कुलकर्णी चौकातला देशपांडे
कुलकर्णी चौकातला देशपांडे
गजेंद्र अहिरे यांचा नवा मराठी चित्रपट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा निर्मितीप्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात असून काही निवडक लोकांसाठी या चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला होता. मी, अभिजीत, मिनाक्षी मोरे, कल्याण तावरे, डॉ. राजीव ठाकूर, मनिष साबळे आणि आणखी काही मित्र-मैत्रिणी गजेंद्र अहिरेंच्या डॉन इन्फोटेनमेंट स्टुडिओमध्ये सायंकाळी साडेसहाला पोहोचलो.
गजेंद्र अहिरे यांनी आत्तापर्यंत ४६ चित्रपट केले असून दिग्दर्शन, पटकथालेखन, संगीत, गीत, संवाद अशा अनेक भूमिका ते लीलया निभावत असतात. त्यांचे नॉट ओनली मिसेस राऊत, शेवरी, अनुमती, हे चित्रपट खूप गाजले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरची अनेक पारितोषिकं पटकावली. नुकत्याच पार पडलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पिंपळ' या चित्रपटानंही ४ पारितोषिकं मिळवली. 'पिंपळ' हा अतिशय सुरेख असा चित्रपट आहे. जरूर जरूर बघितला पाहिजे.
'कुलकर्णी चौकातला देशपांडे' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सई ताम्हणकर असून तिने अतिशय सहजसुंदर अभिनय केला आहे. ती यात दिसतेही छान. या चित्रपटाची फोटोग्राफी खूपच अप्रतिम असून लडाखमधला भाग बघण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळतो. चित्रपटाचं कथानक सांगत नाही, पण यात डिव्होर्सी तरुणीची कथा असून स्वतःचं अस्तित्व, स्वातंत्र्य, जोडीदार, संसार, मुलाची जबाबदारी अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत कथानक पुढे सरकतं. यात देशपांडे या व्यक्तिरेखेतून पुरुषी मानसिकतेचं सुरेख चित्रण बघायला मिळतं. चित्रपटाचं पार्श्वसंगीतही उत्तम! अभिनय सगळ्यांचेच उत्तम! यातल्या एका पाहुण्या कलाकाराची भूमिका कल्याण तावरे या आमच्या मित्रानंही पार पाडली आहे.
आणखी काही बदल या चित्रपटात होणे आहे. त्यामुळे चित्रपट लांबट वाटला किंवा आणखी काही ते अंतिम स्वरूपात पडद्यावर आल्यावरच काय ते सांगता येईल. तोपर्यंत प्रतीक्षा! धन्यवाद कल्याण आणि गजेंद्र, एका वेगळ्या अनुभवाबद्दल!!!
दीपा देशमुख
७ फेब्रुवारी २०१८.
Add new comment