विश्व चषकाचा मानकरी - 83

विश्व चषकाचा मानकरी - 83

भारतीय लोकांचा आवडता खेळ क्रिकेट असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन असो, वा आपल्या घरातल्या टीव्‍हीवर असो, क्रिकेटची मॅच दोन्ही ठिकाणी बघताना तितकाच आनंद अनुभवायला मिळतो. कोणे एके काळी भारतीय क्रिकेटर्सना क्रिकेट विश्वात अगदीच नगण्य स्थान होतं. अशा वेळी 25 जून 1983 या दिवशी इंग्लडमधल्या लॉर्ड्सच्या मैदानावर दोन वेळा विश्व चषक मिळवलेल्या वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघावर ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय संघाने विश्व चषक जिंकला. समस्त भारतीयांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा तो क्षण होता. देशाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान होता कपिल देव!
1983 च्या मार्च महिन्यात भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक चषक सामन्यांमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाली. कप्तान म्हणून कपिल देवच्या निवडीवर अनेकजण खुश नव्‍हते. एवढंच नाही तर भारतीय क्रिकेट संघालाही आपण विश्व चषक जिंकून येऊ असं कल्पनेतही वाटलं नव्‍हतं. आपण एक दोन मॅचेस जिंकू आणि युरोपमध्ये जाऊन मौजमजा करून भारतात परतू असा विचार त्यांनी केला होता. 
1983 सामना पुनश्च अनुभवण्यासाठी कबीर खान, दिपिका पदूकोन, साजीद नाडियादवाला, अशा काही निर्मात्यांनी एकत्रित येऊन 83 नावाचा चित्रपट रिलायन्स एंटरटेन्टमेंट, पँथम फिल्म्ससह प्रोडक्शन कंपन्यांच्या सहयोगाने तयार केला. पॅन्डॅमिकच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं सतत पुढे ढकललं गेलं पण 24 डिसेंबर 2021 या दिवशी भारतात 83 हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला.
83 हा चित्रपट काय सांगतो? टीमचा कप्तान संपूर्ण टीमला कशा रीतीने प्रेरित करून आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवतो आणि यश प्राप्त करतो याची ही सत्यकथा तर आहेच, पण या चित्रपटात अनेक रिकाम्या जाग्या आहेत, त्या प्रेक्षक स्वत: भरतो आणि त्या जागांबरोबर आपलंही नातं जोडतो. वेगवेगळया जातिधर्माची मंडळी भारतीय क्रिकेट टीममध्ये असून त्यांचं खाणं, पिणं, सवयी सगळं काही वेगवेगळं असलं, तरी त्यांच्यातलं परस्परांशी जोडलं गेलेलं मैत्र, जिद्द, ध्यास, असा भाग यात अधोरेखित केला आहे. 
या चित्रपटात सर्वच पात्रांची निवड हुबेहूब तर केली आहेच, पण सगळ्यात भाव खाऊन जाणारी व्‍यक्तिरेखा म्हणजे कपिल देवची भूमिका साकार करणारा रणवीर सिंह. त्याने या चित्रपटात आपल्या चाहत्यांना अवाक् करून सोडलं आहे. त्याच्या दिसण्यात मेकअपचा मोठा वाटा असला, तरी कपिल देव कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो याचा त्याने अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला जाणवतो आणि हाच खराखुरा कपिल देव असं मन केव्‍हाच मान्य करतं. 
भारतीय क्रिकेट संघाचा मॅनेजर मानसिंह याच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी याने जान आणली आहे. भारताची वेळोवेळी कुचेष्टा केली जाते याचं मानसिंहला वाईट वाटत असतं आणि तो ही खंत कपिल देवजवळ वेळोवेळी बोलून दाखवतो. कपिल देवने आपल्या संघाला प्रोत्साहित करायला हवं याचा तो आग्रह धरतो, पण कपिल देवला इंग्रजी नीट येत नसल्यामुळे त्याला ते जमत नसतं. पण हळूहळू तो आपल्या टीमला प्रेरित करण्यात कसा यशस्वी होतो हे बघणं खूपच रंजक आहे. पत्रकार परिषदेत आपण वर्ल्ड कप जिंकून परतणार असंही कपिल देव घोषित करतो. 
