लुडविग व्हॅन बीथोवन 

लुडविग व्हॅन बीथोवन 

एक संगीतकार आपल्या नवव्या सिंफनीचं संचलन करत होता. ही सिंफनी पूर्ण होताच आख्ख्या सभागृहातले मंत्रमुग्ध झालेले श्रोते टाळ्यांचा कडकडाट करत भारावलेल्या अवस्थेत उभे होते.  पण दैवदुर्विलास बघा! त्या संगीतकाराच्या कानावर त्याचं हे कौतुक पडतच नव्हतं. कारण हा संगीतकार त्या वेळी ठार बहिरा झालेला होता. आपल्या लाडक्या संगीतकारापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी श्रोत्यांनी केवळ टाळ्याच नाही तर कुणी रुमाल हवेत उडवून, कुणी आपल्या टोप्या काढून वर हवेत फेकत, कुणी हात वर करत आपला आनंद व्यक्त केला आणि त्यांनी त्याला उभ्यानं ५ वेळा मानवंदना दिली. संगीत समीक्षक या संगीतकाराची नववी सिंफनी सर्वोत्कृष्ट संगीतरचना मानतात. या ग्रेट संगीतकाराचं नाव होतं बीथोवन!

पाश्‍चिमात्य संगीताच्या क्लासिकल आणि रोमँटिक कालखंडातल्या संक्रमण अवस्थेतला जर्मनीतमधला लुडविग व्हॅन बीथोवन हा अतिशय प्रसिद्ध आणि अत्यंत प्रभावशील संगीतकार आणि पियानोवादक होऊन गेला. सोनाटा, सिंफनी, कॉन्चर्टो आणि क्वार्टलेट या संगीतप्रकारात त्यानं नवनवीन प्रयोग केले. त्याचं वैयक्तिक आयुष्य संघर्षानं झाकाळून गेलेलं असतानाही त्यानं संगीताच्या दुनियेत अमीट ठसा उमटवला. 
लुडविग व्हॅन बीथोवन या संगीतातल्या शेक्सपिअरचा जन्म १६/१७ डिसेंबर १७७० साली जर्मनीतल्या र्‍हाईन नदीच्या काठी असलेल्या बॉन या गावात एका गरीब घरात झाला. त्याचे आजोबा आणि वडील दोघंही संगीतकार होते. बीथोवनचे वडील योहान बीथोवन  हे दारुच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. बीथोवनची आई मारिया ही खूपच प्रेमळ आणि सुसंस्कृत अशी गृहिणी होती. प्राथमिक स्तरावरचं संगीताचं ज्ञान बीथोवनला त्याच्या वडिलांनी दिलं. त्यांनीच बीथोवनला पियानो आणि व्हायोलिन ही वाद्यं शिकवली. आपला मुलगाही मोत्झार्टप्रमाणे प्रतिभावंत म्हणून ओळखला जावा असं बीथोवनच्या वडिलांना वाटे. 

बीथोवन शाळेत जायला लागला पण तो सतत संगीताच्या विचारांमध्येच गढून गेलेला असे. त्याच्या शाळेतल्या इतर मुलांना तो एकलकोंडाच वाटत असे. असं म्हणतात की त्याला डिस्लेक्सिया होता. बीथोवन ९ वर्षांचा झाल्यावर, त्याच्या वडिलांनी आपल्या छोट्याशा घरातली एक खोली एका संगीतकाराला भाड्यानं दिली. त्यानं भाड्याच्या बदल्यात बीथोवनला शिकवायचं अशी अट बीथोवनच्या वडिलांनी त्याला घातली. जवळजवळ वर्षंभर बीथोवनचं संगीताचं शिक्षण नियमितपणे सुरू होतं. याच काळात बीथोवन लॅटिन, फ्रेंच आणि इटालियन या तिन्ही भाषा शिकला. गंमत म्हणजे त्यानं तर्कशाााचाही अभ्यास केला. त्याचबरोबर पियानोबरोबरच ऑर्गन हे वाद्यंही तो शिकला. 

