गजेंद्र अहिरेचा डिअर मोली!!!
सभोवताली सर्वत्र कोवळं पोपटी ताजं गवत....समोर पहुडलेला शांत जलाशय....पाण्याचे तरंग देखील आपला आवाज येणार नाही ना याची काळजी घेत असावेत, असं शांत, निःशब्द वातावरण आणि त्या चित्रातलाच एक भाग बनून जावी अशी गुरबानी गील नावाची एक गोड तरुणी! हे चित्र आताही मनावर ठसलेलं आहे.....आज फिल्म अर्काइव्ह इथं कल्याणच्या फोनमुळे जाणं झालं आणि एका सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेता आला. राष्ट्रीय स्तरावर चित्रपटांना पुरस्कार मिळवणारा गजेंद्र अहिरे हा दिग्दर्शक! त्याचाच डिअर मोली हा चित्रपट आज बघायचा होता. वेळेत पोहोचले, तेव्हा गजेंद्र अहिरे स्वागताला समोर उभे होते. त्यांच्याशी बोलून लगेच डॉ. माधवी मेहेंदळे, आसावरी आणि मी आपल्या जागेवर स्थानापन्न झालो. पाचच मिनिटांत चित्रपट सुरू झाला. 'डिअर मोली' हा ऑस्करपर्यंत पोहोचलेला चित्रपट! एका मराठी दिग्दर्शकाची ही झेप खरंच अभिमानास्पद आहे.
हा चित्रपट सुरू झाला आणि आपण पठडीतला किंवा एका ठरावीक चाकोरीतला मराठी चित्रपट बघत नाही आहोत याची कल्पना आली. पुणे आणि स्वीडन इथं घटना घडत होत्या....कधी फ्लॅशबॅक तर कधी वर्तमान असा आपल्या वडिलांना शोधायला निघालेल्या एका मुलीचा हा प्रवास होता. या प्रवासात कुठेही गोंगाट नव्हता. एखाद्या सुरेख चित्रांचा अल्बम बघावा तसा हा प्रवास प्रेक्षक म्हणून मीही अनुभवत चालले होते. समोरची दृश्यं मला तृप्त, शांत करून सोडत होती. चित्रपटाला साजेसं संगीत, पात्रांची अचूक निवड आणि सहजसुंदर अभिनय यामुळे चित्रपट तरल पातळीवरूनच पुढे सरकत होता.....चित्रपट संपल्यानंतर गजेंद्र अहिरेंनी या चित्रपटनिर्मितीविषयी अगदी थोडक्यात सांगितलं. एकदा सुमित्रा भावे यांच्याबरोबर स्वीडनला गेलेले असताना तिथला निसर्ग बघून मनात चित्रपट निर्मितीची इच्छा जागी झाली आणि त्यानंतर या चित्रपटाची कथा जन्माला आली. अगदी कमीत कमी साधनांसहित, युनिटसहित हा चित्रपट बनला.
या चित्रपटातल्या पोलिसांपासून ते अनेक पात्रं स्वीडनची खरीखुरी आहेत आणि त्यांनी अतिशय मनापासून गजेंद्रला सहकार्य केलं. या चित्रपटातली नायिका गुरबानी गील हिला महाराष्ट्रीयन भाषेचा गंध नसतानाही तिला मृण्मयी गोडबोलेनं केलेल्या सहकार्यातून तिनं तिची भूमिका आणि डॉयलॉग्ज अतिशय सफाईनं सादर केले. डिअर मोली हा चित्रपट थोडा मराठी आणि बाकी इंग्रजी भाषेत असा आहे. अर्थातच चित्रपट बघताना भाषेचा अडसर अजिबात जाणवत नाही. गजेंद्र अहिरे यांनी सांगितलं, की माझं इंग्रजी फारसं चांगलं नाही आणि चित्रपट करताना स्वीडनच्या लोकांचंही इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं आमची खूप गंमत व्हायची. मात्र भाषेचा अडसर न येताही आम्ही एकमेकांना कसं समजून घेतलं, त्या भूमिकेची नाळ प्रत्येकाला कशी सापडत गेली हे खूप मोकळेपणानं सांगितलं. खरोखरंच या चित्रपटातला टॅक्सीचालक असेल, मोलीला भेटलेलं त्रिकूट असेल, लिंडा असेल किंवा बँकेतले अधिकारी वा पोलीस अधिकारी असतील....सगळ्यांचाच अभिनय सहजसुंदर होता. अश्विनी गिरी आणि मृण्मयी गोडबोले यांनीही आपल्या भूमिका खूप समरस होऊन केल्या आहेत.
यातली किंचित खटकलेली बाब म्हणजे मोली किंवा माऊली ही लहानपणीची आणि मोठेपणीची यात फारच तफावत वाटते. ती कास्टिंग बरोबर वाटत नाही. तसंच आलोक राजवाडे या भूमिकेत तितकासा फिट वाटत नाही. ना तो संशोधक वाटला, ना एक पिता! डिअर मोलीची कथा आणि दिग्दर्शन गजेंद्र अहिरे याचंच आहे. नेहमीपेक्षा सतत वेगळा प्रयत्न करणार्या गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं एका तरल कॅनव्हासवर सुरेल काव्यात्म प्रवासाचा अनुभव घडवला याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment