कुम्बलंगी नाईट्स
डोळ्यांना तृप्त करणारा केरळचा वेगवेगळ्या छटांचा हिरवाकंच निसर्ग, रात्रीच्या वेळी हिर्यांसारखं चमचमणारं पाणी, मासे पकडण्याचं रेशमी भासणारं जाळं, गावातलं साधंसुधं शांत जगणं आणि त्यात घडत जाणारी एक गोष्ट....कुम्बलंगी नावाच्या केरळमधल्या एका गावात आई-वडिलांशिवाय राहणारी साजी, बोनी, बॉबी आणि फ्रँकी नावाची चार भावंडं...वडिलांचा मृत्यू झालेला आणि आई मुलांना सोडून कधीचीच नन झालेली...या मुलांचं घर एका बेटावर असलेल्या कचराकुंडीतल्या कचऱ्यासारखं...घराला ना प्लास्टर, ना एक वस्तू जागेवर...गावातले लोक या घराला आणि आसपास जमणारा कचरा आणि तिथे वावर असणार्या कुत्र्यांना बघून हसत असतात, या चारही मुलांना ते नेपोलियनची मुलं म्हणून ओळखत असतात. मोठा भाऊ साजी स्वत: काहीच करत नसतो, तर एका गरीब तरुणाला कपड्यांना इस्त्री करायला लावून त्यातून मिळणाऱ्या पैशांत स्वत:चा खर्च भागवत असतो. दुसरा बोनी हा मुका असतो आणि तो डान्स शिकवत असतो. तिसरा या चित्रपटाचा नायक बॉबी हा देखील काहीही करत नसतो. चवथा फ्रँकी मात्र मिळणार्या शिष्यवृत्तीतून हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत असतो. सुट्टी लागली की नाईलाजानं त्याला या कोंडवाड्यात राहायला यावं लागत असतं.
या चौघांची तोंडं चार दिशेला असतात, आपसांत पटतही नसतं. घराला घरपण काय असतं ते त्यांना ठाऊकच नसतं. भरकटलेली, दिशाहीन अशी ही चार भावंडं रोजचा दिवस काढत असतात. फ्रँकी सुट्टीत आल्यावर घरात सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असतो, तर घरात चालणार्या मारामार्या बघून बोनीला घरात यावंसंच वाटत नसतं. मित्रांच्या संगतीत या सगळ्यांचे दिवस जात असतात. यातल्या बॉबीच्या मनस्वी आयुष्यात बेबी या तरुणीच्या रुपात प्रेमाचा प्रवेश होतो...तसच बोनीच्या आयुष्यातही एक आफ्रिकन पर्यटक येते.
मोठा भाऊ असूनही साजीचं घरात कोणीएक ऐकत नसतं. त्याला घरात काहीही मान नसतो. एके दिवशी फ्रँकीवर साजी चिडतो, म्हणून बोनी साजीवर हात उगारतो. त्यामुळे साजीला खूप अपमानास्पद वाटतं, रात्री इस्त्रीवाल्या तरुणाबरोबर दारू पित असताना तो आपल्या मनातली खदखद त्याच्याजवळ व्यक्त करतो. त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला तो तरुण ही दारू आपण शेवटची घेणार असून उद्यापासून इस्त्रीचं काम सोडून आपण आपल्या गर्भवती बायकोला घेऊन गावाकडे जाणार असल्याचं सांगतो. घरात लहान भावाकडून खाल्लेला मार, हाताखाली ठेवलेला तरूणही आपल्याला सोडून चाललेला आणि वर जाताना सल्ले देऊ पाहणारा..आपण एकटे पडलो आहोत या भावनेनं साजी जीव द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याला वाचवण्याच्या नादात तो इस्त्रीवाला तरूण मरतो. तसं बघितलं तर तो एक अपघातच असतो. त्या मृत तरुणाची गर्भवती बायको पोलिसात साजीच्या विरोधात तक्रार नोंदवत नाही कारण तिचा नवरा साजीला आपला मोठा भाऊच मानत असतो. पोलीस साजीला सोडून देतात. साजी अपराधी भावनेनं स्वत:ला दोष देत राहतो. बॉबीला लग्नासाठी बेबीच्या घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी आता काम शोधावं लागणार असतं. तो माशांवर प्रक्रिया करणार्या केंद्रात काम करायला लागतो, पण ते काम त्याला आवडत नाही. त्यांचं प्रेम मात्र बहरत असतं.
