डेट विथ सई

डेट विथ सई

'डेट विथ सई' ही झी फाईव्ह वरची वेबसीरीज एका दमात ९ एपिसोडसह बघितली. गेले काही दिवस सतत असणारा पाऊस, घरात तयार झालेलं उबदार वातावरण आणि त्यातूनच या सीरीजचे काही दिवसांपूर्वी दोन एपिसोड्स बघितल्याचं आज अचानक आठवलं. औरंगाबादचा आमच्या शिल्पकारचा ज्ञानेश झोटिंग या वेबसीरीजचा लेखक आणि दिग्दर्शक असल्यानं थोड्या जिव्हाळ्यानंच सगळं काही बघायचं होतं. एवढासा असलेला, बालनाट्यात काम करणारा ज्ञानेश बघता बघता मोठा झाला आणि त्यानं लिहिलेला 'हाफ तिकीट' हा चित्रपट असो की आताची ही 'डेट विथ सई' वेबसीरीज असो, खूप खूप कौतुक वाटलं. रविवारी झी टॉकीजवर त्याचाच 'राक्षस' चित्रपट बघण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहेच. जरूर बघा ‘राक्षस’!

'डेट विथ सई' म्हणजे एक थरार आहे, उत्कंठा आहे, पुढे काय घडणार या विचारामुळे अस्वस्थ, बेचैन झालेलं मन आहे. यात सई ताम्हणकर ही खरोखरची सई ताम्हणकरच दाखवली आहे. तिचं शूटिंग, तिची व्यस्तता आणि तिचं ग्लॅमर, प्रसिद्धी.....या सगळ्यातून प्रवास करत असलेल्या सईच्या आयुष्यात अचानक एक आगंतुक प्रवेश करतो. त्याचा जरी हा व्यवस्थित प्लॅन असला तरी तो सईला कळत नाही आणि त्यातूनच एका बेसावध क्षणी तो तिचं अपहरण करतो. यातूनच खरं नाट्य सुरू होतं. सईची सुटका कशी होते, अपहरणकर्ता हे सगळं का करतो हे सगळं पडद्यावर बघणं जास्त विलक्षण आहे.

यात सई ताम्हणकरनं केलेली भूमिका अप्रतिम आहे. 'जुग जुग जियो' असं तिला म्हणावसं वाटलं. ही पोरगी बिनधास्त आहे, आपल्या कामाबाबत प्रामाणिक आहे आणि पूर्ण तनमन झोकून देऊन ती आपले एफर्ट्स त्यात लावते हे तिची भूमिका बघताना लक्षात येतं. यात रोहित कोकाटे या तरुणानं केलेलं काम तितकंच सरस आहे. सईसमोर हा तरूण कुठेही कमी पडलेला नाही. चित्रपटसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख होणार हे नक्कीच! लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ज्ञानेश - आवडलं बुवा!

एकीकडे वर्तमान आणि एकीकडे फ्लॅशबॅक यांची सांगड घालत कथानक पुढे पुढे सरकत राहतं. वर्तमानातल्या प्रत्येक प्रसंगाचा भूतकाळातल्या प्रसंगाशी काहीतरी संबंध असतो. प्रत्येक एपिसोड कसा संपला कळत नाही. त्यामुळेच मी सगळे एपिसोड आधाशासारखे एकदमच बघितले. रोज एक बघू असा संयम माझ्यात शिल्लक राहिला नव्हता. ज्ञानेश, ही मराठी वेबसीरीज वाटतच नाही, ती एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाची वाटते हे तिचं वैशिष्ट्य! लव्ह यू डिअर! सईसाठी, रोहित कोकाटेसाठी, ज्ञानेशसाठी 'डेट विथ सई'मधला थरार जरूर जरूर अनुभवा!

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.