इरूल

इरूल

आजच म्हणजे 2 एप्रिल 2021 या दिवशी प्रदर्शित झालेला गूढ, रहस्यमय, गुन्हेगारी, थरार निर्माण करणारा असा इरूल हा मल्याळम चित्रपट बघितला. आवडला कारण यातही आपला लाडका फहाद फासिल आणि सौबिन शाहीर (कुम्बलिंगी नाईट्समधला सगळ्यात मोठा भाऊ) यांची जबदरस्त जुगलबंदी दाखवलेली आहे. त्यांच्यासोबत दर्शना राजेंद्रन ही अभिनेत्री आहे.

सौबिन शाहीर हा एक लेखक असतो. त्याची आणि दर्शनाची तीन महिन्यांपूर्वी ओळख आणि मैत्री होते. ती एक वकील असते. दोघंही जेव्‍हा कधी भेटतात, तेव्‍हा तिच्याशी काही मनातलं बोलावं तर तिचे कामाचे फोनकॉल्स येत असतात. त्यामुळे सौबिन तिच्याबरोबर डेटला जायचं ठरवतो आणि जाताना दोघांनीही आपले मोबाईल बरोबर घ्यायचे नाहीत असं ते ठरवतात. या भेटीत मी तुला सरप्राईज देणार आहे असं तो तिला सांगतो. संध्याकाळी दोघंही निघतात, प्रवासात अंधारून येतं, मुसळधार पाऊस सुरू होतो आणि घाटात गाडी बंद पडते. अशा वेळी प्रयत्न करूनही गाडी सुरू तर होत नाहीच, पण एखाद्या मेकॅनिकला बोलावायचं म्हटलं तर दोघांनीही मोबाईल आणलेले नसतात. मागून वेगानं येणाऱ्या गाड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून दोघंही थोड्या अंतरावर दिवे दिसल्यानं तिकडे मदत मागावी म्हणून गाडीला लॉक करून निघतात. सोबत छत्री असते. तिथे एक एकमेव बंगला दिसतो. त्या बंगल्याच्या खिडक्या वगैरे बंद असतात. सौबिन बेल वाजवतो, पण आतून काहीच प्रतिसाद येत नाही. तो तिला तिथेच थांबायला सांगतो आणि सगळीकडून चक्‍कर मारून येतो, दर्शना देखील खिडकीच्या फटीतून आतलं काही दिसतं का बघण्याचा प्रयत्न करते. सौबिन म्हणतो, कदाचित आत कोणी नसेल. पण असे बंगलेवाले घराची चावी अशीच कुठेतरी ठेवून जातात. आणि तो कुंडीखाली, भिंतीवर वगैरे शोधायला लागतो. अचानक दार उघडलं जातं आणि फहाद फासिल नाईट ड्रेसमध्ये उभा असतो. सौबिन आणि दर्शना त्याला आम्हाला एक फोन करायचाय, तर मोबाईल देता का असं विचारतात. त्या वेळी तो मी मोबाईल वापरत नाही असं सांगतो. दोघंही लँडलाईन असेल तर आम्हाला एक कॉल करायचाय सांगतात. त्या वेळी तो त्यांना घरात घेतो, पण लँडलाईन फोन डेड असल्याचं सांगतो आणि खरंच तो डेड असतो. बंगल्यात दुर्मिळ अशा वस्तू असतात. घरातलं वातावरण थोडं गूढच वाटतं. फहाद दर्शनाला पावसामुळे ओली झालेली असल्यानं तिला वर बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलावेत असं सुचवतो. ती वर जाऊन कपाटातला मरून कलरचा वनपीस ड्रेस घालून खाली येते आणि थँकयू म्हणते. भिंतीवर एका स्त्रीची तसवीर असते, फहाद ती आपल्या आईची असल्याचं सांगतो आणि वरच्या कपाटातले कपडेही तिचेच असल्याचं सांगतो. फहाद मानसशास्त्रात रस असल्यानं सौबिन आणि दर्शना ही दोघं नुकतेच एकमेकांना ओळखत असून त्यांचं अद्याप लग्न झालेलं नाही असं आपलं निरीक्षण नोंदवतो. दोघंही ती गोष्ट कबूल करतात. तो दर्शनाला वाईन देतो आणि सौबिन आणि फहाद देखील ड्रिंक घेतात. सौबिनला तू काय करतोस असं फहाद विचारतो. तेव्‍हा सौबिन आपण लेखक असल्याचं सांगतो, शिवाय तो आपण बिझिनेसमन असल्याचं सांगतो. लिखाण ही आपली पॅशन असल्याचं तो म्हणतो. त्याचं एकमेव इरूल नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं असून ते तू वाचलं नसशील असं फहादला म्हणतो. पण फहाद आपल्या रॅकमधून तेच पुस्तक काढतो आणि मी ते वाचलंय असं सांगतो आणि मग त्या तिघांच्या ड्रिंक घेत घेत गप्पा सुरू होतात. सौबिनने आपल्या पुस्तकात एका सिरीयल किलरबद्इल लिहिलेलं असतं. त्यानं ५ खून केलेले असतात. आणि तेही सगळे स्त्रियांचे. त्यावर चर्चा सुरू असते. खरं तर दर्शनाला त्याने आपलं पुस्तक वाचण्याविषयी नेहमीच सांगितलेलं असतं, पण तिच्या कामाच्या व्‍यापामुळे तिने ते वाचलेलं नसतं. फहाद आपल्याला सौबिननं लिहिलेलं पुस्तक आवडलेलं नाही असं स्पष्ट सांगतो. कारण खूनामागचा हेतू काय असं तो विचारतो. त्या वेळी सौबिन बदला, सूड, छळ अशी कारणं देतो, तर फहाद जिज्ञासा, कुतूहल, अशी काही कारणं असू शकतात असं सांगतो. या वेळी अनेकदा लाईट येतात जातात आणि फहाद घरात सगळीकडे मेनबत्या पेटवतो. त्यामुळे घरातलं वातावरण आणखीनच गूढ वाटायला लागतं. फहाद दर्शनाला ती काय करते विचारतो तेव्हा ती वकील असल्याचं सांगते. सत्य आणि असत्य यावर त्या तिघांची चर्चा रंगते. वकिलाने फॅक्टस समोर ठेवायच्या असतात आणि सत्य काय याचा निवाडा करणं न्यायालयाच काम असल्याचं ती सांगते.

अचानक वीज कडाडते आणि पुन्हा एकदा संपूर्ण वीज जाते. सौबिन त्याला फ्यूज गेलं असेल आणि आपण ते बघू असं सुचवतो. दोघंही दर्शनाला तिथेच थांबवून तळघरात फ्यूज बघायला टॉर्च घेऊन जातात. तळघरात फहाद पाय घसरून पडतो, त्याचा चष्मा दुसरीकडे आणि टॉर्च एकीकडे पडतो आणि त्या वेळी सौबिनला फ्यूज चा बॉक्स दिसतो आणि तो बसवतो, पण त्या टॉर्चच्या प्रकाशात एका स्त्रीचे डोक्यावरचे केस पूर्ण शेव करून मारून टांगून ठेवलेलं असतं त्यानंतर पुन्हा एकदा अंधार होतो. दर्शना घाबरून त्या दोघांना शोधत निघते, तेव्‍हा तिला सौबिन फहादला ओढत हॉलमध्ये आणत असतो. हॉलमध्ये आणल्यावर दोरी शोधून तो त्याचे हात पाठीमागे बांधतो. इथे एका स्त्रीचा खून झाल्याचं सांगतो आणि फहाद हा खूनी असल्याचं सांगतो. दर्शना घाबरून जाते, ती पोलिसांना फोन करू बघते, पण अर्थातच फोन डेड असतो. फहाद मेलेला नसतो, तर सौबिनच्या फटक्याने तो बेशुध्द पडलेला असतो. फहाद शुध्दीवर आल्यावर आपण एक चोर असून केवळ चोरी करायला या घरात आल्याचं सांगतो आणि खाली तळघरात एका स्त्रीचं प्रेत असून सौबिन हाच या घराचा मालक असून तोच खुनी असल्याचं सांगतो. मला इथून जाऊ द्या, मी कोणालाही काही सांगणार नाही अशी विनवणी तो करू लागतो. दर्शनाला काहीच कळेनासं होतं. सौबिन तिला आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न फहाद करतोय, हाच सिलीयर किलर असल्याचं सांगतो. आणि त्यानंतर मग दोघांमध्ये आपापली बाजू सांगत एक जुगलबंदी रंगते. दर्शनाप्रमाणेच आपणही प्रेक्षक खरा खुनी सौबिन की फहाद असा विचार करत राहतो. दोघांचंही म्हणणं आपल्याला पटायला लागतं.

शेवटी काय घडतं, दोघांमध्ये खुनी कोण असतो, दर्शना खरा खुनी कोण ते ओळखू शकते का अशा अनेक प्रश्नांची उत्तर इरूलमध्ये मिळतात. शेवटपर्यंत उत्कंठा आणि थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. शेवटही चांगलाच केलाय, पण प्रेक्षक म्हणून काही प्रश्नांचा उलगडा होत नाही. पण तेवढं जर सोडलं तर फहाद आणि सौबिन यांचा अभिनय तोडीस तोड, लाजवाब. दर्शनाने देखील त्यांना उत्तम साथ दिलीय. मला तरी इरूल आवडला, कारण असे चित्रपट, असं कथानक मला आवडतं. जरुर बघा ‘इरूल’

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.