ओ बेबी
सत्तरी पार केलेल्या एका स्त्रीची ही गोष्ट. तिला कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेला एक मुलगा आहे, सून आहे आणि एक तरुण नातू आणि नातही आहे. मुलाच्याच कॉलेजवळ ती आणि तिचा बालमित्र चान्टी हे एक रेस्टारंट चालवत असतात. घरातही तिचाच रुबाब असतो. स्वयंपाकापासून ते अनेक गोष्टीत तिचाच प्रभावी वावर असतो. तिचा नातू संगीत क्षेत्रात आपल्या बँड द्वारे काहीतरी करू इच्छित असतो. अर्थातच तो आजीचा म्हणजे बेबीचा लाडका असतो. ती त्याला गिटार आणायला किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी साठवलेले पैसे देत असते. स्वत: मात्र फाटलेली चप्पल देखील बदलत नसते. मुलावर इतकं प्रेम असतं की त्याच्या बुटावरची धूळ ती आपल्या पंजाबी ड्रेसच्या कुर्त्यानं पुसायलाही मागेपुढे बघत नसते. बोलायला फटाकडी असलेल्या बेबीचं वागणं तिच्या नातीला फारसं आवडत नसतं, तसंच सुनेलाही ते आवडत नसतं. एके दिवशी सुनेला हार्ट ॲटक येतो आणि शुध्दीवर येताच ती आपल्या सासूनं म्हणजेच बेबीनं आपल्या जवळ नको येऊ नये असं सांगते. डॉक्टरही पेशंट खूप स्ट्रेसमध्ये असून तिला पुन्हा ॲटक आला तर तिच्या जिवाचं काहीही होऊ शकतं असं सांगतात. तसंच तुम्ही तुमच्या आईला दूर ठेवा असं सांगतात. आपल्या एखाद्या नातेवाईकाकडे काही दिवस, किंवा स्वतंत्र रुम घेऊन किंवा एखाद्या वृध्दाश्रमात ठेवावं अशाही मुलाला सूचना मिळतात. मुलाला इकडे आड तिकडे विहीर असं होतं. त्याच वेळी आपल्या सुनेची काळजी करत बेबी हॉस्पिटलमध्ये सुनेसाठी डबा, ज्यूस सगळंकाही घेऊन येते आणि मुलाला सांगते, तू थकला असशील तू जा, मी तिच्याजवळ बसेन. मुलगा तिला दूर ठेवण्यासाठी तू आज रेस्टारंटमध्ये जाणार नाहीस का विचारतो, तेव्हा ती ते इतकं महत्वाचं नाही असं म्हणते. ती जेव्हा मुलाला जाण्याचा आग्रह करते, तेव्हा आईची अवस्था आपल्या आजीमुळेच झाली या विचारानं बेबीची नात तिच्यावर ओरडते आणि आपल्या आईला ती डोळ्यासमोर देखील नको आहे असं सांगते. ते सगळं ऐकताच बेबीला गरगरू लागतं. आपण नको आहोत ही गोष्ट तिला सहन होत नाही आणि ती हॉस्पिटलमधून बधिरावस्थेत बाहेर पडते. तिच्या जिवलग मित्राला, चान्टीला ती सगळं सांगते, तेव्हा तो तिला माझ्या घरी चल म्हणतो. पण ती नकार देते. त्याच वेळी तिच्या नातवाचा संगीताचा कार्यक्रम असतो आणि आई हॉस्पिटलमध्ये असल्यानं तू तरी ये असा आजीला म्हणजे बेबीला आग्रह करतो. नातवाच्या प्रेमापोटी बेबी रिक्षा करून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचते. तिथे एक ज्योतिषी तिचं भविष्य बघण्यासाठी मागे लागतो. पण माझा देवावर विश्वास नाही, त्यानं काय माझं चांगलं केलं, असं ठणकावून सांगते. तो तिच्या हातात एक गणपतीची मूर्ती ठेवतो आणि तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होतील असं सांगतो. त्या मूर्तीचे किती पैसे द्यायचे असं ती विचारते, तेव्हा पैसे घ्यायला तो नकार देतो. तेवढ्यात तिला समोर एक फोटोचं दुकान दिसतं. ती आत शिरते, तेव्हा तिथे एक दाढीवाला फोटोग्राफर असतो. ती त्याला आपला सुंदर फोटो काढ असं सांगते आणि तोही तिची प्रशंसा करत तिला खुर्चीवर बसवतो. तो तिचा फोटो काढतो आणि ती एकदम ५० वर्षांनी लहान होते. बेबी आता सुंदर अशी तरुणी झालेली असते आणि ती जेव्हा बाहेर येते, तेव्हा तिच्या सौंदर्याकडे बघून काही टवाळ मुलं तिची छेड काढतात, तेव्हा ती त्यातल्या एकाला चांगलंच बदडून काढते. पण ते आपल्यासारख्या म्हातारीशी असं का वागले हे तिला आरशातली स्वत:ची प्रतिमा बघून कळतं. तिला धक्काच बसतो आणि ती धावतच त्या ज्योतिष्याला शोधायला निघते, तसंच त्या फोटोच्या दुकानाकडे जाते, पण तो ज्योतिषी आणि ते दुकान गायब झालेलं असतं आणि त्या जागी फुलांचं दुकान असतं. आता बेबीला घरी परत जायचं नसतं. तिला पुन्हा नव्याने जगायचं असतं. तिची सगळी राहून गेलेली स्वप्नं, तिच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. ती गात नाचत जेव्हा रस्त्यावरून चालते, तेव्हा आपली कंबर दुखत नाही, आपला खांदा दुखावला जात नाही, आपण एखाद्या फुलपाखरासारखे नाजूक पण तितकीच ताकद मिळवलेले आहोत हे तिच्या लक्षात येतं. ती खूपच खुश होते. बेबीचा नवरा सैन्यात असतो आणि ती प्रेग्नंट असताना युध्दात तो गेल्याचीच बातमी येते. आपल्या बाळाला घेऊन तिला खूप कष्टाची कामं करावी लागतात. तिची गाण्याची आवड, तिची तरुणपणातली सगळी स्वप्नं नष्ट होतात. घाण्याच्या बैलाला जुंपल्यासारखी ती कष्ट करून मुलाला मोठं करते. अचानक तिला ही तारुण्याची मिळालेली संधी तिला हवं तसं जगायची मुभा देते. आता तिच्याकडे पैसे असतात, तारुण्य असतं आणि स्वातंत्र्यही असतं. बेबी आता स्वाती हे नाव धारण करते आणि चान्टीच्याच घरी भाड्यानं एक रूम घेऊन राहते. चान्टी आणि तिचा मुलगा बेबी हरवल्यामुळे खूप दु:खी असतात. ते पोलिसात बेबी हरवल्याची तक्रारही करतात. मात्र बेबी आता मजेत असते. तिच्या एक एक इच्छा पूर्ण होत असतात. ती या नव्या जीवनाचा आनंदही घेते. मात्र या प्रवासात तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम करणारा तरुण येतो, अनेक गोष्टी घडतात. पुढे काय होतं हे पडद्यावर बघणं खूप रोचक आहे. बेबीला बघणं जेवढं आनंददायक आहे, तितकंच बेबीची स्वाती झाल्यावर स्वातीला बघणंही आपल्याला पुन्हा भूतकाळात जगण्याचा अनुभव घेण्यासारखं आहे. बेबीनं आणि स्वातीनं या चित्रपटात खूप धमाल केली आहे. बँडच्या एका शोमध्ये जेव्हा स्वाती आपला भूतकाळ आठवत, आपलं बाळ आणि केलेले कष्ट आठवत गाणं गाते, तेव्हा भाषा न कळताही आपल्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. स्वातीमधली प्रेमळ, काळजीवाहू, बेबी कधीच नाहिशी होत नाही. सहवासातल्या प्रत्येकाची ती काळजीच घेत राहते. या सगळ्यात बेबी आणि स्वाती यांच्यातला समतोल ती कसा राखते, तिची कशी तारांबळही उडते आणि पुढे काय होतं? हे बघण्यासाठी ओ बेबी हा चित्रपट जरूर बघायला हवा. मला स्वत:ला फँटसी खूप आवडते. डोळे मिटून स्वप्नं रंगवायला कुणाला आवडत नाही? आपल्या स्वप्नात, कल्पनेत आपण हवं तसं जगू शकतो. कित्येकदा आपल्याला असंही वाटतं की पुन्हा फिरून भूतकाळातले ते दिवस जगायला मिळाले तर...मी आता वेगळ्या प्रकारे जगेन असंही वाटतं. पण वय जसं पुढे सरकतं, तसा त्या जर तर ला काहीच अर्थ नसतो. पण इथे ओ बेबीमध्ये ते दिवस पुन्हा जगण्याची संधी बेबीला मिळते आणि आपण तिच्याबरोबर तो प्रवास करतो. खूप हसवणारा तर कधी रडवणारा असा बेबीचा प्रवास आहे. ओ बेबी हा बी. व्ही. नंदिनी रेड्डी दिग्दर्शित चित्रपट २०१९ मध्ये तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला. मी मात्र मल्याळम भाषेतला बघितला. खरं तर ओ बेबी हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या मिस ग्रॅनी या दक्षिण कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. यातली बेबी आणि स्वाती यांच्या भूमिका करणाऱ्या दोन्हीही अभिनेत्री एकदम भारी आहेत. मी तर दोघींच्याही प्रेमात पडले. स्वातीची भूमिका करणारी सामन्था अकिनेनी ही तमीळ आणि तेलुगू फिल्म इंडस्टीतली अभिनेत्री खूपच गोड असून तिने आत्तापर्यंत चार वेळा फिल्म फेअर ॲवार्डही पटकावले आहेत. लक्ष्मी या अभिनेत्रीने बेबीच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. नेहमीप्रमाणेच चित्रपटाचा नायकही डॅशिंग वाटतो. हिंदी चित्रपटातल्या नायकांपेक्षाही उजवाच वाटतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलचं यश मिळवलं आहे. चित्रपट थोडा लांबट वाटला तरी आपण तो बघायचा सोडू शकत नाही. कल्पनेच्या जगात एक सैर करून यायला काहीच हरकत नाही. जरुर बघा ओ बेबी! दीपा देशमुख, पुणे adipaa@gmail.com
Add new comment