ऑस्ट्रियातलं व्हिएन्ना हे शहर त्या वेळी संगीताच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं  केंद्र होतं.  १७ वर्षांचा बीथोवन आपल्या स्वप्नांना उराशी बाळगून मित्राच्या मदतीनं आपली स्वप्ननगरी व्हिएन्ना इथे पोहोचला. एके दिवशी पत्ता शोधत तो चक्क मोत्झार्टच्या घरीच जाऊन धडकला. मोत्झार्टनं बीथोवनचं प्रेमानं स्वागत केलं आणि त्याच्याकडे काही लोक आल्यामुळे तो दुसर्‍या खोलीत जाऊन पुन्हा व्यस्त झाला. कंटाळा येऊ नये यासाठी मोत्झार्टनं बीथोवनला एक साधीशी संगीतरचना वाजवण्यासाठी दिली. बीथोवन त्या रचनेत इतका गुंग झाला, की त्यानं मोत्झार्टच्या संगीतरचनेतला फक्त एक धागा पकडला आणि त्यात आपलं कौशल्य आणि सर्जनशीलता वापरून इतकं वैविध्य आणलं की दुसर्‍या खोलीत बसलेल्या मोत्झार्टच्या कानावर ते सूर पडले आणि तो थक्क झाला. तो उठून बीथोवन वाजवत असलेल्या ठिकाणी आला आणि बघतो तर काय? बीथोवन तर सगळं भान हरपून वाजवत होता. मोत्झार्ट वेगानं पुन्हा दुसर्‍या खोलीत आला आणि त्याच्याकडे आलेल्या लोकांना आनंदानं म्हणाला, ‘‘अरे या पोराकडे नीट डोळे उघडे ठेवून बघा. हा एके दिवशी ऐकत राहावं असं असं विलक्षण संगीत जगाला देईल.’’ 

याच दरम्यान बीथोवनची ब्रेक्वेनिंग कुटुंबाशी ओळख झाली. त्यांची मुलं बीथोवनचे शिष्य बनले. बीथोवन त्या सुसंस्कृत कुंटुंबात राहिल्यानं बीथोवनच्या जाणिवांच्या कक्षा अधिकच रुंदावल्या. त्यांच्यामुळेच बीथोवन साहित्यात रस घ्यायला लागला. थोडाही रिकामा वेळ मिळताच तो चांगलं साहित्य वाचणं किंवा संगीतरचना करणं यात व्यतीत करायला लागला. याच दिवसांत त्याची वाल्डस्टाईन नावाच्या एका तरुण सरदाराशी ओळख झाली. तो बीथोवनचा निस्सीम चाहता होता. या सरदारानं एकदा बीथोवनला दारूण गरिबीतल्या अवस्थेत जुन्यापुराण्या पियानोवर वाजवताना बघितलं. आपण स्वतः इतकं विलासी आयुष्य जगत असताना बीथोवनसारखा उच्च कोटीचा प्रतिभावंत संगीतकार अशा स्थितीत जगू शकतो ही कल्पनाच त्याला सहन होईना. त्यानं एक अतिशय किमती आणि सुरेख असा पियानो बीथोवनला भेट दिला. या पियानोवर बीथोवननं अतिशय सुंदर अशी सोनाटाची रचना केली. हा सोनाटा ‘ वाल्डस्टाईन सोनाटा’ म्हणूनच ओळखला जातो. 

विख्यात संगीतकार हेडन यानंही बिथोवनचं संगीत ऐकून त्याची खूप प्रशंसा केली होती. त्या वेळी बीथोवनचं वय अवघं २२ वर्षांचं होतं. खरं तर त्याच्या अनेक संगीतरचना ऐकून लोकांमध्ये त्याचं नावही बर्‍यापैकी झालं होतं. लोक त्याला सन्मानपूर्वक वागवत. बीथोवनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली होती.

