विकृती

विकृती

केरळमधल्या कोची शहरात घडलेली ही एक सत्य घटना. सोशल मीडियाचा परिणामांचा विचार न करता केवळ गंमत म्हणून केलेला वापर काय परिणाम करू शकतो याचं उदाहरण देणारी ही गोष्ट. एका खाजगी शाळेत प्युनचं काम करणारा एल्धो आणि एका रेडिमेड कपडयांच्या कंपनीत कपडे शिवण्याचं काम करणारी एल्सी ही त्याची बायको दोघंही मूकबधिर असतात. मात्र दोघंही अतिशय समंजस, आहे ते वास्तव स्वीकारून अतिशय आनंदाने जगत असतात. त्यांना बारा-तेरा वर्षांचा एक मुलगा आणि सात-आठ वर्षांची एक मुलगी असते. मुलगा फूटबॉल टीममध्ये खूप चांगला खेळत असतो, तर मुलगी लहान असल्यामुळे एल्धो तिच्या वेण्या घालण्यापासून शाळेत जाण्याची तिची तयारी सकाळच्या धावपळीत करत असतो. त्यानंतर दोघंही नवरा-बायको आपापल्या कामावर जात असतात. आपल्या सांकेतिक खुणांच्या भाषेतून, तर कधी लिहून ते संवाद साधत असतात.
याच वेळी याच कथेला समांतर आणखी एक गोष्ट. गल्फ देशात असलेला समीर हा तरुण सुट्टीत भारतात येतो. त्याला मोबाईलवर सतत सेल्फी काढणं, सोशल मीडियात सक्रिय राहणं खूपच आवडत असतं. एका नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मुलीवर त्याचं एकतर्फी प्रेम असतं. तिच्या पहिलवान दिसणाऱ्या वडिलांना तो धीर एकवटून भेटतो आणि त्यांची तुमची मुलगी आवडत असून तिच्याशी लग्न करायचंय हे सांगतो. अर्थातच त्याच्या प्रयत्नांनी ते लग्न ठरतं. घरात त्याची आई, बहीण खुश होतात. लग्नाची जोरदार तयारी सुरू होते. समीर आणि त्याची होणारी बायको दोघंही बाहेर भेटत राहतात. या वेळी अनेक मजेशीर प्रसंग घडत राहतात.
पहिल्या कथानकात - एके दिवशी एल्धोची छोटी मुलगी आजारी पडते. चर्चमधल्या फादरला घरी बोलावून मंतरलेलं पाणी तिच्यावर आणि घरभर शिंपडून एल्सी मार्ग काढते. मात्र मुलगी जास्तच आजारी पडल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. एल्सी आणि एल्धो यांच्या हलगर्जीपणावर डॉक्टरही त्यांना सुनावतात. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी त्यांची मुलगी बचावते. याही काळात आपल्या बायकोची होणारी तारांबळ बघून एल्धो तिला आणि मुलाला घरी जायला सांगतो आणि आपण रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायचं ठरवतो. ज्या वेळी मुलीला डिसचार्ज दिला जातो, त्या वेळी मुलीला आणि बायकोला तो रिक्षात बसवतो आणि स्वत: मेट्रोनं प्रवास करतो. सततच्या जाग्रणानं मेट्रोत त्याला गाढ झोप लागते आणि आजूबाजूला काय चाललंय याची शुद्घही राहत नाही. त्याच वेळी मेट्रोत उभ्याने प्रवास करणारा समीर हे दृश्य बघतो आणि त्याच्या सवयीनुसार तो एल्धोचा फोटो काढतो. इतकंच नाही तर तो आपल्या व्‍हॉट्सग्रुपमध्येही तो फोटो शेअर करतो. त्या व्‍हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन देखील समीरचा मित्रच असतो. तो त्या फोटोबरोबर ‘मेट्रोमध्ये दारुडा’ असं एक कॅप्शन जोडतो  आणि तो फोटो कॅप्शनसहित बघता बघता व्‍हायरल होतो. टीव्‍ही चॅनेलपासून सगळीकडे एकच चर्चा सुरू होते. इतकी की फूटबॉलच्या मैदानावर एल्धोच्या मुलालाही त्याच्या वडिलांवरून अपमान सहन करावा लागतो. एल्धोला जेव्‍हा कळतं, तेव्‍हा त्याला काहीच कळेनासं होतं. एल्सीचा आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास असतो. ती त्याला दुर्लक्ष कर असं सांगते, पण तिलाही तिच्या कामाच्या ठिकाणी तिच्या नवऱ्यावरून इतरांच्या झालेल्या विचित्र नजरांना तोंड द्यावं लागतं. एल्धोला तर जाईल तिथे कुत्सित नजरांचा सामना करावा लागतो. त्याला शाळेतूनही काढून टाकलं जातं. अखेर त्याच्या मुलालाही आपण वडिलांशी वाईट वागतो आहोत हे समजतं आणि तो आपल्या वडिलांबरोबर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतो आणि मग पोलीस तपास सुरू करतात.
इथून मग खऱ्या नाट्याला सुरुवात होते. यात खऱ्याखोट्या चर्चा रंगतात, मधल्यामध्ये आपली पोळी भाजून घेणाऱ्या स्वार्थी जगाचंही दर्शन घडतं. अपराधी भावनेनं खचलेला समीरही बघायला मिळतो, त्याचे मित्र त्यातूनही मार्ग काढायचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यात समीर प्रामाणिकपणे प्रसंगाला सामोरं जातो की पळ काढतो, त्याचं तोंडावर आलेलं लग्न होतं की मोडतं, एल्धो या प्रकरणातून पुन्हा उजळ माथ्याने जगू शकतो का,त्याची नोकरी परत मिळते का,  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘विकृती’ या मल्याळम चित्रपटात मिळतात. 
प्रसारमाध्यमांचा अतिरेकी वापर, मोबाईल आणि इंटरनेटचं व्‍यसन, आपल्या एका कृतीचे एखाद्याच्या आयुष्यावर किती विपरित परिणाम होऊ शकतात याचा जराही विचार न करणारी माणसं आणि त्यांना आपल्यात निर्माण झालेल्या या विकृतीची जराही जाणीवही नसणं, अशा अनेक गोष्टी समोर येतात. या चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे यात कोणीही खलनायक नाही. समीर हा सहजपणे ती गोष्ट करतो आणि ती घडल्यावर मात्र अपराधी भावनेनं मनाला खात राहतो. इतर सर्वसामान्यांप्रमाणेच तो गांगरून आणि गडबडून जातो. त्याचं कशातच लक्ष लागत नाही. या चित्रपटात एल्धो आणि एल्सी या नवरा-बायकोंचं तग धरून आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं खूप भावलं. आपल्यातल्या उणिवांचा, कमतरतांचा कुठलाही बाऊ ते करत नाहीत. ते कधी समाजावर खापर फोडत नाहीत, कोणाविषयी आकस बाळगत नाहीत.
एम्सी जोसेफ दिग्दर्शित ‘विकृती’ हा नेटफिल्सवर असलेला चित्रपट जरूर बघायला हवा. २०१९ साली प्रदर्शित झालेला विकृती हा मल्याळम चित्रपट असून यात सौबिन शाहीर (कुम्बलिंगी नाईट्समधला सगळ्यात मोठा भाऊ आठवतोय ना, तोच हा.) या अभिनेत्याने समीर ची भूमिका साकारली आहे.   एल्धो ची भूमिका करणाऱ्या सूरज वेन्जरमुड्डू याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. हा चित्रपट बघताना संजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या अप्रतिम अभिनयाने साकारलेला 'कोशिश' हा चित्रपट मला आठवला. 'विकृती' हा चित्रपट मला खूपच आवडला. मल्याळम चित्रपटांचं वैशिष्ट्य हेच की त्यात कुठलीही पात्रं नाटकी वाटत नाहीत, ती आपल्यातलीच आणि अगदी सहज वाटतात. त्यांचा अभिनय त्यांच्या डोळ्यातून दिसतो. सो कॉल्ड देखणेपणाच्या नाही तर आपल्या अभिनयाच्या जोरावर ही पात्रं आपला ठसा उमटवतात.  मेकअपचा कमीत कमी वापर या बाबी या सहजपणात आणखीनच भर टाकतात. जरूर बघा, नक्‍कीच आवडेल.

दीपा देशमुख, पुणे 
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.