डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रयोग - अपूर्व मेघदूत

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्रयोग - अपूर्व मेघदूत

१८ डिसेंबर, रविवार २०१६ हा दिवस मानसिक आणि शारीरिक दोन्हीही रीतीनं अतिशय वाईट्ट गेला. झालेल्या मनःस्तापानं आजारपण ओढवलं आणि दिवसभरातले सगळेच कार्यक्रम चौपट झाले. त्यातच स्वाती राजे या मैत्रिणीला कबूल करूनही तिच्या बालगंधर्वला असलेल्या ‘भाषा’ कथायात्री कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. मात्र त्याच संध्याकाळी स्वागत थोरातशी मेघदूतविषयी चॅटिंग झालं आणि त्यानं 'याच' असा आग्रह केला. मी ‘नक्की येते’ सांगितलं आणि आसावरीला फोन करून जायचं ठरवलं.....काल रात्री ९ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शो होता. बाणेर ते कोथरूडचं नाट्यगृह...सगळं कठीण होतं...पण आसावरीकडेच मुक्काम करायचं ठरवलं आणि आम्ही दोघी पोहोचलो. 

आपण सध्या आभासी जगात खूप छान रीतीनं वावरतोय, व्यक्त होतोय, प्रेम करतोय. पण प्रत्यक्षात नाही तर केवळ शब्दातून उतरवण्यापुरतं. हे सांगायचं कारण म्हणजे या शोला प्रेक्षक गर्दीनं आले नव्हते. मोजके पण दर्दी प्रेक्षक मात्र नक्कीच होते. त्यातही गझलचे दर्दी सुरेशकुमार वैराळकर, सपत्नीक होते. कार्यक्रम सुरू झाला.

मला कालिदासाचा जीवनप्रवास माहीत होता, पण मेघदूत इतकं सविस्तर माहीत नव्हतं. जे काल अनुभवलं. १९ अंध कलाकारांना (खरं तर ते व्यावसायिक कलाकारही नाहीत, आपल्या तीव्र इच्छेखातर चांगलं काहीतरी करू यासाठी परिश्रमपूर्वक व्यासपीठावर उभे राहिलेले...) घेऊन स्वागत थोरात दिग्दर्शित दोन अंकी अपूर्व नाटक! नाटक सुरू झालं आणि सुरू झाल्या झाल्याच त्यानं पकड घेतली. नाटक पुढे सरकत चाललं तसतसे माझ्या डोळ्यातून आसवं ओघळायला लागली. त्या अंधारात त्यांना बघणारं कोणी नव्हतं. पण बघितलं तरी मला कुठे तमा होती? समोर दिसणाऱ्या कलाकारांनी आपल्यातल्या कमतरतेला बाजूला सारून केलेली ती कृती मनाला गहिवरून टाकणारी होती.....

जिवापाड प्रेम करणारे यक्ष आणि यक्षिण! कुबेराच्या शापानं त्यांना एक वर्ष दूर राहावं लागतं. दोघांनाही एकमेकांपासून विलग केलं जातं.  त्या दोन प्रेमी जिवांच्या विरहवेदना, व्याकुळता, उत्कटता, बेचैनी हे सगळं त्या यक्ष आणि यक्षिणीच्या अभिनयातून, हालचालीतून आणि अभिनयातून हुबेहूब साकारलं गेलंय, की त्यासाठी अश्रूच केवळ दाद देऊ शकतात! हद्दपार झालेला यक्ष अखेर एका मेघाला विनवणी करून आपला संदेश आपल्या प्रियतमेला द्यावा म्हणून सांगतो. या मेघाची प्रेयसी/पत्नी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. ती त्याला म्हणते, 'हे यक्ष मायावी असतात, ते तुला फसवून तुला खाऊन टाकतील, तू यांच्या जाळ्यात सापडू नकोस.’ पण मेघाला तिचं म्हणणं पटत नाही. मेघाच्या प्रेयसीला तो आपल्यापासून दुरावेल किंवा या प्रवासात इतर कोणाच्या प्रेमात पडेल असंही वाटत राहतं. या दोघांचं नातं खूप मीश्कील, खट्याळ आणि तरीही हवंहवंस वाटतं. तिचं उपहासानं बोलणं, त्याला अडवण्यासाठी त्याला आपल्या प्रेमाची शपथ देत थांबवायचा प्रयत्न करणं खूपच स्वाभाविकपणे आपल्यासमोर येतं. 
यातलं मुख्य पात्र यक्ष - याचं पाठांतर, शब्दफेक आणि आवाजातले चढउतार, शब्दोच्चार....आख्खं नाटक चांगलं होणं म्हणजे तो यक्ष या नाटकाचा भरभक्कम मुख्य स्तंभ म्हणावा लागेल. त्याच्यासाठी 'अप्रतिम' एवढा एकच शब्द! हा यक्ष अखेर मेघाचं मनपरिवर्तन करतो आणि तो त्या मेघानं प्रेयसीला संदेश देण्यासाठी जाण्याचा प्रवास कसा करावा, त्या प्रवासात त्याला काय काय ठिकाणं लागतील, हे सगळं वर्णन करून सांगतो. हे सगळं कथन म्हणजेच मेघदूत! यक्ष प्रवासातल्या प्रत्येक गोष्टीचं नितांत सुंदर वर्णन करतो. आपल्यासमोर ती सगळी दृश्यं दिग्दर्शकानं समर्थपणे उभी केली आहेत. तसंच आपली विरहात जी स्थिती झालीये, तशीच माझ्या प्रियेची तिकडं झालीये असं तो यक्ष मेघाला सांगतो. मेघ दूत बनून जातो. मेघाची प्रेयसी देखील यक्षाचं प्रेम बघून द्रवते आणि मेघाला आपण चुकलो असं सांगते. त्याला जा सांगते. मेघदूत यक्षिणीला यक्षाचा संदेश जसाच्या तसा देतो. त्याचा संदेश ऐकताना ती यक्षिन वेडीपिशी होते, तिची विरहवेदना जणू काही संपते आणि हा संदेश म्हणजे जणू काही आपला प्रियतम आपल्याला भेटलाय असा अत्यानंद तिला होतो. इथं नाटक संपतं. 

मात्र नाटकाची सुरूवात कालिदासाच्या प्रवेशानं होते. वृद्ध कालिदास आपल्याच प्रेमाची गोष्ट सांगतोय आणि मग यक्षाचं प्रतिक घेऊन तो तिची गुंफण करतोय. त्यामुळे यक्ष/यक्षिणीचं कथानक संपल्यावर पुन्हा कालिदास प्रकटतो. इथं खरं नाटक संपतं. 

या नाटकात संस्कृतमधलं पठण किंवा वाचन करणारा कलाकारही ग्रेटच! तसंच यक्षाचं मराठी जणू काही संस्कृत आहे असं ऐकताना नादमधुर एकीकडे वाटतं, पण त्याचबरोबर ते इतकं सोपं की त्यात कुठेही क्लिष्टता नाही. लेखक गणेश दिघे हा तरूण स्वतः रातांधळा असून त्यानं सांगितलं की 'बोल राधा बोल' या चित्रपटातल्या कादरखानप्रमाणे माझी अवस्था रात्री होते. पण स्वागत थोरात यांची दोन शिबिरं मी केली आणि माझ्यातला आत्मविश्‍वास इतका वाढला की जंगलं, दर्‍या-खोर्‍या लीलया पायाखाली तुडवतो. गणेश दिघेचं लेखन अप्रतिम! लिखाणच सकस असल्यानं पुढली इमारत अर्थातच मजबूत होणारच! 
या नाटकाचं नेपथ्य इतकं नेटकं, कुठेही गर्दी नाही....एक मेघ (म्हणजे आकार) आणि नयनरम्य अशी प्रकाशयोजना याशिवाय व्यासपीठावर काहीही नाही आणि जपानी पद्धतीमुळे हे मोकळं अवकाश खूप काही बोलून जातं, खूप काही रिकाम्या जागांमधले अर्थ सांगून जातं. या नाटकात छायाप्रकाशाचा खेळ इतका इतका अप्रतिम केलाय, की तो सांगणं गुन्हा ठरेल, तो प्रत्येकानं अनुभवलाच पाहिजे. ही दृश्यं बघताना गुरूदत्त या काळाच्या पुढे चालणाऱ्या दिग्दर्शकाची आठवण आली. या नाटकाचं अरविंद हसबनीस यांचं संगीत संयोजन आपल्याला वेडं करतं. इतकं समर्पक, इतकं सुरेल की या नाटकाचा संगीत हा आत्मा बनलाय. ‘हे काय होतेय हृदयी कळेना’ ...त्या प्रणयाच्या आठवणी आणि आताची विरहाची स्थिती या गाण्यातून ती आर्तता जी व्यक्त झालीय तिला तोड नाही. प्रेम कसं करावं तर या यक्षासारखं, असा यक्ष आपल्याला मिळावा असं प्रत्येक मुलीला वाटावं असा हा यक्ष या गाण्यातून साकारला गेलाय. ‘हृदयीच्या ...चित्र तुझे रेखिते...’ यातून यक्षिणीची पीडा, विरहवेदना व्यक्त झालीये. त्याचंच नाव, त्याचीच आठवण, त्याच्याशिवाय क्षणही जात नाहीये हे या गाण्यातला प्रत्येक सूर सांगतो. ‘तुझं विण मी रे...मजविण तू रे...’ हे मेघाच्या प्रेमिकेचं अतिशय सुरेख गाणं आहे. त्यांचं दोघांचं नातं खूप सुरेख उलगडलंय. यातल्या ‘कैलासाच्या दुर्गम वाटा’ हेही गाणं अप्रतिम! यातल्या एका प्रसंगात तर फक्त इन्स्ट्रुमेन्टल वातावरणात समूहनृत्य आहे आणि हे नृत्य प्रेक्षकांना केवळ वेड लावतं म्हटलं तरी चालेल. 
खरं तर मी निर्माती रश्मी पांढरे, वीणा ढोले आणि मुग्धा प्रसादे यांचे रोज १०० वेळा आभार मानले तरी ते कमीच ठरतील. असा विषय निवडून, १९ अंध कलाकारांना घेऊन इतकं समर्थपणे आणि यशस्वीपणे हे नाटक करणं ही सोपी गोष्ट नाहीच मुळी! हे कलाकार कोणी नोकरी करणारे, कोणी शिकणारे, आपल्यातल्या अंधत्वाचा बाऊ न करता आपले कलागुण दाखवण्यासाठी, सादर करण्यासाठी निगडी काय, विश्रांतवाडी काय दूरदूरवरून नाटकाच्या तालमीसाठी थंडी, ऊन, वारा, पाऊस सगळे अडथळे पार करून वेळेवर पोहोचत होते. कधीही त्यांनी उशिरा येण्याचे बहाणे बनवले नाहीत. खरं तर व्यासपीठावर त्यांना बघितल्याशिवाय (त्यांचे अथक परिश्रम) मी काय म्हणते, हे कळूच शकणार नाही.

कलाकारांविषयी.....मी अपंगत्वावर कार्यकर्ती या नात्यानं काम केलंय/करतेय. जेव्हा अपंगांच्या परिषदा भरतात, साहित्य संमेलनं पार पडतात, तेव्हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येनं अपंग बांधव एकत्र येतात. आपले हक्क मिळायला हवे यासाठी ते झगडत राहतात, आपलं म्हणणं पोटतिडकीनं मांडत राहतात. या व्यवस्थेनं सरकारनं त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून, त्यांना त्या त्या सुविधा, ते हक्क द्यायलाही हवेत. पण तिथं मला नेहमीच खटकायचा तो इतरांच्या दृष्टीतला आणि खुद्द अपंगांच्या मनातला सहानुभूतीचा सूर! इथं ‘अपूर्व मेघदूत’च्या निमित्तानं एकच सांगावंस वाटतं, हे सगळे कलाकार इतक्या व्यावसायिक पद्धतीनं व्यासपीठावर वावरत होते की ते डोळस माणसाच्या डोळ्यात अंजन घालत होते. आपला स्वाभीमान त्यांच्या प्रत्येक हालचालीतून व्यक्त करत होते. आपली प्रतिभा आपली ताकद ते दाखवत होते. त्यांच्यातलं एकीकरण, त्यांच्यातलं संघटन, त्यांचं टायमिंग इतकं अप्रतिम की डोळस कलाकारसुद्धा चुकू शकला असता, पण यातला एकही कलाकार कुठेही चुकला नाही. मुळात सांगितलं नसतं तर हे कलाकार अंध आहेत हेच मुळी मानायला मन तयार झालं नसतं. यातले फुलांचे हार एकमेकींना देण्याचे प्रसंग, कुंकू लावण्याचे प्रसंग, अनेक समूहनृत्य, मेघ आणि त्याच्या प्रेयसीचं प्रणयात्मक नृत्यगान अप्रतिम! अप्रतिम आणि अप्रतिम!

'अपूर्व मेघदूत’ मधले दोष शोधायचेच झाले तर इतकंच म्हणेन, की नाटक थोडं लांबल्यासारखं वाटतं. यातली गाणी एका कडव्यातच आटोपली तर कदाचित आणखी रंगत वाढू शकेल का? असं वाटतं. पण अर्थात स्वागत त्यातला तज्ज्ञ आहे, त्यामुळे ही केवळ माझ्यातल्या टीकाकाराची शंका! पण तीही खूप क्षुल्लक!

या नाटकाचे अनेक प्रयोग व्हायला हवेत. त्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. माझे मित्र महेश भागवत आणि ज्ञानेश्‍वर मुळे हे दोघं अतिशय उच्च  पद भूषवणारे कल्पक, सर्जनशील, कार्यक्षम अधिकारी असून ते उत्तम साहित्यिक आणि सांस्कृतिक गोष्टींना प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांना माझी जाहीर विनंती आहे की त्यांनीही पुढाकार घेऊन या नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन करावं.

स्वागत, जे काल व्यासपीठावर घडलं ते अदभूत होतं, ते शब्दांत व्यक्त करणं याला खूप मर्यादा आहेत. पण तरीही मी ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. तू जे काम करतोस त्याबद्दल सुरुवातीपासून तुझ्याविषयी आदर आहेच आणि काल नाटक संपल्यावर तो औपचारिकपणे व्यक्त करणं मला शक्यच नव्हतं. म्हणूनच धावत येऊन तुला मिठी मारून त्या स्पर्शातून मी हे कृतज्ञ भाव व्यक्त करू शकत होते आणि तेवढंच मी केलं!

दीपा २० डिसेंबर २०१६

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.