२९ मार्च १७९४ या दिवशी बीथोवननं आपला पहिला कॉन्चर्टो बुर्ग थिएटरमध्ये सादर केला. प्रेक्षकांनी बीथोवनला भरभरून प्रतिसाद दिला. पण त्याच वेळी त्याला ऐकायला येईनासं झालं. काहीतरी किरकोळ असेल असं म्हणून बीथोवननं त्याकडे दुर्लक्षही केलं. ‘आम्हा कलाकार मंडळींना अश्रू नाही, तर टाळ्यांचा कडकडाट हवा असतो’ तसंच ‘शब्दांआधी संगीतच माझ्याकडे धावत येऊन पोहोचतं.’ असं एके ठिकाणी बीथोवननं संगीताच्या बाबतीत लिहून ठेवलंय. १७९६ सालच्या फ्रेब्रुवारी ते जून या महिन्यांत बीथोवननं नरेन्बर्ग, प्राग, ड्रेस्डेन आणि बर्लिन या ठिकाणी संगीताचे कार्यक्रम केले आणि त्या दरम्यान त्यानं सोनाटा -५ सोनाटा - २ आणि सोनाटा - ४ रचला. त्यानंतर त्यानं पियानो सोनाटा -१० आणि व्हायोलिन सोनाटा -१२ यांची निर्मिती केली. 

बीथोवनच्या संगीत रचना उच्चप्रतिभेच्या होत्या. ‘‘श्रोते कुणीही आणि कसेही असोत, बीथोवनच्या संगीतानं श्रोत्यांचे डोळे पाणावत. बीथोवनच्या संगीतवादनामध्ये श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची जबरदस्त ताकद होती.’’ असं त्याचा शिष्य कार्ल सीर्झनी यानं लिहून ठेवलंय,

जगभरात बीथोवनचे प्रचंड चाहते आहेत. पहिल्या महायुद्धात जपानमध्ये जर्मन युद्धकैद्यांना प्रेरणा मिळावी म्हणून बीथोवनच्या नवव्या सिंफनीचा कार्यक्रम केला होता. तेव्हापासून जपानमध्ये नववर्षांची सुरुवात करताना आवर्जून बीथोवनची नववी सिंफनी आजही सर्वत्र वाजवली जाते. शीतयुद्धाच्या दरम्यान ऑलिम्पिक्स स्पर्धेत जेव्हा पूर्व जर्मनी आणि पश्‍चिम जर्मनी यांचा संयुक्त संघ मैदानात उतरायचा, तेव्हा बीथोवनच्या याच नवव्या सिंफनीमधला एक भाग संयुक्त जर्मनीच्या टीमचं राष्ट्रगीत म्हणून वाजवलं जायचं! तसंच चीनमध्ये बीथोवनचं संगीत आवडणं हे प्रतिष्ठेचं आणि पुरोगामी असल्याचं लक्षण मानलं जातं. इतकंच नाही तर अनेक शहरांमध्ये बीथोवनचे पुतळे उभारलेले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतला महान प्रतिभावंत दिग्दर्शक सत्यजीत रे यांना बीथोवनचं संगीत खूप आवडायचं.

एकोणीसाव्या शतकातली पहिली काही वर्षं बीथोवनसाठी खूपच कठीण गेली. इतरांशी चाललेला संवाद त्याला आता ऐकू न येण्याइतपत तो ठार बहिरा झाला होता. तो हळूहळू एकांतात वेळ व्यतीत करायला लागला. त्यानं एका पत्रात लिहिलंय, ‘मी आतमध्ये भावलेल्या गोष्टी जोपर्यंत व्यक्त करत नाही तोपर्यंत मी हे जग सोडून जाणं अशक्य आहे.’ याच दिवसांत  बीथोवननं टेम्पेस्ट सोनाटा रचला. शेक्सपिअरच्या टेम्पेस्ट नाटकामुळे बीथोवनला हा सोनाटा लिहिण्याची प्रेरणा मिळाली होती. बीथोवनची एरोइका ही तिसरी सिंफनीही खूपच गाजली. त्यानं ही सिंफनी ‘नेपोलियन’च्या सन्मानार्थ रचली होती. बीथोवननं आपल्या पास्कालाटी हाऊसमध्ये आपल्या चौथी, पाचवी आणि सहावी अशा सगळ्यात श्रेष्ठ अशा सिम्फनीज पूर्ण केल्या. आज पास्कालाटी हाऊस या बीथोवनच्या घराचं एका संग्रहालयात रुपांतर करण्यात आलं आहे. 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.