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या १९७६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात धूम मचवली होती. अतिशय सहजसुंदर अभिनय हे त्याचं वैशिष्ट्य! त्याची मुख्य भूमिका असलेला 2015 साली प्रदर्शित झालेला ‘इन्टर्न’ हा चित्रपट नुकताच बघितला.

‘अनुभव कधीच जुना होत नाही’ हे या चित्रपटाचं मुख्य सूत्र! निवृत्त झालेला रॉबर्ट डिनेरो हा एक ७० वर्षाचा विधुर असून निवृत्तीनंतर अनेक गोष्टी करून बघतो. तो आपल्या मुलाकडे राहायला जातो, अनेक क्लासेस जॉईन करतो, चायनीज भाषा शिकतो, पण तरीही त्याला त्याच्या आयुष्यातली पोकळी जाणवते. मग आता काय करायचं असा विचार करत असतानाच त्याला एक जाहिरात दिसते. तो पुन्हा काम करायचं ठरवतो आणि त्या स्टार्ट अप कंपनीत अर्ज करतो.

वयानं सगळ्यात वयस्क असलेला रॉबर्ट डिनेरो कंपनीत सिनियर इन्टर्न म्हणून सिलेक्ट होतो आणि दुसर्‍याच दिवशीपासून अतिशय टापटीप राहून वेळेवर तो कंपनीत पोहोचतो. त्याच्याबरोबर असलेले इन्टर्न त्याचा हा टापटीपीतला पोशाख बघून हे सगळं रोज करायची काय गरज असं त्याला ऐकवतात. कारण ते टी-शर्ट, दाढी अर्धवट वाढलेली अशा कशाही अवस्थेत ते येत असतात. रॉबर्ट डिनेरो मात्र आपल्या ब्रिफकेसमध्ये देखील पेन, डायरी, घड्याळ अशा उपयुक्त वस्तू रोज आणून टेबलावर लावत असतो. नवीन पिढी आणि तो जुन्या पिढीतला हे सगळं अंतरही तो कसं नष्ट करतो हे पाहण्यासारखं आहे. हळूहळू रॉबर्ट डिनेरो कंपनीत आपल्या लाघवी स्वभावानं सगळ्यांचा लाडका होतो. वयातलं अंतर गळून पडतं. कुठलंही काम करण्याची त्याला लाज वाटत नाही. त्याच्या अनेक सवयी हळूहळू इतर इन्टर्न देखील आत्मसात करतात.

या कंपनीची सर्वेसर्वा असलेली तरूण नायिका अॅन हॅथवे ही अतिशय समर्थपणे कंपनीचं काम सांभाळत असते. अतिशय कमी कालावधीत तिनं कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलेलं असतं. सुरुवातीला तिला या सिनियर इन्टर्नला काय काम सांगावं हा प्रश्‍नच पडतो. तो तिला मदत करताना तिच्या गाडीचा ड्रायव्हरपासून ते तिच्या मुलीला गार्डनमध्ये बर्थडे पार्टीला नेण्याचंही काम सहजपणे करतो. रॉबर्ट डिनेरो तिला ऑब्झर्व करत असतो. तिला समोरच्या टेबलावर रोज होत असलेला पसारा त्रासदायक होतो अशा अनेक गोष्टी बघून मनानेच तो त्या स्वतःच साफ करतो. एकदा ती स्वतःच्या कंपनीतून एक ड्रेस ऑर्डर करते. तो चुरगळलेल्या अवस्थेत असतो. तेव्हा ती पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या कर्मचार्‍यांना पॅकिंग कसं करायचं याचा पाठ देते. अशा अनेक गोष्टींमुळे रॉबर्ट डिनेरोला तिच्याविषयी विशेष कौतुक वाटत असतं.

अॅन हॅथवे हिलाही त्याची खूप सवय होते. नकळत तिला त्याचा आधार वाटू लागतो. अॅन हॅथवेचं झपाटून काम करणं बघून तिचा नवरा स्वतः यशस्वी प्रोफेशनल असला तरी तिच्यासाठी स्वतःहून घरातलं काम आणि मुलीची जबाबदारी स्वीकारतो आणि आपलं काम सोडतो. पण हळूहळू तिचं काम इतकं वाढतं की तिला घरासाठी, नवर्‍यासाठी वेळही देता येत नाही. तिचा नवरा एके दिवशी एका तरुणीच्या प्रेमात पडतो. अॅनला ते कळतं. आपलीच चूक आहे आणि ती दुरुस्त करायला हवी या विचारानं ती कंपनीसाठी एक सक्षम सीईओ निवडून त्याच्या हातात कंपनी सोपवायची असं ठरवते. त्याप्रमाणे रॉबर्ट डिनेरोला सोबत घेऊन ती हे काम पार पाडते. ती जेव्हा परतते, मात्र रॉबर्ट डिनेरो तिनं असं करू नये हे समजावून सांगतो. तो तिला तिची कामातली इन्व्हॉल्व्हमेंट, तिचं बारीकसारीक गोष्टीतलं लक्ष देणं सगळ्या गोष्टी तिच्यासमोर उभ्या करतो आणि एका वैयक्तिक गोष्टीसाठी तिनं सगळं पणाला लावू नये असंही सांगतो.

पण तिचा निर्णय झालेला असतो. तिला आपला संसार उदध्वस्त होऊ द्यायचा नसतो. तिच्या नवर्‍यालाही आपणच भरकटलो गेलो हे लक्षात आल्यानं तो अस्वस्थ होतो आणि तिला भेटायला कंपनीत येतो. ती त्याला आपला निर्णय सांगते आणि हे सगळं आपण आपल्या दोघांसाठीच करते आहे असंही सांगते. पण तिनं पूर्ण सांगायच्या आतच तो आपली चूक झाली म्हणत, तिनं आपल्या एका चुकीसाठी इतक्या कष्टानं उभारलेली कंपनी कोणाच्या ताब्यात देऊ नये असं सांगतो. अॅन हॅथवेला खूप आनंद होतो. तिच्या मनावरचा ताण हलका होतो.

ही आनंदाची बातमी तिच्याही नकळत तिचा झालेला मित्र रॉबर्ट डिनेरो याला सांगण्यासाठी त्याच्या जागेवर येते, पण तो तिथं नसतो. ती त्याला शोधत गार्डनमध्ये येते. तो व्यायाम करण्यात मग्न असतो. तिच्या चेहर्‍यावरचा आनंदच त्याला सगळं काही सांगून जातो. हा चित्रपट बघायला खूपच सुखावह वाटतो. यात रॉबर्ट डिनेरो आणि अॅन हॅथवे यांचा अभिनय अभिनय वाटतच नाही. असा एखादा इन्टर्न, असा एखादा जपणारा मित्र आपल्यालाही असावा असं वाटायला लागतं. रॉबर्ट डिनेरो मग आपल्याला आसपास, सर्वत्र दिसायला लागतो! 

दीपा, 
24 फेब्रुवारी 2017.

Tags

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.