फायरब्रँड
आजच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला प्रियंका चोप्रा निर्मित 'फायरब्रँड' हा चित्रपट बघितला. कौटुंबिक न्यायालय....सुनंदा नावाची वकील...स्त्रियांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच यश मिळवणारी......तिचं वैयक्तिक जगणं...समजंस नवरा....आणि लहानपणी घडलेल्या एका प्रसंगानं संपूर्ण आयुष्यावर पडलेलं सावट......या दोन कसरतीत सुनंदाचं जगणं.....मनोचिकित्सा..........अनेक गोष्टींबद्दलचा खूप बारकाईनं विचार यात मांडला आहे....
स्त्रीची आगतिकता, अन्याय, तर कधी स्त्री असल्याचं भांडवल....कधी भौतिक चंगळवाद, तर कधी मानसिक विकारांशी झुंज....मानसिक विकारांचा स्वीकार......वर्तमानात जगणं जमलं नाही तर जगणं हातातून कसं निसटत जातं.....असे अनेक कंगोरे या चित्रपटातून समोर येत राहतात.....मला हा चित्रपट आवडला. अरूणा राजे ही हटके काही करणारी बाई आहेच. तिचं लिखाण आणि तिचंच दिग्दर्शन म्हटल्यावर मनात शंका नव्हतीच. त्यात पडद्यावर जेव्हा गिरीश कुलकर्णी दिसला, तेव्हा तर आणखीनच निर्धास्त झाले.
गिरीश कुलकर्णीच्या कामातली सहजता नेहमीच खेचून घेणारी असते. सुनंदाचं काम करणार्या उषा जाधव या तरुणीनं आपली भूमिका खूपच चांगली साकारली आहे. सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव यांनीही आपली भूमिका खूपच उत्तम केली आहे! जरूर पहा. फायरब्रँड!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment