माय वाईफस मर्डर
आताच बघितला आणि आवडला!!!! जरूर बघा!!! "माय वाईफस मर्डर" हा २००५ साली प्रदर्शित झालेला मूळ तेलगु चित्रपटाचा रिमेक. तेलगु चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्माने केलं होतं, तर हिंदीचं जिजी फिलीप यानं. हा चित्रपट बघताना थोडीफार दृश्यम या अजय देवगणच्या चित्रपटाची आठवण होते. "माय वाईफस मर्डर" या चित्रपटातला अनिल कपूरचा अभिनय लाजबाब आहे.
संशयी आणि भांडकुदळ असलेल्या बायकोची भूमिका सुचेता कृष्णमूर्ती हिने साकारली आहे. कामाने थकलेला भागलेला नवरा घरी आल्यावर त्याच्या वाट्याला क्षणभरही विसावा मिळत नसतो. अनिल कपूर म्हणजे रवी पटवर्धन हा स्वभावानं अतिशय साधासुधा - सरळमार्गी - दोन मुलांचा पिता. बायकोच्या किरकीरीने एके दिवशी त्याच्याही सहनशक्तीचा अंत होतो आणि तो शीलावर - त्याच्या बायकोवर हात उगारतो. तीही काही कमी नसतेच. ती त्याला उलट थप्पड मारते आणि त्याच्या सहकारी असलेल्या नंदना सेन आणि त्याच्याबद्दल उलटसुलट भाष्य करते. त्यांच्या झटापटीत ती पलंगाचा धक्का बसून खाली पडते आणि जागीच मरण पावते. अनिल कपूर शीलाच्या प्रेताची विल्हेवाट लावतो. घाबरलेला, भेदरलेला अनिल कपूर ज्या ज्या चुका करत जातो त्या या चित्रपटात बघायला मिळतात.
आपल्या बॉसवर पराकोटीचा विश्वास असलेली नंदना त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना खोटं बोलते. यात बोम्मन इराणीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका फार ताकदीने उभी केली आहे. चित्रपटात कुठलाही सस्पेन्स नसतानाही सरळ अंगाने जाणारी कथा आपल्याला अस्वस्थ करते. अनिल कपूरची अवस्था तर बघवत नाही. कुठलेली ठोस पुरावे नसताना बोम्मन इराणी खुनाचे धागेदोरे शोधून आरोपीपर्यंत पोचतो. सत्यापासून पाळणाऱ्या अनिल कपूरची असहाय अवस्था, मुलांची फरफट, मुलांवरच प्रेम आणि सतत टोचणारी अपराधी भावना याचा आपणही एक भाग बनतो.
शेवटचा प्रसंग तर मनाला हेलावून सोडतो. अनिल कपूर आणि बोम्मन इराणी यांच्या अभिनयाला सलाम!!!!! या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक खुद्द अनिल कपूरही आहे हे विशेष!!!
दीपा देशमुख
Add new comment