ट्रॅप्ड
मी आत्ताच ‘ट्रॅप्ड’ हा चित्रपट बघितला. खरं तर यातल्या अनुभवानं सुन्न झाले कितीतरी वेळ! काय व्यक्त व्हावं तेच कळेनासं झालंय. अनुराग कश्यप निर्मित २०१७ च्या मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटाचं ट्रेलर त्याच वेळी बघितलं होतं. अमीत जोशीची कथा आणि विक्रमादित्य मोटवानीचं दिग्दर्शन! बेस्ट एशियन फिल्मचा पुरस्कार या चित्रपटानं पटकावलाय. राजकुमार राव या अभिनेत्याची यातली प्रमुख भूमिका! अलिगढ, कोई पो छे, क्वीन, शहीद, गँग्स ऑफ वासेपूर आणि बरेली की बर्फी, अशा निवडक चित्रपटांतून काम केलेला हा गुणी अभिनेता मला खूप आवडतो. तो अभिनय करतोय असं कधी वाटतच नाही, इतका सहज त्याचा वावर चित्रपटात असतो.
‘ट्रॅप्ड’ हा संपूर्ण चित्रपट शौर्य या एकाच व्यक्तिरेखेभोवती फिरतो. चित्रपटाचं कथानक खूप वेगळं आहे. मुंबईत एकाच ऑफीसमध्ये काम करत असलेले शौर्य आणि नुरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण तिचं लग्न आधीच ठरल्याचं कळताच शौर्य तिला आपण एका दिवसांत घर मिळवून आपण लगेच लग्न करू असं आश्वासन देतो. ती त्याला होकार देते. शौर्य धडपड करत एका एजंटकडून ‘स्वर्ग’ नावाच्या अनेक मजली इमारतीत एक फ्लॅट त्याच्या बजेटमध्ये मिळवतो. एक छोटीशी बॅग घेऊन त्या फ्लॅटमध्ये राहायला येतो. त्या इमारतीतले बहुतांश सगळेच फ्लॅट्स काही कायदेशीर बाबींमुळे रिकामे असतात. त्या इमारतीच्या रखवालदाराला ऐकायला अतिशय कमी येत असतं. सकाळी नुरीला भेटण्यासाठी (लग्न करण्यासाठी...अन्यथा तिला ट्रेन पकडून लग्नासाठी तिच्या गावी जावं लागणार असतं.) पटकन तयार व्हायला लागतो. तेव्हा त्या घरात लाईट नाही आणि पाणीही नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. तसाच गडबडीत निघतो आणि मोबाईल घरातच राहिलाय म्हणून तो बेडरूममध्ये वळतो. नुरीचा फोन असतो, ती त्याची वाट बघत असते. 'आपण निघालोच' असं सांगून तो निघतो पण त्या धावपळीत मुख्य दाराची चावी दारालाच बाहेर राहते आणि दार लॉक होतं.
इथूनच सगळा थरार सुरू होतो. या चित्रपटाच्या निमित्तानं मुंबईत अंधेरीसारख्या पॉश भागातल्या इमारतीत एका ६५ वर्षीय आशा केदार नावाच्या महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी आठवली. तिचं एकटं असणं, बाहेर पडण्यासाठीची धडपड, त्राण नसल्यानं अखेर उपासमारीनं केव्हातरी झालेला मृत्यू आणि तोही परदेशातून आलेल्या मुलानं दार तोडल्यावर सोफ्याजवळ सापडलेला तिचा सांगाडावजा मृतदेह......! खरं तर ‘ट्रप्ड’ हा चित्रपट कमकुवत मनाची माणसं बघूच शकणार नाहीत. खूप त्रास होतो बघताना! आत अडकल्यानं शक्य तितके प्रयत्न करूनही दार उघडत नाही कळाल्यावर शौर्य जस्ट डायलला फोन करून चावीवाल्याशी बोलतो, पण पत्ता सांगायच्या आतच कमी बॅटरीमुळे मोबाईल स्वीचऑफ होतो. आठ दिवस बंद मोबाईल, पाणी, वीज आणि अन्न नसलेल्या घरात शौर्य कसा राहतो हे बघणं अत्यंत अत्यंत भयंकर आहे. खरं तर तो त्याचा अनुभव राहतच नाही. आपणच त्याची ती केविलवाणी अवस्था जगतो. सुरुवातीला जवळ असलेली बिसलेरीची बाटली आणि बिस्किटचा पुडा शौर्यला पुरतो. पण नंतर रात्री उंदराशी होणारा सामना (उंदराला अत्यंत घाबरणारा शौर्य!), झुरळं, मुंग्या.....पावसाचं पाणी.....जगण्याचा झगडा चालू असताना शुद्ध शाकाहारी असलेला शौर्य मुंग्या खातो, झुरळं खातो, अगदी कबुतरही मारून खातो......त्या एकटेपणात उंदराशी बोलतो....त्याला खिडकीतून दिसणारी झगमगणारी मुंबई...पण ती आपल्यातच मग्न....तो आपल्याजवळ असलेल्या पेस्टनं, हाताला लागलेल्या जखमेच्या रक्तानं मदतीची याचना करणारे फलक खिडकीतून खाली फेकतो. आशा एकच कोणीतरी आपल्याला यातून वाचवेल....त्या उंच इमारतीतून खाली दिसणार्या एका गच्चीत एक स्त्री वाळत घातलेले कपडे घ्यायला येत असते. पण तिला उशिरा तो फलक दिसतो, ती त्या 'स्वर्ग' नावाच्या इमारतीचा शोध घेत येते, मात्र रखवालदार तिला इथे कोणी राहत नाही असं सांगतो. तरीही ती नेटानं त्या क्रमांकाचा फ्लॅट शोधत जिने चढत राहते. शौर्यला ती वाचवण्यासाठी येत असल्याचं कळतं, तो आवाज करत राहतो, त्याच्या आशा पल्लवित होतात, पण तिला मात्र काहीही हालचाल, आवाज न ऐकू आल्यानं ती माघारी फिरते. हताश, निराश शौर्यची अवस्था आणखीनच दयनीय होते.
जगण्याची इर्षा, चिकाटी माणसाला किती दिव्यातून जायला तयार करते हे या चित्रपटातून दिसतं. शौर्य अखेर बाल्कनीचा लोखंडी रॉड तोडण्यात यशस्वी होतो आणि लोखंडी बारला पकडून खाली उतरण्याचा प्रयत्न करत राहतो. पाचव्या मजल्यापर्यंत तो कसाबसा पोहोचण्यात यशस्वी होतो. तिथून मात्र एका लाथेत काचेचा दरवाजा तोडून जिन्यावरून खाली जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र आठ दिवसांत त्याची अवस्था इतकी वाईट झालेली असते की त्याचे तोल जात राहतात आणि तो बेशुद्ध पडतो. त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था ओळखायला येणार नाही अशी झालेली असते.....शुद्ध येते, तेव्हा तो सरकारी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये असतो. नुरी त्याला भेटायला येते. तिच्याकडे बघताच आपल्या लक्षात येतं, की त्याची वाट पाहून त्याचा काहीही ठावठिकाणा न लागल्यानं तिनं लग्न केलेलं असतं. यापुढल्या आयुष्यात ती त्याला साथ देऊ शकणार नसते. त्याचा पुढे झालेला हात तसाच टाकून ती निघून जाते. ती त्याला आता न मिळणं याचाही परिणाम आपल्या बधिर झालेल्या मनावर आता होत नाही. मधले दिवस तो नसल्यानं त्याच्या मित्रांना, त्याच्या ऑफीसमध्ये.....कोणालाही काहीही फरक पडलेला नसतो.... हॉस्पिटलमधून बरा झाल्यावरचं शौर्यचं यंत्रवत आयुष्य पुन्हा सुरू होतं. माणसाच्या झगड्यावरचे, संकटावर मात करण्यावरचे ‘लाईफ ऑफ पाय’ पासून अनेक चित्रपट बघितले. पण गर्दीनं गजबजलेल्या मुंबईतला शौर्यचा अनुभव अंगावर काटा आणणारा...! राजकुमार रावच्या अभिनयासाठी या चित्रपटातला थरार अनुभवायलाच हवा असा हा चित्रपट! जरूर बघा ......!
दीपा देशमुख
२३ ऑगस्ट २०१७.
Add new comment