83 हा चित्रपट अडीच तासांपेक्षा जास्त असून एक क्षणभरही कंटाळा येत नाही. यात कृष्णामाचारी श्रीकांतच्या भाषेमुळे होणाऱ्या गमतीजमती, वेस्ट इंडिजचे विवियन रिचर्ड्ससह दणकट क्रिकेटर आणि त्यांच्याकडे बघताना दहशत निर्माण व्‍हावी असं त्यांचं व्‍यक्तिमत्व, लंडनमध्ये दाक्षिणात्य पध्दतीचं जेवण मिळण्यासाठी आसुसलेला श्रीकांत आणि त्याला जेवायला घालून आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात देता येईल याचं स्वप्न रंगवत असलेलं लंडनस्थित कुटुंब, त्या कुटुंबाचा स्वप्नभंग करणारे श्रीकांतचे मित्र, शेवटच्या टप्प्यात भारत हरणार या विचाराने स्टेडियम सोडून हॉटेलच्या रूमवर निराशा घेऊन परतणारी आणि भारत जिंकणार असं लक्षात येताच पुन्हा स्टेडियमकडे धावत सुटलेली कपिल देवची पत्नी, पास नसल्याने तिला आत न सोडणारा अधिकारी, शेवटच्या मॅचच्या वेळी एका पाठोपाठ एक आउट झालेले खेळाडू आणि इकडे गरम पाण्याने मस्त अंघोळ करत असलेला त्यांचा कप्तान कपिल देव, अंतिम सामन्याच्या वेळी आपसातले धार्मिक वाद, दंगे मिटून एकजुटीने एकाच टीव्‍हीवर क्रिकेटचा सामना बघत असलेले भारतीय, कपिल देवचा चाहता असलेला चिमुकला मुलगा, अशा अनेक गोष्टी आपल्याला पडद्यावरची नजर हटवू देत नाहीत हेही तितकंच खरं. 
83 या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे खरेखुरे क्रिकेटर्स जसे खेळत, किंवा त्यांच्या लकबी जशा होत्या तशाच यातल्या पात्रांनी हुबेहूब वठवल्या आहेत. उदा. मोहिंदर अमरनाथ जसा बॉलचा टप्पा टाकत असेल, तसाच साकिब सलीम हा त्याची भूमिका करणारा अभिनेता करताना दाखवला आहे. या चित्रपटातली प्रीतमची गाणी अतिशय अर्थपूर्ण असून ज्यूलियस पॅकियमचं संगीत अतिशय समर्पक असं आहे. तसंच क्रिकेटचे चाहते असोत वा नसोत दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार आहे. तसंच नॉस्टॅल्जिक होण्याची ही एक सुवर्णसंधीच आहे. यात नाट्य आहे, थरार आहे, उत्कंठा आहे, देशभक्‍ती आहे आणि ह्दयाला हेलावून टाकणाऱ्या भावनाही आहेत. 
रजनीकांत, रवि शास्त्री आणि विराट कोहली यांनी या चित्रपटाची भरभरून प्रशंसा केली आहे, तर एनडीटीव्‍हीने या चित्रपटाला पसंतीची पावती दिली आहे. 
83 हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला मनापासून दाद देत आहेत. या चित्रपटाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मॅचचा शेवट काय हे माहीत असूनही आपली उत्सुकता अबाधित ठेवण्यात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट म्हणजे कपिल देवचं केवळ खेळाविषयीचं चरित्र नसून भारताने मिळवलेल्या विश्व चषक सामन्याचा सखोल संशोधन करून सादर केलेला एक महत्वाचा दस्तावेज आहे!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.