बाकी इतिहास
बाकी इतिहास मूळ बंगाली भाषेतलं ‘बाकी इतिहास’ हे बादल सरकार लिखित नाटक हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं. आज सुदर्शनला हे नाटक बघण्याची संधी मिळाली. १९२५ साली जन्मलेला बादल सरकार हा हरहुन्नरी मनुष्य एक अभिनेता, एक नाटककार, एक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होताच, त्याचबरोबर शिक्षणानं तो सिव्हिल इंजिनिअर होता. शिकत असतानाच बादल सरकारांवर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडला. भारतामध्ये ज्या दिग्गज नाटककारांचं नाव घेतलं जातं, त्यात मोहन राकेश, विजय तेंडूलकर, गिरीश कर्नाड अशा नावांबरोबरच बादल सरकार हे नाव त्यात सामील झाल्याशिवाय नाटकाचा इतिहास पुढे सरकू शकत नाही. बादल सरकारच्या नाटकांनी प्रेक्षकांना त्यांची नेहमीची चौकट सोडून बघायला शिकवलं. पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं. अमोल पालेकर यांनी 'पगला घोडा' हे त्यांचं नाटक मराठीतून सादर केलं होतं.
१९६५ साली आलेलं ‘बाकी इतिहास’ हे नाटक आजही बघताना तितकंच ताजं वाटतं हे विशेष! शरद आणि वासंती या पात्रांनी या नाटकाची सुरुवात होते. वासंती एक लेखिका असून नव्या गोष्टीसाठी तिला कथाबीज शोधण्यात शरद मदत करतो. वर्तमानपत्रात एक बातमी आलेली असते. त्यात सितानाथ चटर्जी यानं आत्महत्या केलेली असते. या बातमीच्या आधारे वासंती कथा गुंफायला सुरुवात करते आणि रंगमंचावर सितानाथ, त्याची जोडीदार कनक ही पात्रंही अवतरतात. खरं तर या दोन्ही जोड्यांचं आयुष्य एकसारखंच समांतरपणे सुरू असलेलं लक्षात यायला लागतं. पण तरीही उत्सुकता वाढत राहते. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय जोडप्याची साधी स्वप्नं असलेली कथा पुढे सरकत राहते आणि या कथेबरोबरच नाटककार आणि दिग्दर्शक प्रेक्षकांना अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडतो. स्वतःचा एक नकळत बनत गेलेला कोष आणि त्या कोषाभोवतीच विणत गेलेल्या जाळ्यासारखं अर्थहिन आयुष्य, त्यात नवं काहीच घडताना दिसत नाही. कधी साधीशी स्वप्नं, पण स्पर्शासरशी मरून पडणारी, कधी मनात उफाळून आलेला स्वार्थ, तोही नीटपणे साधता न येणारा, कधी परिस्थितीशी करावी लागणारी तडजोड आणि कधी त्यातच होणारी दमछाक ..... एकीकडे असे शेकडो/हजारो/लाखो लोक जिवंत असून मृतप्रायच असल्यासारखे आहेत आणि त्यांना तसं पाहता कुठल्या इतिहासात स्थानही नाही आणि नसतं. इतिहास तर राजांचा असतो, गरीब, पीडित, वंचितांना इतिहास असण्याची गरजच नसते.
गिरीश परदेशी या तरूणानं दिग्दर्शित केलेलं हे नाटक बघायलाच पाहिजे! हा यातला ‘च’ खूप महत्त्वाचा वाटतो. मी तर या तरूणाची फॅन झाले आहे, त्याचं ‘चे गव्हेरा’ बघितल्यापासूनच! खरं तर एक साधंसं कथानक, पण त्यात दडलेले अनेक अर्थ आणि ते सगळे अर्थ न सांगताही केवळ दिग्दर्शनातून उलगडले गेले पाहिजेत हे कठीण कसब गिरीश परदेशीनं लीलया साध्य करून दाखवलं आहे. रंगमंचावरच्या काळ्या विंगा, पात्रांचे काळया/करड्या रंगातले पेहराव, संपूर्ण रंगमंचावर नेपथ्यापेक्षाही प्रकाशयोजनेचा केलेला समर्थ वापर, तितकंच समर्पक असं संगीत आणि पात्रांचा रंगमंचावरचा सहज चाललेला वावर....या पात्रांचं वागणं नाट्यमय असलं तरी नाटकी वाटत नाही.
गायत्री चिघलीकर, रुपाली गोडांबे, स्वप्नील पंडित, आदर्श राजपूत, धनंजय सरदेशपांडे आणि गिरीश परदेशी यांच्या यात भूमिका असून आपापल्या भूमिका साकारताना कोणीही कुठेही कमी पडलेले नाहीत. कमीत कमी पात्रं आणि कमीत कमी नेपथ्य असूनही संपूर्ण रंगमंचावरची प्रेक्षकांची पकड आणि नजर हटू न देण्याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. नाटक संपत असताना एकीकडे या अर्थहीन जगण्याविषयीची उदासीनता दाटून येत असतानाच, त्याच वेळी आहे त्या जगण्यातही आनंद मानणारे, जल्लोष करणारेही भेटतात आणि नव्या आशेचा अंकूर बरोबर घेऊन - ‘बाकी इतिहास’ घेऊन - प्रेक्षक घराकडे परततो हे मात्र नक्की! जरूर बघा - आपल्या जाणिवांना आणखी समृद्ध करण्यासाठी- बाकी इतिहास!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment