दी ग्रेट इंडियन किचन

दी ग्रेट इंडियन किचन

२०२१ मध्ये म्हणजेच नुकताच प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट आज ॲमेझॉन प्राईमवर बघितला. खरं तर कितीतरी दिवसांपूर्वी डॉ. प्रशांत पाटील यांनी पहिल्यांदा हा चित्रपट मी बघावा असं सुचवलं होतं, पण जमलंच नाही.
चित्रपटाचं कथानक सगळ्यांनाच परिचित असलेलं... ठरवून (ॲरेंज मॅरेज) लग्न झालेलं नवं जोडपं, नायिका शिकलेली आणि पुरोगामी विचारांची.... सनातनी विचारांचं तिचं सासर...सुरुवातीचे दिवस छानच...सासूही समंजस आणि हरकामात तिचा अर्धा भार हलका करणारी... एके दिवशी तिची सासू आपली मुलगी प्रेग्नंट असल्यानं मुलीकडे जाते आणि घरातला कामाचा सगळा भार नव्‍या सुनेवर येऊन पडतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी पुन्हा काहीतरी हलकंफुलकं खाणं, मग रात्रीचा स्वयंपाक, चहा, नवऱ्याचा जेवणाचा डबा, घराची झाडझूड, जिना आणि फरशी पुसणं, कपडे धुणं, चुलीवर भात शिजवणं (कारण सासऱ्याला कूकरमधला भात आवडत नाही...), घरातल्या फर्निचरची साफसफाई, कपड्यांच्या घड्या, पूजेच्या तांब्या पितळेच्या भांड्यांची सफाई, ही सगळी कामं रोज आणि रोजच घरातल्या स्त्रीला करावी लागतात, त्यातून तिची सुटका केवळ महिन्याच्या पाळीच्या दिवसांत.... त्या दिवसांत बदली काम करणारी कोणी असेल तर तीही एक स्त्रीच.....हे कथानक पुढे पुढे मंद गतीने सरकतं आणि तो रटाळपणे चाललेला दिनक्रम पडद्यावर बघवत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात किती कंटाळवाणं आणि नीरस आहे हे जाणवत राहतं. स्वयंपाकघरातला सिंकचा पाईप फुटलाय, पण त्याबाबत नवऱ्याची उदासीनता, प्लंबरला न बोलावल्यामुळे रोज गळणारं खरकटं पाणी काढणं, तिथे स्वच्छ पोतं अंथरणं, नवरा आणि सासरा यांचं नाश्ता, जेवण या वेळी त्यांनी टेबलवर केलेला पसारा असह्य होणारा आणि हे सगळं रोजच रोज घडणारं...सकाळ झाली की तिने कामाला जुंपून घ्यायचं, नवऱ्यानं योगा करण्यात वेळ घालवावा, सासऱ्यानं मोबाईलशी खेळावं....ती काय करतेय याच्याशी त्यांना काहीच सोयरंसुतक नसावं...तिने ते करायलाच हवं ना!
तिने नोकरी करायची नाही, कारण तिला नोकरीची गरजच काय, घरातली बाई घरातच कशी शोभून दिसते आणि घराला घरपणही राहतं....त्यातच भारतीय रुढीपरंपरा, ज्या स्त्रीसाठी सगळ्यात जास्त जाचक ठरणाऱ्या....पुरुषी अहंकार...त्याच्या मनाविरुद्घ काहीच बोलायचं नाही कारण त्याला ते आवडत नाही, चुकून सत्य बोललं तर तिनेच माफी मागावी...एवढंच काय पण सेक्सबाबतही तिची काहीच मतं असायला नकोत, नवरा जे करेल ते गोड मानून घ्यावं....तिला त्यात काही आवडणारं असेल, तिने तसं सुचवलं, तर ती वाईट ठरते, कारण स्त्री अशा बाबतीत बोलूच कशी शकते? माहेरी तक्रार करावी, मनातलं बोलावं तर तिथेही या गोष्टी इतक्या क्षुल्लक आहेत की मुलीनेच जुळवून घ्यायला हवं...या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की या नीरस वातावरणातून तिची घुसमट प्रेक्षक म्हणून आपल्यापर्यंत येऊन पोहोचते... काही निवडक घरांमधलं वातावरण बदललेलं असलं तरी अद्यापही अनेक घरांमध्ये स्त्रीकडून याच अपेक्षा आणि हाच दिनक्रम गृहीत धरला जातो. चित्रपटाचा शेवट अपेक्षित असाच आहे, पण त्यामुळे मनावरचा सगळा ताण हलका होतो. खूप मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं.
सगळ्याच समीक्षकांनी या चित्रपटाची वाखाणणी केली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन जिओ बेबी यानं अतिशय तरल पातळीवर केलं आहे. चित्रपटातले संवाद खूप कमी आहेत. खरं तर घडत जाणारे प्रसंगच सगळं काही सांगत राहतात. मल्याळम चित्रपटात नायक असो वा नायिका यांचा मेकअप इतका सहज आणि नैसर्गिक असतो की ते आपल्यासारखेच वाटतात. चित्रपटात अनावश्यक गाणी नाहीत, जिथे गरज आहे तिथेच संगीताचा वापर केलाय. 
माझी साहित्यिक मैत्रीण आशा साठे यांनी नुकतंच खलील जिब्रानचे विचार पोस्ट केले होते : 
ते मला सांगतात, तुला एखादा गुलाम झोपलेला दिसला
तर त्याला तू उठवू नकोस
कारण त्या वेळी तो कदाचित
स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत असेल!
मी त्यांना सांगतो, तुम्हाला एखादा गुलाम झोपलेला दिसला
तर त्याला तुम्ही उठवा, आणि स्वातंत्र्य म्हणजे काय
ते त्याला समजावून सांगा
नेमकं असं काम ‘दी ग्रेट इंडियन किचन’ सारखे काही निवडक चित्रपट करत असतात! जरूर बघा.
दीपा देशमुख, पुणे  
adipaa@gmail.com
#greatindiankitchen #TheGreatIndianKitchen
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.