बॉबी आणि बेबीचं लग्न होतं का, साजी आपल्या अपराधी भावनेतून बाहेर येतो का, फ्रँकीला परिपूर्ण घर मिळतं का, चारही भावांमध्ये बाँडिंग कसं तयार होतं, चार तरुणांचा चाललेला सरळसाधा प्रवास कसं वेगळं वळण घेतो हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर कुम्बलंगी नाईट्स हा चित्रपट आवर्जून बघायला हवा.
२०१९ मध्ये प्रसारित झालेला मल्याळम भाषेतला कुम्बलंगी नाईट्स हा चित्रपट एकदम लै म्हणजे लैच भारी आहे. यातल्या चार भावांचं विखुरलेपण आणि नंतर तयार होणारं बाँडिंग खूप मस्त दाखवलं आहे. या चित्रपटाचं कथानकही मनाची पकड घेणारं आहे. या चित्रपटात वेगळं वळण घेताना फहाद फासील या अभिनेत्याची भूमिका देखील लक्षात राहते.
कुम्बलंगी नाईट्स या चित्रपटातलं बॉबीचं प्रेमात पडल्यावरचं गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे. शान निगमनं बॉबीची भूमिका झकास केलीय. यातली हिरोनी म्हणजे नव्यानं आलेली अॅन्ना बेन ही पोरगी मला जाम आवडली. इतकी साधी, पण डोळ्यात चमक असलेली, हसली की जिवाला घोर लावणारी अशी. यातले शान निगम, सौबिन शाहीर, श्रीनाथ भासी, मॅथ्यू थॉमस, हे चारही भाऊ, त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे मित्र सारं काही मला भावलं. मात्र सगळ्यात काय विशेष असेल, तर या चित्रपटाची अप्रतिम हा शब्दही फिका पडावा अशी फोटोग्राफी! चित्रपट सुरू होतो, तेव्हापासून ते शेवटपर्यंत बाकी काहीही नाही लक्षात घेतलं तरी चालेल, पण फक्त समोरच्या पडद्यावर दिसणार्या एक से एक फ्रेम्स बघत राहाव्यात अशा....सगळी दृश्य म्हणजे...स्वप्नातली जादुई नगरी असावी अशी..... केरळमधल्या कोचीतलं कुम्बलंगी हे मासेमारी चा प्रमुख व्यवसाय असणारं गावं म्हणजे स्वर्ग असावा तर असाच असेल असं सांगणारं.... शायजू खालिद या छायाचित्रकारानं हे इतकं सुरेखरीत्या टिपलंय की व्वा, क्या बात है असे शब्दही उच्चारु नयेत, बस्स मूकपणे फक्त बघत राहावं असं!
म्हणूनच कुम्बलंगी नाईट्स या चित्रपटाची नामावळी दाखवताना छायाचित्रकाराचं शायजू खालिद हे नाव ठळकपणे झळकत राहतं. या चित्रपटाचं बजेट साडेसहा कोटी रुपये होतं, मात्र बॉक्स ऑफीसवर ३९ कोटींचा धंदा या चित्रपटानं केला. कुम्बलंगी नाईट्स या चित्रपटानं उत्कृष्ट चित्रपट म्हणून, कॅरक्टर रोलबद्दल, संगीताबद्दल, छायाचित्रणाबद्दल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबद्दल, सहाय्यक अभिनयाबद्दल, नायिकेच्या नव्या चेहर्याबद्दल, पटकथेबद्दल, चित्रपटाच्या संकलनाबद्दल, गीतलेखनाबद्दल, दिग्दर्शनाबद्दल मानाचे अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. समीक्षकांनी या दशकातला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कुम्बलंगी नाईट्सला गौरवलं आहे.
जरूर बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल - कुम्बलंगी नाईट्स!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
#kumblinginights
Add new comment