शांतीत क्रांती
2001 साली प्रदर्शित झालेला ‘दिल चाहता है’ आणि 2011 चा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे दोन चित्रपट बघितले का, या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर अर्थातच 'हो' असणार आहे. आणि हे दोन्ही चित्रपट सगळ्यांनाच आवडलेही होते. दोन्ही चित्रपटात तीन जिवलग मित्रांची गोष्ट होती, तशीच गोष्ट 'शांतीत क्रांती' या सोनी लिव वर 13 ऑगस्ट 2021 या दिवशी प्रदर्शित झालेल्या 6 एपिसोडच्या वेबसिरीज मध्ये आहे.
श्रेयस (अभय महाजन- हो, तोच गच्चीमधला नायक!), प्रसन्न (ललित प्रभाकर - आनंदी गोपाळवाला, चिसौंका आणि बऱ्याच चित्रपटांतून/मालिकेतून झळकणारा) आणि दिनार (आलोक राजवाडे - भाडिपातून सातत्यानं भेटणारा) हे तिघं बालमित्र, लहानपणी कटू, नकोशा गोष्टी देखील सहजपणे आणि निरागसपणे एकमेकांशी शेअर करणारे, पण मोठे होत जाताना अनेक प्रश्न, समस्या मनात दडवून आपला एकत्र असतानाचा वेळ आनंदात कसा जाईल ते बघणारे....एकाच्या मैत्रिणीने त्याच्या स्वभावाला कंटाळून ब्रेकअप केलाय, दुसऱ्याला स्विमिंगमध्ये देशपातळीवर स्वत:ला सिद्घ करायचंय, पण येऊ बघणारं बाळ की स्वत:चं करिअर यात तो अडकलाय, तर दिनार हा लहानपणच्या दारुड्या वडिलांच्या आठवणी दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असलेला....एके दिवशी अचानक हे तिघे मित्र दरवर्षी जातात त्याप्रमाणे गोव्याला जायचं ठरवतात. दारू, मौज, मस्ती हाच ठरलेला बेत असतो. सातत्यानं आठ वर्ष गोव्याला जाऊन त्यांना शांती मिळालेली नसते आणि त्यांच्या समस्येचं उत्तरही. मात्र मौजमजेचीही सो कॉल्ड व्याख्या अशीच असते अशी त्यांची समजूत असते. या मालिकेत ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे अनेक संदर्भ वेळोवेळी यातल्या तिन्ही पात्रांच्या तोंडून येत राहतात. चित्रपटातला आमीर खान, सैफ अलीखान आणि अक्षय खन्ना हे कोण आहेत हेही या तिन्ही पात्रांनी ठरवलेलं असतं.
गोव्याला जाण्याऐवजी लोणावळा इथल्या शांतिवन (इगतपुरी इथलं विपश्यना केंद्र किंवा लोणावळा इथलं मन:शक्ती केंद्र किंवा सिद्घ समाधी योग (एसएसवाय) वगैरे टाईप...) इथे श्रेयस, प्रसन्न आणि दिनार जाऊन पोहोचतात आणि तिथे सहा दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्यात होणारे बदल आपल्याला बघायला मिळतात. या शांतिवनात त्यांना अंतर्मनात डोकावून बघण्याची संधी मिळते आणि आतमध्ये खोलवर रुतून बसलेल्या गोष्टी वर वर येतात आणि आत माजलेली खळबळ शांत शांत होते आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही त्यांना मिळतात.
‘शांतीत क्रांती’ चं कथानक खूप जॉली मूडमध्ये प्रेक्षकांना प्रवास घडवतं. आयुष्याबद्दलचं तत्वज्ञान सांगत असतानाच, तरुणाईची भाषा, त्यांचे विनोद यांची अतिशय सहजपणे पेरणी झालीय. यातल्या एका प्रसंगात दिनारला छोटू, शिंदे अध्यात्मिक बाबा समजतात आणि त्या दोघांमुळे धुमाळकाकापासून इतरही काहीजण भक्तिभावाने जवळजवळ त्याला पूजायला लागतात. ते प्रसंग इतके भन्नाट रंगवले आहेत की आपण खळखळून हसल्याशिवाय राहूच शकत नाहीत.
भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीचा संस्थापक सारंग साठे, पॉला मॅकग्लिन आणि अनुष्का नंदकुमार यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन खुमासदार शैलीत केलंय. क्षणोक्षणी आपल्या चेहऱ्यावर हासू उमलवण्याचं आव्हान त्यांनी पेललं आहे. या शांतिवनात आलेला शिंदे नावाचा राजकारणी तरुण, त्याच्या बोटातल्या पिवळ्या धम्मक अंगठ्या आणि गळ्यातल्या जाड्याभरड्या सोन्याच्या साखळ्या, आणि त्याच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टींना असलेलं महत्व खूप चांगल्या पद्घतीने समोर येतं. सागर यादव या तरुणाने या भूमिकेत जाण आणली आहे. एकटेपणाला कंटाळलेला धुमाळकाका धनंजय सरदेशपांडेने मस्त साकारलाय. वास्तवाचा घाबरून पळून जाऊ पाहणाऱ्या पण हतबल झालेल्या माणसांचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र धनंजयने अतिशय सहजपणे उभं केलंय. हिंदीतली अभिनेत्री शिखा तलसानिया हिने मराठीत पहिल्यांदाच काम केलं असून तिचं दर्शनही खूप सुखद वाटतं. सुजिता थत्तेमधली उताराचा प्रवास करणारी एक संवेदनशील स्त्री खूप आपलीशी वाटते. विजय निकम यांनी यातला महागुरू लई भारी साकारलाय. मृण्मयी गोडबोले, सखी गोखले, जितेंद्र जोशी, निनाद गोरे, सारंग साठ्ये, अमेय वाघ, पॉला मॅकग्लिन आणि विभावरी देशपांडे यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.
एक ट्रीप आयुष्यात काय बदल घडवून आणते हे सांगणारी ही गोष्ट. खरं तर या वेबसिरीजमध्ये आजची तरुणाईच्या शिव्या आहेत, मस्ती आहे, पण तरीही त्या कुठेही टोचत नाहीत, बोचत नाहीत. आपलं या तिघांबरोबर नातं झकासपणे जुळतं हे विशेष!
खरं तर भौतिक (विशेषत: चंगळावादी) गोष्टींनी आपल्यावर इतकं आक्रमण केलंय, की त्या गोष्टींशिवाय आपण जगूच शकत नाही अशी धारणा आपली झालेली आहे. अशा वेळी त्याच वस्तूंना दूर केल्यावर सुरुवातीला होणारी मनाची तगमग निसर्गाच्या सान्निध्यात हळूहळू कशी शांत होत जाते ते इथं बघायला मिळतं. नातेसंबध, स्वप्नं, स्पर्धा, अपेक्षा अशा कितीतरी ओझ्यांना घेऊन चालणारा मनुष्य ते ओझं बाजूला काढून ठेवल्यावर काय फील करतो हे सांगणारी ही ‘शांतीत क्रांती’. सुरेख दिग्दर्शन, सहजसुंदर अभिनय, समर्पक संगीत आणि सुखद छायाचित्रण या ही वेबसीरीज बघायला साहाय्यभूत ठरतात.
‘शांतीत क्रांती’ ही वेबसीरीज भाडिपाने तयार केली असून भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी हे एक यू ट्यूब चॅनेल असून यावर नेहमीच खुसखुशीत विनोदी व्हिडिओज बघायला मिळतात. नुकताच आलेला कांदेपोहे - नागपूर व्हाया कोथरूड हा एपिसोड धमालच होता. वऱ्हाडी भाषेत बोलणारा लग्नाळू मुलगा आणि त्याचे वडील, तर पक्की पुणेरी आई आणि मुलगी यांच्यातली जुगलबंदी अप्रतिम रंगली होती. 2016 च्या दरम्यान अस्तित्वात आलेलं भाडिपा यानं अवघ्या साडेचार-पाच वर्षांच्या कालावधीत १0 लाखाच्या वर फॉलोअर्स आणि 1 कोटी 50 लाखाच्या वर प्रेक्षक मिळवले आहेत. त्यांचं हे यश खरोखरंच कौतुकास्पद आहे. मराठीत प्रदर्शित झालेली शांतीत क्रांती ही मालिका मराठी शिवाय हिन्दी, तमिळ, मल्याळम याही भाषांमधून डब झालेली आहे. भाडिपाने तयार केलेली ही मालिका खरोखरंच सुरेख झाली असून चेहऱ्यावर प्रसन्न हासू आणण्यासाठी जरूर बघायला हवी.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment